आम्ही बाई सूना भाग 2

सून शोधायची धम्माल गोष्ट.

आम्ही बाई सूना भाग 2


मागील भागात आपण पाहिले रंजूताई त्यांच्या दोन सूना जो वेंधळेपणा करतात त्याला वैतागलेल्या असतात. आता तिसरी सून आपण पसंद करायची असा त्या पण करतात. इकडे त्यांच्या सासूबाई देखील तिसरी नातसून शोधायला लागतात. आता ह्या धमाल विनोदी कथेत पुढे काय होणार पाहूया.



साष्टांग लोटांगण घातलेला आपला नवरा बघून रंजूताई कसेबसे हसू आवरत त्यांना उठवायला पुढे झाल्या.


"नुसते बसून वजन वाढले आहे. जरा हालचाल करा." त्यांनी रवींद्रला उठवत असताना टोमणा मारला.


"अजूनही पार्कात म्हाताऱ्या माझ्याकडे वळून बघतात आणि रविंद्र महाजनी सारखेच दिसतात नाही असे म्हणतात."


"त्यालाच भुलली माझी ताई आणि आई बाबा देखील. ताई तर स्थळ आल्यावर म्हणाली रविंद्र रंजना मस्त जोडी जमेल. पण म्हणतात ना काय भुललासी वरलिया रंगा."

रंजूताई देखील परतफेड करत होत्या.


"गरीब नवरा पडलाय त्याला जरा बाम वगैरे लावायचे ते सोडले."


"गरीब? अग बाई! तो शब्द लाजेने मरेल. थांबा आणते बाम. घरातल्या घरात पडतोच कसा हा माणूस?"

तेवढ्यात त्यांचे लक्ष फळांच्या सालींकडे गेले.


"वाटलेच मला. कधी सुधारणार ही सारिका. आता म्हातारा खुब्यात मोडला असता तर?"


त्या मुद्दाम मोठ्याने बोलल्या.


त्यासरशी पेशंट ताडकन उभा राहिला.


"म्हातारा कोणाला म्हणालीस?" बायकोच्या हाताने बाम चोळून घ्यायचा प्लॅन फसला.


तेवढ्यात वरच्या हॉल मधून जोरात किंचाळी ऐकू आली आणि रविंद्र धावत वर गेला.


ते काही नाही मला छान आणि स्वयंपाकात हुशार सून शोधायलाच हवी. रंजनाताईंनी आता हा मनाशी दृढ निश्चय केला. तेवढ्यात त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुप वर एक नोटिफिकेशन आले. सुवर्णाने कुठला तरी रेसिपी व्हिडिओ शेअर केला होता. आता वेळ नसल्याने तो नंतर पाहायचा ठरवून त्या शांतपणे चहा प्यावा असे ठरवून आत गेल्या.


तेवढ्यात फोनवर सासूबाई असे नाव झळकले. त्यांनी पटकन फोन उचलला.


"रंजना,तुला एका मुलीची माहिती पाठवली आहे. बघून घे. हुशार आहे मुलगी चांगली ते आय. टी का काय त्यात कामाला आहे."


सासूबाई कौतुकाचे पुल बांधत होत्या. इतक्यात दारावर बेल वाजली आणि ह्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नंतर फोन करते असे सांगून त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली.



दरवाजात मेघा आणि रविंद्र. मेघाचा पाय मुरगळला होता. रंजनाताई काही बोलणार एवढ्यात रविंद्ररावांनी गप्प राहायची खूण केली.



तरीही रंजूताई बोलल्याच.

"काय ग कुठे धडपडलीस?"


"आई अहो गिरकी घेताना छतावर पाल दिसली."


"अग बाई हो का? डायनासोर दिसला असे सांगतेस. घरी पाल दिसत नाही का?"


"अहो आई पाल अर्धीच गिरकी घेत होती आणि एक बीट सोडत होती." मेघा म्हणाली.


"काय? पाल नाचते? मेघा डोक्यावर पडलीस का?"


"एक मिनिट,आई पाल म्हणजे सूमा मावशी. त्या रोज त्यांच्या छतावर येऊन फुकट डान्स शिकतात."


"ह्या,तिला आधीच डान्स येतो. तू माझ्या मैत्रिणीला पाल म्हणालीस मेघा?"


"मी कुठ? बाबाच म्हणतात ती पाल सतत लक्ष ठेवून असते."


"मेघा चल,आपल्याला औषध लावायचे आहे." कसेबसे रविंद्र तिला आत घेऊन गेला.


"ही एक काय तर म्हणे नृत्य शिक्षिका. कुठे काय बोलायच आणि काय लपवायच बाईच्या जातीला कळायला नको."

रंजूताई बडबडत फोन हातात घेऊन आत गेल्या.



आता दुपारी मस्त झोप काढून मग सुमा बरोबर मंदिरात जायचा त्यांचा प्लॅन होता. त्यांनी मस्त ताणून दिली.


