अजून किती काळ करायचे.. भाग २

कथा आईबाबांची
अजून किती काळ करायचे.. भाग २


"गेला ना लेक जेवून? विचारले तरी का? आई, गुडघे दुखतात का? काही औषध हवे का? आला, हुकूम सोडला, चहा दे, जेवायला वाढ. काम झालं, गेला पळून. एकदा तरी वाटलं का इथे थांबून आपल्याशी बोलावेसे?" प्रदीपराव चिडले होते.

"असू देत हो.. आपलाच तर आहे तो. त्याच्याशिवाय कोण आहे आपलं?" सुमतीताई पड खात म्हणाल्या.

"आहे की त्याची बायको आणि मुलगी. जावं की त्याने तिच्याकडे. पण नाही. सकाळी उठला की चहापासून सगळं आईनी करायचं आणि हा फिरणार मात्र बायकोसोबत."

"तिचा स्वभाव आपल्याला समजला ना? मग सोडून द्या ना.."

"कसं सोडून देऊ? एकत्र होतो तेव्हासुद्धा तेच.. आणि आता वेगळं राहतो आहोत तरीही तेच. मी सांगतो तुला.. तू अशीच करत राहिलीस ना तरी यांना तुझी किंमत नाही. फक्त कामापुरते येणार तुझ्याकडे."

"येऊ देत. तुम्ही जा बरं तुमच्या मित्रांकडे. तेवढीच माझ्या डोक्याला शांती." सुमतीताईंनी प्रदीपरावांना खाली पिटाळले. थोडा वेळ झोपू म्हणून त्यांनी डोळे मिटले पण डोळ्यासमोर सतत अजितच्या लग्नापासूनच्या घटना येत होत्या. मयुरी.. एका लग्नात अजितला दिसलेली मुलगी. बघताच तो तिच्या प्रेमात पडला आणि हिच्याशीच लग्न करायचा असा हट्ट धरला. मयुरी शिकलेली आहे, घरचे चांगले आहेत हे बघून सुमतीताईंनी सुद्धा आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला. मयुरीलाही अजित आवडला होता. त्यामुळे लगेचच लग्न झाले सुद्धा. लग्न होताच मयुरीचा मूळ स्वभाव वर आला. आधीच आळशी असलेली मयुरी लग्नानंतर कोणत्याच कामाला हात लावायला तयार नसायची. सकाळी नऊला घर सोडलं की थेट रात्री यायची. ऑफिसला सुट्टी असेल तेव्हा दुपारी उठायचे. जेवायचे आणि लगेच फिरायला जायचे. घरात सामान भरण्यापासून, मदतनीस बायकांचे पगार, वेगवेगळी बिले भरणे ही कामेसुद्धा सुमतीताईच करत. यासाठी कधी तिच्या तोंडातून आभाराचा एक शब्दही आला नाही. जसा मुलगा तशीच ही मुलगी असा विचार करून सुमतीताईंनी तिकडे दुर्लक्ष केले.

पण पियुच्या जन्मानंतर परिस्थिती पूर्णच बदलली. मयुरीचे आईवडील तिच्या भावाकडे रहायला गेले होते. त्यामुळे तिचे बाळंतपण सुमतीताईंनीच केले. अजितला मिळालेल्या प्रमोशनमुळे त्याचा घरातला वेळ कमी होऊ लागला होता. बाळ रात्री रडतं म्हणून मयुरी दिवसा झोप काढायची आणि रात्री मदत म्हणून सतत सुमतीताईंना बोलवायची. नातीवर कितीही प्रेम असले तरी सुमतीताईंची धावपळ होत होती. स्वयंपाकाला बाई ठेवली तर तिचा स्वयंपाक प्रदीपरावांना आवडेना. इतर कोणासाठी नाही पण मग त्या बाळासाठी का होईना त्यांना काही ना काही करावे लागेच. मयुरीने हळूहळू पियुची जबाबदारी पण सुमतीताईंवरच टाकली. घरचं, पियुचं त्यांना झेपेनासे झाले. शेवटी प्रदीपराव मध्ये पडले. त्यांनी अजितला घराजवळच वेगळं रहायला लावले. अजित या व्यवस्थेवर नाराज होता पण आईवडिलांची अवस्था तो ही बघत होताच. त्यामुळे नाईलाजाने तो वेगळा राहू लागला. वेगळं राहिल्यावर सुद्धा अजितचं आणि पियुचं जाणयेणं सतत सुरू असायचंच.

"आई, मला मीटिंगला जायचं आहे. पियुला इथे सोडू का?" एक दिवस मयुरीने विचारले.

"राहू दे की.. त्यात काय एवढं?" सुमतीताई पियुला जवळ घेत म्हणाल्या.

"ते तिचं काहीच झालं नाहीये आवरून." मयुरी घड्याळात बघत म्हणाली.

"मी करते तिचं.. तू जा." सुमतीताईंनी त्या दिवशी घेतलेली जबाबदारी आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा कमी झाली नव्हती. पियु फक्त झोपायला आईकडे जायची. बाकी सर्व वेळ इथेच असायची. तिच्या प्रेमाच्या आणि अजितच्या मायेच्या बंधनात सुमतीताई अडकल्या होत्या. जे बंधन त्यांना तोडवतही नव्हते आणि सहनही होत नव्हते.



जमेल का त्यांना यातून बाहेर पडायला? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all