आम्ही बाई सूना भाग 5

लाडक्या सुनेच्या शोधाची दोडकी गोष्ट
आम्ही बाई सूना भाग 5


मागील भागात आपण पाहिले की आपल्या भावांच्या लग्नाचे रहस्य समीरला समजते. इकडे संजनाची आई तिच्या लग्नासाठी मागे लागते तर तिकडे संजना कोण आहे? याचे उत्तर इतर दोन सूना शोधत असतात. आता पाहूया पुढे.


" सूले,पत्रिका पाठवते. आधीच जुळवून घेऊ. मला तुमची संजनाच सून म्हणून हवी आहे."
रंजनाताई अगदी हळू आवाजात बोलत होत्या.

" रंजे,जरा मोठ्याने बोल. मला नीट ऐकू येईना."

" सुले,बहिरी आहेस पहिल्यापासून. इकडे आजूबाजूला खूप फितूर आहेत बाई."

" आता कसे मोठ्याने बोललीस. अग पण फितूर कोण?"

" तुला सांगते नंतर आधी तू माझे काम कर बाई. ठेवते फोन आमच्या थोरल्या जाऊबाई येणार आहेत. "
फोन ठेवून रंजना मागे वळली.


" जयश्री वहिनी येणार आहेत सांगितले नाहीस मला?"
रविंद्रने विचारले.


" तुमच्या भावाने सांगितले असेलच की. आम्ही जावा कशाला त्यात पडू."
रंजना नाक उडवत निघून गेली .



"सारिका,आपल्याला आईंचा फोन हवाय."

"काय? कशाला पण ?"
सारिका किंचाळली.


" त्याशिवाय संजना कोण? हा प्रश्न उलगडणार नाही."
मेघा शांतपणे म्हणाली.


" हे बघ मेघा, एकवेळ मी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजेल पण आईंचा फोन ! तू दुसरा उपाय शोध."
दोघींची चर्चा चालू असतानाच हाक आली.


"मनुड्या, ये मनुड्या."

" आई मी इकडे आहे माझ्या खोलीत. "

त्याबरोबर सारिका अलर्ट मोडवर जाऊन वेगाने तिथे पोहोचली.
तोपर्यंत सासूबाईंचे देखील आगमन झाले होते.




" अगबाई, तू पण आहेस का इथे?"
सासूबाई तोंडावर उसने हसू आणून म्हणाल्या.


" हो आई,आता ह्या नवरा माझा मग ही खोलीही माझीच की. " सारिकाने दात विचकले.

" आई,काही काम होते का?"
मनोज पटकन म्हणाला.

" मनुड्या, जयश्रीकाकू येतेय आज संध्याकाळच्या गाडीने. येताना तिला घेऊन येशील?"

" एवढेच ना ! आणतो की."
त्याने उत्तर दिले.

" बघ बाबा,नाहीतर बँकेतून परस्पर कुठे जायचा बेत असायचा." बाहेर जाताना त्या हळूच पुटपुटल्या.


" मनुड्या! की चालला मनुड्या पळत. कधी मोठा होणार काय माहित."

सारिका नक्कल करून हसायला लागली.


" सारिका ते लाडाचे नाव आहे माझे."
मनोज चिडला.


" हो का ? माझेही आहे असे नाव. पण आई चारचौघात म्हणत नाही माझी. "
सारिका मेघाला बातमी सांगायला गेली.



संजना ऑफिसात आली आणि सगळे तिच्याकडे बघतच राहिले.


" संजना,कांदेपोहे का?" शर्मा म्हणालाच.

" जस्ट चेंज शर्मा अंकल."
ती अंकल ह्या शब्दावर जोर देत म्हणाली.


तेवढयात समीर समोरून चालत येत होता. त्याच्या सावळ्या रंगाला शोभून दिसणारे बलेझर, चेहऱ्यावर शोभणारी रुबाबदार मिशी, बांदेसुद शरीर. संजना बघतच राहिली.


"कसला हॉट आहे ना हा !" स्विटी हळूच म्हणाली.


तितक्या वेळात तो पुढे निघून गेला. त्याची नजर मात्र संजनावर अडकून पडली होती. संजना आणि तिचे बॉस आत आले. जेवणाची वेळ असल्याने जेवण झाल्यावर मीटिंग होणार होती.



कंपनीच्या ऑफिसमध्ये असलेल्या व्ही. आय. पी. डायनिंग हॉलमध्ये ते जेवायला बसले. तेवढ्यात संजनाने सर्व्ह करणाऱ्या मुलाकडे हळूच डबा दिला.


जेवण करताना समीरच्या बरोबर आलेले बॉस म्हणालेच,"मिस संजना, ह्या वड्या तुम्ही घरी केल्यात का ?"


आता समोर समीर बसलेला होता. आईने केल्यात असे सांगता येणार नव्हते.


" हो सर, मला असे पदार्थ बनवायला खूप लाईक आहे. माझं ॲपसुध्दा आहे. संजनाज स्मार्ट किचन नावाचे."


त्यावर ते म्हणाले," मिस संजना वयाच्या अधिकाराने सांगतो तुमचा होणारा नवरा लकी असेल बरं का!"


