आम्ही बाई सूना भाग 4

कोणाच्या पसंतीची येणार सून?

आम्ही बाई सूना भाग 4


मागील भागात आपण पाहिले रंजुताई तिसरी सून आपल्याच मनासारखी शोधायला निघतात. इकडे सारिका आणि मेघा संजना कोण आहे? याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. तर तिकडे संजना आणि समीर एकमेकांच्या प्रेमात प्रेमात बुडालेले आहेत. आता ह्या सूनांचे पुढे काय होणार? पाहूया पुढे.


समीरकडून वचन घेऊन विजयी मुद्रेने रंजुताई आत निघून गेल्या.

"सम्या, खाल्ली माती. आता भोग."
अमेय आणि मनोज ओरडले.


" भोग कशाला ? आजीने तुमच्या दोघांच्या बायका पसंद केल्या. तुमचे थोडेच वाईट झाले ."
समीर म्हणाला.


" सम्या, ही सारिका बँकेत असते आणि मी ?"

"त्याच बँकेत दुसऱ्या शाखेत आहेस." समीरने उत्तर दिले.


" अरे पण आजीला सारिका वहिनी त्या कुठल्यातरी लग्नात आवडली ना ? "
समीर आता गंभीर झाला.

त्याची अवस्था पाहून सगळेजण हसायला लागले.


" दादा, म्हणजे मी सोडून सगळ्यांना काहीतरी माहित आहे तर ?" समीर चिडला.

"सम्या,भिंतीला कान असतात. आपल्या घरात आईचा गुप्तहेर आहे. तेव्हा तुला काही माहिती हवी असेल तर मांडेकर यांना डोसा खाऊ घालावा. "


एवढे बोलून दोघे भाऊ आपापल्या खोलीत निघून गेले.



आता समीरला बाबांना विचारावेच लागणार होते. समीर म्हणजे मम्माज बॉयचे सर्वाधिक अपडेट व्हर्जन.


त्यामुळे अनेक रहस्य रविंदराव त्याला सांगत नसत. आता बाबांना कसे तयार करायचे याचा विचार करत समीर उद्याच्या मिटिंगची तयारी करायला गेला.



इकडे संजनाची आनंदाने गाणे गुणगुणत घरी आली.


"आली "माझ्या घरी ही दिवाळी. लक्षदिप हे उजळले मनी." आनंदित होऊन संजनाची आई स्वातीताई गात होत्या.


"स्वाती,अग काही हो होतेय का तुला?"
नवरा काळजीने म्हणाला.


तशा त्या प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाल्या," मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना..."

तसा श्रीरंग जवळ आला आणि त्याने कपाळाला हात लावला.

" ताप वगैरे तर नाहीय. बी. पी. कमी झाला की काय?"

तेवढ्यात स्वाती त्याचा कपाळावर ठेवलेला हात झटकून म्हणाली,"मला काही धाड भरली नाहीय. वाटेल सुला वन्स भेटल्या होत्या."


"काय? तरीच? आज कोणाच्या कुटाळक्या केल्या."
श्रीरंग हसला.


"गप्प बसा. जरा बहिणीकडून शिका काही."
स्वाती आत जात म्हणाली.

" तरुण असताना तर म्हणायचीस बहिणीची शिकवण मला नका सांगू."


"ते राहू द्या हो. अहो,सुला वन्सनी आपल्या संजुसाठी स्थळ आणले आहे."


"काय? आणले आहे आत्तूने? कसले स्थल आहे हे?"
मागून संजना म्हणाली.


आज पहिल्यांदा स्वातीला तिच्या इंग्लिश माध्यमाचा अभिमान वाटला.


"काही नाही,तू काय खाणार संजना?"
त्यांनी हळूच विषय बदलला.


"मॉम,आज कायतरी गावाकडचे टाकून देऊ ॲप वर. हे बघ मीट वड्या. बाबा तुम्ही चिकन घेऊन या तोपर्यंत."
संजू म्हणाली.


" संजे कार्टे चिकन,मांस असलेला कोणताच पदार्थ मी बनवणार नाही. शाळेत खायला शिकलीस तेवढे पुरे."
असे म्हणत असतानाच संजनाने दाखवलेला फोटो बघून श्रीरंग हसायला लागला.


"संजू,ह्या मास वड्या आहेत."

"हा तेच मास म्हणजे मटण ना? तेवढे मराठी कळते मला."
ते ऐकून डोक्यावर हात मारत स्वाती आत निघून गेली.


अखेर कसेबसे स्वाती त्या वड्या बनवायला तयार झाली.


"हॅलो,स्वाती! बोललीस का संजनाला?"
सुलूने फोनवर विचारले.

"वन्स,आता लगेच विचारले तर ती बिथरेल. मी तिला उद्या सकाळी विचारते. तुम्ही मुलाची माहिती आणि फोटो पाठवून द्या."


इकडे रंजुताई समीर आणि संजनाचे लग्न लावायला अधीर झाल्या होत्या. त्यांनी लागलीच आपल्या मैत्रिणीला फोन लावला.


