अव्यक्त 3

अव्यक्त

कांचनसाठी स्थळं बघण्यास सुरवात झाली होती. एकही स्थळ पसंत पडत नव्हतं. घरी पाहुणे मंडळी यायची. पराग तेव्हा एक जबाबदार व्यक्ती या नात्याने तिथे हजर असायचा. पाहुण्यांशी तोच बोलायचा... सगळी चौकशी करायचा..

कांचन ला राग यायचा,

"वेड्या तुझ्याशीच लग्न करायचं आहे मला, कळत कसं नाही?? तूच येऊन बसतोस माझ्या लग्नाच्या बोलणी साठी...वा, काय नशीब आहे माझं.."

एकामागून एक मुलं पाहायला यायची. का कोण जाणे पण पराग त्या मुलांकडे जरा रागानेच पाहायचा. पाहुणे गेली की प्रत्येक स्थळ कसं वाईट आहे हे सांगायचा. आईलाही त्याचं पटायचं. प्रत्येक स्थळाला नकार जात होता.

एकदा परागला महिनाभर कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागलं. परागच्या आई वडिलांनाही त्याच्या लग्नाची काळजी होती. त्यांचीही ईच्छा होती की कांचनसारख्या संस्कारी मुलीला सून करावं, पण परागने स्पष्ट सांगितलं होतं की समाज बोल लावेल असं काहीही आपल्या आणि त्यांच्या कुटुंबाने करायचं नाही...

पराग बाहेरगावी गेला, कामात रुळला. एक दोन दिवसांनी आई वडिलांना फोन करत असे. पण नंतर ट्रेनिंग सुरू झालं आणि फोन बंद ठेवावा लागे. संध्याकाळी आल्यावर आई वडिलांना दोन करत असे. एकदा असंच कांचनच्या आईचा मिस call त्याने पाहिला. संध्याकाळी फोन करू असं ठरवत तो रूमवर जायला निघाला तोच धुवांधार पाऊस सुरू झाला. त्याचा फोन भिजला आणि बंद पडला.

आता घरी गेल्यावरच नवीन घेतो असं ठरवत तो आई बाबांशी एक दोन वेळा बोलला.

जेव्हा घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं,

कांचनच्या घरासमोर मंडप टाकलेला, सनईचे सूर वाजत होते,

त्याची धाकधूक वाढली होती..आणि शेवटी तेच झालं,

त्याला कळलं, की कांचनचं लग्न ठरलं. आपण इथे नव्हतो याचं त्याला वाईट वाटू लागलं.

"पराग, आलास? बरं झालं वेळेवर आलास..कितीतरी कामं आहेत बघ...आवर आणि ये.. आज सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे.."

आलोच..

पराग आवरून आला,

"पराग, ती माळ लाव बरं तिकडे दारावर.."

पराग विचारात पार मग्न झालेला, माळ हातात घेतली आणि शेजारच्या माने काकूंच्या दारावर लावून आला,

"ओय... तिथे कुठे?"

पिंट्या पटकन गेला आणि माळ काढून घेतली,

"पराग बरा आहेस ना?"

"मला कसंतरी होतंय, आलोच मी.."

पराग घरी गेला आणि खोलीचं दार लावून घेतलं..

🎭 Series Post

View all