अजून किती काळ करायचे

कथा आईवडीलांची
अजून किती काळ करायचे...

विषयः नाती जपताना

"सकाळी सकाळी कोण बेल वाजवतं आहे. बघता का जरा?" कुशीवर वळत सुमतीताई म्हणाल्या.

"अजून कोण असणार? असेल तुमचाच लेक.. आई चहा टाक लवकर.." कुरकुरत प्रदीपराव म्हणाले.

"काहीही.. तो कशाला येईल? तो आहे का इथे? परदेशात त्याला उचक्या लागत असतील. तुम्हाला उठायचं नाहीतर नका उठू. उगाच सकाळी सकाळी माझ्या लेकाला नावं नका ठेवू." उठत सुमतीताई म्हणाल्या आणि पटकन बसल्या. ते बघून प्रदीपराव पटकन उठले.

"काय गं.. काय झालं अचानक?"

"गुडघ्यात कळ आली पटकन."

"मग आवरा स्वतःला. आपण षोडशीच्या कन्या नाहीत हे ठसवा मनावर."

"आता घाईघाईत उठताना हे होणारच ना.. तो बाहेर दरवाजावर पण जो कोणी असेल तो आग लागल्यासारखा दरवाजा वाजवतो आहे. जरा धीर धरवेना त्याला." सुमतीताई वैतागल्या होत्या.

"बघतो मी." प्रदीपराव दरवाजा उघडायला गेले. तोपर्यंत अजित, त्यांचा मुलगा दरवाजा उघडून आत आला सुद्धा.

"हे काय? दरवाजा का नाही उघडला माझ्यासाठी?" हातातली बॅग खाली ठेवत त्याने चिडून विचारले.

"वाजलेत किती?" प्रदीपरावांनी घड्याळ दाखवले.

"पाच.. ते तुम्ही लवकर उठता ना?" अजित खजील होऊन म्हणाला.

"नाही.. आम्ही नाही उठत. आणि काल रात्री आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. येईपर्यंत उशीर झाला. मग.."

"अरे पण तू अचानक कसा आलास? काहीच कळवलं नाहीस." अजितचा आवाज ऐकून सुमतीताई बाहेर आल्या होत्या.

"अगं तिकीट मिळालं आणि लगेच निघालो. उतरलो, तसाच पळत इथे आलो. आई.. चहा कर ना गं. तिथे मी काय मिस केलं असेल तर तुझ्या हातचा चहा आणि जेवण."

"तसंच तिलाही मिस केलं असतं तरी चाललं असतं." प्रदीपराव म्हणाले.

"काही म्हणालात का बाबा?"

"काही नाही.. घरी नाही का गेलास तुझ्या? मयुरीला माहित आहे का, तू इथे आला आहेस ते?"

"तिला सांगितलं होतं निघताना. ती आणि पियु झोपल्या असतील ना आता.. म्हणून.."

"म्हणून तू इथे आलास.. बरं.. चालू देत तुमचं. मी आत जाऊन पडतो." प्रदीपराव आत जात म्हणाले.

"आई.. चहा.. खूप दमलो आहे गं प्रवासाने." अजित बापडे तोंड करुन म्हणाला. सुमतीताईंना गलबलले. स्वतःचे दुखरे गुडघे धरून त्या उठल्या आणि चहा करायला गेल्या. एवढा प्रवास करून आलेला मुलगा.. काही खाल्लं असेल नसेल विचार करत त्यांनी एका बाजूला पोहे भिजवले आणि कांदा चिरायला घेतला. पोटभर पोहे खाऊन अजित झोपायला गेला. अवेळी मोडलेली झोप काय आता परत लागणार नाही, हा विचार करुन सुमतीताई कामाला लागल्या. अजित आला आहे तर तो जेवूनच जाणार, याची खात्री असल्याने त्यांनी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायला घेतला. तो उठेपर्यंत खरंच त्यांनी सगळं तयार ठेवलं होतं. जबरदस्तीने प्रदीपरावांना खाली पाठवून आम्रखंड आणायला लावलं होतं. अजित उठेपर्यंत त्यांचा सर्व स्वयंपाक झाला होता. तो उठताच त्यांनी पुर्‍या करायला घेतल्या. अजितचे जेवण चालू असतानाच मयुरीचा फोन आला.

"अजित, आहेस कुठे तू? सकाळी येणार होतास ना?"

"हो.. आईकडे आलो आहे. जेवून निघतोच." अजित तोंडात घास कोंबत म्हणाला.

"बाबा, तू आजीकडे आहेस?" दोघांचे बोलणे पियु ऐकत होती.

"हो.. आणि आता आम्रखंड आणि पुरी खातो आहे."

"बाबा, मला पण हवी. सांगा ना आजीला." पियु हट्ट करत म्हणाली.

"मी का सांगू?" अजित चिडवत म्हणाला.

"बाबा.. मग मी कट्टी घेईन हं.."

"बरं बाई.. आणतो तुलासुद्धा. चल बाय.. जेवण झालं की निघतो लगेच." बोलल्याप्रमाणे अजित जेवण झाल्या झाल्या लगेच निघाला.

"आई, पियुसाठी डब्बा देतेस ना?"

"धर.. तयारच आहे." सुमतीताई डबा देत म्हणाल्या.

"आणि उद्या चहा प्यायला आलास तर तुझ्याजवळ असलेल्या किल्लीने दरवाजा उघडून आत ये. उगाच सकाळी सकाळी बेल नको वाजवत जाऊस." प्रदीपराव म्हणाले. यावर काहीच न बोलता अजित तिथून निघाला.


अजित आणि प्रदीपरावांचे का पटत नसेल? बघू पुढील भागात.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all