"मी काय म्हणते सुले,बघण्याचा कार्यक्रम लवकरच करू बाई. तुझ्या वहिनीला विचारून घे. मी तुला समीरची पत्रिका पाठवते."


त्यांनी फोन ठेवला.


आता दोन्ही सूना स्वयंपाक करत होत्या. तरीही समीरची आवडती भाजी करायला त्या मुद्दाम आत गेल्या.


"सारिका,मी मेथीची भाजी करते. समीरला तुझी पद्धत नाही आवडत."
त्यांनी ठसका मारला.


"आई,बायको येईल तेव्हा खावेच लागेल. सवय लावा त्याला."

मेघा हसून म्हणाली.

तेवढ्यात फोनवर यू ट्यूब नोटिफिकेशन आले. त्यांनी संजना मासवडी पोस्ट करणार ते पाहिले.

"बघा,एवढी आधुनिक पोर. तरी मासवडी करत आहे. नाहीतर इकडे नुसता उजेड. संजना हुशार आहे बाई."
मेथी करत करत दोन्ही सुना ऐकतील असे त्या बोलत होत्या.


"हुश्श्श,झाली भाजी. आता पोळ्या करा तुम्ही दोघी."

त्या बाहेर जाताच मेघा ओरडली,"भेंडी,ह्या रविवारी मासवडी करते."

तेवढ्यात सारिका तिला म्हणाली,"मेघा, तू ही वडी बघितली तरी आहेस का?"

"नसेना का? मी नेटवरून शोधते. चला पोळ्या भाजते."
तिने उलथने फिरवले आणि एका कपाचा बळी गेला.



समीरने अखेर कसेबसे बाबांना बाहेर भेटायला तयार केले. दुसऱ्या दिवशी दुपारी संजनाच्या कंपनीसोबत परत मीटिंग होती. सकाळी नऊ वाजता नेहमीच्या हॉटेलात भेटायचे ठरले होते.


आज सकाळी समीरने घोटून दाढी केली. अंगाला अगदी मापात बसेल असा शर्ट,त्यावर चेक्स ट्राउझर,ब्लेझर,जेल लावून सेट केलेले केस आणि त्यावर सुगंधी डियो.

"सम्या ऑफिसला चालला की मुलगी बघायला?" अमेय म्हणाला.


"समीर भाऊजी प्रेझेंटेशन देतात. फक्त रिपोर्ट लिहीत नाहीत." मागून मेघा म्हणाली.


"ते सगळे प्रेझेंटेशन रिपोर्ट वरच असते. मेघा,तू डान्स सोडून परत कंपनी जॉईन कर."

अमेय जाताना तिला चिडवून गेला.

त्या गोंधळात समीर तिकडून सटकला.


रविंद्र त्याची वाटच बघत होता. समीर येताच त्यांनी डोसा आणि चहा ऑर्डर केला.

"समीर,बोल काय काम आहे?"

"बाबा,आई मुली पहात आहे माझ्यासाठी."

"मग,तुझे वय झालेकी लग्नाचे."

"बाबा,मला एक मुलगी आवडते. पण आपल्या घरात आधी दोन्ही सूना आजीच्या पसंतीने आल्या. आता आईची ईच्छा मोडायला नको."


"सम्या,तुला आता सांगुनच टाकतो. सारिका आणि मनोज तसेच अमेय आणि मेघा हे दोन्ही प्रेम विवाह आहेत."


"काय? पण आजी तर म्हणते.."

" ओरडू नकोस,फक्त तू यातील सगळे गुप्त ठेवणार असलास आणि आईबरोबर थोडेसे खोटे बोललास तर तुझी इच्छा पूर्ण होईल."

असे म्हणून रविंद्रने आधीच्या दोन्ही लग्नात केलेल्या योजना सांगितल्या.


संजना त्याच्या मनात भरल्याने त्याने नाईलाजाने हे सगळे मान्य केले.


"संजना, लवकर ये. ऑफिसला जायचे ना आज ?"
स्वाती जोरात ओरडली.


तेवढ्यात पार्थ जोरात ओरडला,"भेंडी,ताई कसली टवका दिसतेस तू."


त्याबरोबर स्वाती धावत बाहेर आली. सुंदर गुलबक्षी रंगाचा पंजाबी ड्रेस,त्यावर शोभेल असे कानातले,गळ्यातले आणि हातात बांगड्या,कपाळावर टिकली अशा अवतारात समोर उभी असलेली संजना पाहून स्वातीने स्वतःला चिमटा काढला.


"तायडे खर सांग,ऑफिसात नवीन आयटम आलाय का कोणी?" पार्थ संशयाने म्हणाला.


"गप,ते आज मी त्या मीटवड्या सॉरी मासवड्या नेते टिफीन चला निघते."

संजना कशीबशी बाहेर पळाली. तिच्या मनात प्रेमाचे व्हायोलिन वाजत होते.


समीर आईशी खोटे बोलेल?

संजना लग्नाला तयार होईल?


मेघा आणि सारिका संजनाला शोधतील?

वाचत रहा.

आम्ही बाई सूना.

©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all