त्यावर संजना लाजली आणि तिने हळूच समीरकडे पाहिले. त्यानंतर मीटिंग झाली आणि डील फायनल झाली. संजना घरी जाताना देखील समीरच्या स्वप्नात रंगलेली होती.


इकडे डान्स चालू असताना देखील मेघाच्या मनात एकच प्रश्न नाचत होता. ही संजना आहे तरी कोण?

शेवटी तिने त्यासाठी सासुबाईंवर पाळत ठेवायचे ठरवले.


" बाबा, ही घ्या कॉफी तुम्हाला आवडते तशी स्ट्राँग."
मेघा हळूच म्हणाली.


"काय काम आहे मेघा." रविंद्र हसला.


"काय हे बाबा,मी आपले सहज बनवली आहे."

"बर,छान झाली बर कॉफी."
मेघा तिथेच घुटमळत होती.


शेवटी ती म्हणालीच,"बाबा, आईंवर पाळत ठेऊन संजना कोण आहे हे मला शोधून द्याल?"


"एवढेच, थांब जरा." त्यांनी फोन बाहेर काढला आणि एक नंबर डायल केला.
"हाय शरयू कशी आहेस?"

मग फोनवर पंधरा मिनिट फ्लर्ट केल्यावर फोन संपला.


"काय बाबा,ही शरयू कोण?"

" मेघा हळू बोल, शरयू हिची मैत्रीण आहे."


"ह्या,मग आपल्या घरी कधी आल्या नाहीत त्या."

" ते तुला नंतर सांगतो, संजना ही सुलूची भाची आहे."


"काय? सुलू मावशी म्हणजे त्याच ना माझ्या आईच्या जवळ राहतात."

" हो तीच. आता पुढची माहिती तू शोध."


"बाबा,पण हे शरयू प्रकरण काय आहे?"

तेवढ्यात रंजुताईंची चाहूल लागली आणि दोघे गप्प झाले.



संजना घरी पोहोचली.

"मॉम,मॉम कुठेय यार."
संजना ओरडली.


"संजू,आई आजारी आहे."
श्रीरंग बाहेर आले.


" काय, थांबा मी बघते." संजना पळतच आत गेली.


डॉक्टर आईला तपासत होते.

"वंदू मावशी काय झालेय आईला?" संजना काळजीत पडली.


" तिचा बी. पी. शूट झालेला. आता काही दिवस शक्यतो तिच्या मनासारखे वागा. तिला त्रास देऊ नका."

डॉक्टर वंदना स्वातीची बालमैत्रीण होती.


"आई,तू आराम कर. मी करते आज स्वयंपाक. पण अचानक कसे झाले असे?"


"अग, सुलुने कोणाची पत्रिका पाठवली होती ती जुळवायला गेलेली उन्हाची." बाबा म्हणाले.


संजना चिडली पण डॉक्टरांचे बोलणे आठवून गप्प झाली.


"संजू,माझे एक ऐकशील,आपण हा मुलगा पाहूया ना !"


आईने असे म्हणताच यांत्रिक पद्धतीने होकारार्थी मान हलवून संजना बाहेर गेली.


त्याबरोबर खोलीचे दार लावून स्वाती गाऊ लागली. "किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला."


" हळू,तिने ऐकले तर?" श्रीरंग म्हणाला.


" तुम्ही जा हो लेकीला मदत करा. मी पुढचे ठरवायला लागते.


समीर घरी आला तेव्हा सुमा काकू आणि आई चहा पित होत्या.

"काय आईसाहेब,तुमच्या दोन्ही सूना कुठेय?"


"एक बँकेतून येत असेल आणि दुसरी गेली माहेरी नाचायला. आता तुझे लग्न झाले म्हणजे मला काय ते सुख मिळेल बघ."


त्यांनी डोळ्यातून पाणी काढले.


"आई,अग एवढी काय घाई आहे?" समीर कसेबसे म्हणाला.


" नाही हा रंजू,सगळे वेळेत झालेले बरे. पावसकरीन बाईचा अवधूत उशीर झाल्याने त्याचे लग्नच जुळत नाही बघतेस ना?"


सुमा म्हणाली.


"समीर,ऐक ना सुलामावशीने एक मुलगी सुचवली आहे. आपण फक्त बघुया. तुला आवडली तर ठीक."

घरी कोणी नसलेले पाहून रंजना ताईंनी समीरला बरोबर तयार केले.


समीर आत जाताच त्या आनंदाने गाऊ लागल्या,"येणार येणार ग,सून लाडाची येणार ग. संजना माझी लाडाची येणार ग."


असे म्हणून त्यांनी गिरकी घेतली आणि दारात उभ्या सारिका आणि मेघाला पाहून तशाच स्तब्ध उभ्या राहिल्या.


तेवढयात सुमा म्हणाली,"रंजु, चल लवकर कीर्तन सुरू झाले असेल."

दोघी गडबडीत बाहेर पडल्या.


सून कोणाच्या पसंतीची येणार?

लग्न झाल्यावर ती तशीच लाडकी राहणार का?

लग्नापूर्वी लाडकी असलेली सून नंतर दोडकी का होते?

वाचत रहा.

आम्ही बाई सूना.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all