इकडे रविंद्रराव मेघाला म्हणाले,"मेघा अग तुला कधी कळणार?"


"काय बाबा? आता मी काय केले?"


"काही नाही. तरी तुझे बाबा म्हणाले होते आमची पोरगी आहे हुशार पण बोलण्यात मार खाते."


तिला आराम करायला सांगून ते हळूच मित्राकडे सटकले.



संध्याकाळी सारिका बँकेतून आली.

"मेघा! मेघा कुठे आहेस?" ती ओरडतच आत शिरली.


मेघा लंगडत बाहेर आली.


"काय ग? कुठे धडपडली?"

"काही नाही थोड लागले आहे. तुम्ही काय म्हणत होता?"


"ये तू मला अहो वगैरे नको म्हणू. मला अगदी सासूबाई असल्यासारखे वाटते. दे टाळी."


"टाळ्या नंतर द्या. आधी जरा स्वयंपाकाचे बघा. झालेच तर सासूला चहा पाजा वेळेवर."

मागून आवाज आलाच.


"आई,मी काय म्हणते." सारिका जरा गोड आवाजात म्हणाली.


"म्हणू नकोस बनव. चहा आणि तोही लवकर."


"आई,चहा तर तुम्ही रोजच पिता. आज मस्त दलगोना कॉफी प्या ती पण माझ्या हातची."

सारिका एवढे बोलून आत पळाली.


आता ही बया आणखी काय उपद्व्याप करते? अंदाज घ्यायला रंजूताई किचनजवळ असलेल्या टेबलजवळ उभ्या राहिल्या.



"ताई तुम्हाला दलगोना कॉफी येते?" मेघा मोठे डोळे करत म्हणाली.


"छे! म्हणून तर पहिली कॉफी आईना पाजू."


"ते तर आहेच. पण कृती कशी कळणार."


"ही आहे ना. सुगरण संजनाचे स्मार्ट किचन नावाचे ॲप आहे. त्यावर बघू."

सारिका हसली.


इकडे सासूबाई मैत्रिणींचा ग्रुप चेक करत होत्या. सुलीने एक लिंक टाकली होती.


खाली लिहिले होते," माझ्या भाचीचे ॲप आहे. सुगरण संजनाचे स्मार्ट किचन नक्की आवडेल सगळ्यांना."


रंजूताईंनी लिंकवरून ॲप डाऊनलोड केले. त्यावर दलगोना कॉफी लिहिले. त्याबरोबर व्हिडिओ दिसला. सुंदर,नीटनेटकी तयार झालेली संजना,त्याहून स्वच्छ असलेले किचन आणि तिचे मधाळ गोड बोलणे.


"वा,सून असावी तर अशी."

क्षणात रंजू ताईंच्या डोक्यात विचार चमकला.

मंदिरात सूली भेटेलच. त्या विचारात असताना सारीकाने कॉफीचा मग हातात दिला. सारिका जायला वळली.


"कॉफी छान झाली ग संजना."


मागून आवाज आला आणि सारिका अवाक झाली. तिने पटकन आत येऊन एक घोट कॉफी पिऊन पाहिली.


"मेघा,काहीतरी सॉलिड लोचा आहे?"


"काय? कॉफी पिऊन आईना काही झाले की काय?"


"गप ग,त्यांना काही होत नसते. ही कडू कॉफी पिऊन त्या मला चक्क म्हणाल्या कॉफी छान झाली संजना."


"ये संजना कौन है भाई?" दोघी एकदम म्हणाल्या.


"भेंडी,आपल्या कॉफी व्हिडिओ वर सगळ्या ओल्ड वूमन कमेंट करत आहेत." संजना फोन चेक करत ओरडली.


"बघू, अगबाई! ह्या सगळ्या वन्स आणि त्यांच्या मैत्रिणी." आई नाक मुरडत म्हणाली.


"आपल्याला लाईक पायजे मदर." संजना ओरडली.


"संजे, एकतर तू फक्त हे सगळे बनवायची ॲक्टिंग करते. ते सगळे मी आधीच स्टेप बाय स्टेप बनवून ठेवते. तू शिक ना त्यापेक्षा स्वयंपाक."


"काय? आई भेजा नको खाऊ."


"काय ही तुझी भाषा? कसे होणार..."


"तुझ्या सासूचे." संजना,तिचा लहान भाऊ पार्थ आणि बाबा एका सुरात ओरडले.


" ते काही नाही. आता हिच्या गळ्यात सासू नावाची वेसण बांधायलाच हवी."

आईने आपला निर्धार जाहीर केला.


"मदर,मी ऑफिसला चालले. शामला खोया पनीर ॲप वर भेजायचे आहे."


"तरी मी सांगत होते नको सी बी एस सी. आता ऐका ही मुक्ताफळे."


संजनाच्या आईने आपल्या मोठ्या मुलीला फोन करायला घेतला.



काय होईल पुढे? संजना रंजू ताईंची सून होईल?


वाचत रहा.


आम्ही बाई सूना.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all