अजून किती काळ करायचे.. अंतिम भाग

कथा आईबाबांची
अजून किती काळ करायचे.. भाग ३


"अजित, तुझा आज संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे?" मेकअप करत असलेल्या मयुरीने विचारले.

"आज शुक्रवार ना.. ऑफिस झालं की मस्त दोन पेग मारायचे.. आणि आराम करायचा." अजित ऑफिसची तयारी करत म्हणाला.

"ऐक ना मग. आपण आज रात्री पबमध्ये जाऊयात? किती दिवस गेलो नाही." मयुरी अजितच्या गळ्यात हात घालत म्हणाली.

"आणि मग पियुचे काय?"

"तिचं काय? ती शाळेतून आल्यावर जाईल आईंकडे. मग राहील तिथेच. आपण उद्या संध्याकाळी घेऊन येऊ तिला."

"ओह्ह.. मॅडम आज फूल रोमँटिक मूडमध्ये? चालेल. आईला सांगतो तसं. बरं डबा आहे का आज?"

"कधी करणार? आज मिटिंग आहे तर तयार होण्यातच वेळ गेला. पियुला पण पैसे दिले आहेत. खाईल कॅन्टीनमध्ये. कधी कधी असं वाटतं की आईबाबांसोबत रहात होतो तर हा त्रास तरी नव्हता." मयुरी सुस्कारा सोडत म्हणाली.

"तू थोडंसं ॲडजस्ट केलं असतं तर??" अजित पुटपुटला.

"काही म्हणालास का?"

"नाही गं.. आईला फोन करून सांगतो. पियु तिथेच राहील म्हणून." अजित फोन करणार तोच सुमतीताईंचाच फोन आला.

"आई.. आत्ता तुलाच फोन करणार होतो." अजित हसत म्हणाला.

"मला समजलं.. म्हणूनच मी फोन केला. ऐक, आज तुम्ही ऑफिसमधून आलात की घेऊन जा. आम्हाला बाहेर जायचं आहे." सुमतीताई म्हणाल्या. ते ऐकून अजितचा चेहरा उतरला.

"आई, अगं मी तेच सांगणार होतो. आज पियुला तिथेच ठेवतो. उद्या घेऊन जातो."

"का? काही महत्त्वाचं काम आहे का?"

"नाही.. म्हणजे हो. आम्ही दोघं जरा पबमध्ये जाणार होतो. यायला उशीर होईल म्हणून." अजित मयुरीकडे बघत म्हणाला.

"पबमध्येच जायचे होते ना? मग तू नंतरही कधी जाऊ शकतोस. आम्ही दोन दिवस मावशीकडे चाललो आहोत. सोमवारी कधी येऊ माहित नाही. तर सोमवारचं पण तुम्हीच बघा काय ते." अजितला बोलायची संधी न देता सुमतीताईंनी फोन ठेवला.

"बरोबर.. हे असंच बोलायला हवं होतंस आधीपासून." प्रदीपराव शाबासकी देत म्हणाले.

"अहो पण पियु? तिचे मधल्यामधे हाल." चिंताग्रस्त होऊन सुमतीताई म्हणाल्या.

"ती जशी आपली नात तशी त्यांची मुलगी आहे ना? करू दे ना त्यांना ही तिचं. तसंही आठवडाभर आपण करतो ना? त्याची त्यांना जाणीव नाही तर मग करुन द्यायला लागते." प्रदीपराव म्हणाले. संध्याकाळी अजित आणि मयुरी सोबतच पियुला न्यायला आले. सकाळी ठरलेला प्लॅन कॅन्सल झाल्याचे दुःख दोघांच्याही चेहर्‍यावर दिसत होते.

"आई, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तू आधी सांगायचं ना मला." अजित तक्रार करत म्हणाला.

"पियु, तुझी ती मैत्रीण मगाशी तुला बोलवायला आली होती. कशासाठी ते बघून येशील का प्लीज." पियुला बाहेर पाठवत सुमतीताई म्हणाल्या. ती जाताच सुमतीताईंनी बोलायला सुरुवात केली.

"तुम्ही सांगता मला? तुम्ही तर नेहमी मला गृहीतच धरता. आणि आठवडाभर पियुला सांभाळल्यानंतर एक दिवस आम्हाला पण आराम हवा हे नाही का सुचत तुम्हाला?"

"तुमच्याच नातीसाठी करता ना? कोणा परक्यासाठी तर नाही ना?" मयुरी म्हणाली.

"मग तुम्हाला कोणासाठी करावे लागते? तुमच्याच मुलीसाठी ना? मुलीचं सोडून दे. तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा काही करू शकत नाही. हा एवढा मोठा मुलगा रोज सकाळी चहा प्यायला इथे येतो. त्यावरूनच समजतं ना?" न राहवून प्रदीपराव म्हणाले.

"मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी ऑफिसची कामे सोडून ही घरातली कामं करायची? मला पगार किती मिळतो, माहित आहे ना? आणि हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलाला सांगा ना. की तो पुरूष म्हणून त्याला सगळं माफ?" मयुरी म्हणाली.

"खरंच.. ही गोष्ट तुम्हा दोघांना समजायला हवी. फक्त पैसे कमावले म्हणजे घर होत नाही. घरातली जबाबदारी पण घ्यावी लागते. एकाने स्वयंपाक बघावा, दुसर्‍याने बाकीचं बघावं. पण नाही.. सोमवार ते शुक्रवार कामं करायची. आणि शनिवार, रविवार मजा मारायची. मग त्यात आईवडील, मुलं यांना गृहीत धरायचे. मुलीला हक्काने इथे ठेवता पण कधी विचारता का रे.. की आईबाबा तुम्ही बरे आहात का? औषधं हवी आहेत का? नाही.. आम्ही बरं आणि आमचा संसार. तिथे आईबापाची भूमिका फक्त केअरटेकरची. ती पण बिनपगारी? अजून किती काळ करायचे आम्ही हे.." सुमतीताईंनी विचारले. यावर निरुत्तर होऊन अजित आणि मयुरी मान खाली घालून उभे राहिले.


कमावणारी सून आणि सासवा.. संशोधनाचा विषय. कधी सुनेची धावपळ न बघता सासूबाई तिच्यावर आपले विचार लादत असतात तर कधी सून आपल्या सोशीक सासूबाईंचा फायदा घेते. दोन्ही गोष्टी आपल्या आसपास दिसत असतात. कमेंटमध्ये बर्‍याचदा प्रश्न विचारले जातात की अजूनही अश्या सासवा असतात का? मागेही सांगितलं होतं, आत्ताही सांगायला आवडेल. एखादी स्त्री बाहेर कितीही चांगली असली तरी ती जेव्हा सासू होते तिला काय होतं समजत नाही. असो.. एवढं शिकून काय फायदा आणि ही कथाही अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे. असो.

या कथेचे व्हिडिओ रुपांतरण करण्यास सक्त मनाई आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all