अव्यक्त 2

अव्यक्त

घरात कायम येणं जाणं असलं तरी कांचनसोबत तो अंतर ठेवून असायचा. लोकांना बोलायला जागा नको की वडील गेले आणि मुलगा शिरला घरात.

कांचनला त्याचं येणं, त्याची मदत करणं आवडायचं. खरं तर लहानपणापासून तो तिला आवडत होता. पण जात आणि समाज जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून खोटी स्वप्न पाहण्यात अर्थ नाही हे तिला समजत होतं.

मुळात हे प्रेम त्यानेही दाखवलं असतं तर कदाचित तीही वाहवत गेली असती. पण तिलाही समजलं की हे प्रेम एकतर्फी आहे..

एके दिवशी घरात कुणी नसतांना पराग घरी आला, कांचन एकटीच होती. दोघांची नजरानजर झाली..

"मला घरातून जळण्याचा वास येतोय.. काही ठेवलंय का गॅसवर?"

कांचनला लक्षात आलं आणि ती धावत गॅस जवळ गेली..

दूध जळून गेलंच होतं सोबतच गॅस शेजारी तिने वर्तमानपत्र ठेवलेलं अगदी जवळ, त्याने पेट घेतलेला..पराग पटकन आत आला आणि त्याने आग विझवली.

कांचनकडे रागाने बघत म्हणाला,

"लक्ष कुठे होतं तुझं? मला बाहेरपर्यंत वास येतोय आणि तुला समजलं सुदधा नाही? काही झालं असतं मग?"

तेवढ्यात आई आणि मावशी आत शिरले,त्यांना सगळा प्रकार समजला..कांचनला दोघींनी चांगलं झापलं.

पराग निघून गेला आणि आई त्याच्याकडे बघतच राहिली..कांचनच्या वडिलांची तिला आठवण झाली, तेही असेच चिडायचे काळजीपोटी.. घरात जरा काही घडलं की सर्वांना सूनवायचे.

कांचनला मात्र चांगलाच राग आला..एवढं ऐकवायची काय गरज होती याला? आई आणि मावशीचे बोलणे खावे लागले उगाच.

तेव्हाच मावशीच्या डोक्यात विचार आला,

कांचन आणि पराग एक झाले तर?

आईलाही मनोमन वाटत होतं, पण...जात...समाज....

🎭 Series Post

View all