बंधन नात्यातले.. भाग तीन अंतिम

गोष्ट त्या एकरूप झालेल्या जीवांची...
त्याला आठवलं रमा आजारी असताना अचानक एक दिवस त्याचा हात हातात घट्ट पकडून बसली होती.

"काय झालं असे गप्प का आहात.? किती वेळ झाला तुम्ही काहीच बोलले नाही."

"रमे मी तुला आजवर काहीच सुख देऊ शकलो नाही. खुप अपराधी वाटत मला."

"सुखाची परिभाषा काय असते ओ? मौल्यवान वस्तू की अमूल्य साथ जी कठीण काळात सोबत लढण्याचं बळ देते..? भरपूर पैसा की पै पै करत जमवलेला संसार..? टुमदार बंगला की ज्या घरात पहिलं पाऊल पडल्यानंतर आपल सुख दुःख बघितलेल्या ह्या भिंती..? सुखाच्या परिभाषा भरपूर आहेत.. ज्याने त्याने आपापल्या परीने विचार केलेल्या.." विनायक तिच्या डोळ्यांत पाहत राहतो.

"का थांबलीस माझ्यासोबत? मी कधीच तुला आई होण्याचं सुख देऊ शकत नाही माहीत असताना देखील तु माझी साथ देत आलीस."

"आई पेक्षा बाबा होण खुप कठीण. एकदा जवाबदारी उचलली की त्यातून सुटका नाही. भक्कम झाडा सारखं आपला पाया घट्ट रोवत इतरांना आयुष्यभर आपल्यात सामावून घेत, आलेल्या वादळी संकटाना एकटे सामोरे जाण. पाहिलय मी तुला आयुष्यात कितीतरी वेळा बाबा होताना."

"कधी कधी वाटतं की काय खरं आणि काय खोटं.!"

"ह्या खोट्या दुनियेत मला खरी साथ देणारा भेटला, हे खरं!"

"साथ दिली म्हणजे सुख देऊ शकलो का काही? काय म्हणायचं ह्याला? बंधनात अडकली अशील ना?" विनायक हताश होऊन म्हणाला.

"हो बंधन तर आहे पण ही प्रेमळ बंधन असतात नात्यातली. ज्याच्या गाठी देवाने आधीच बांधून ठेवलेल्या असतात." असं म्हणत दोघे खुदकन हसून एकमेकांच्या मिठीत सामावले. असा कितीतरी सोनेरी काळ त्यांनी सोबत घालवला. सगळे क्षण त्याच्या डोळ्यांपुढे तरळत जात होते. व्हेंटिलेटर वरच्या रेषा आता सरळ दिसू लागल्या. इतका वेळ भावनांना घट्ट आवर घालून बसलेल्या विनायक ला असह्य झालं आणि त्याचा बांध फुटला. 

आणि रमाने विनायक च्या साक्षीत जगाचा निरोप घेतला. डॉक्टर आणि नर्स ची धावपळ सुरु झाली. तसा तो हुंदके आवरत आय.सी.यू च्या बाहेर पडला. रमा शिवाय उरलेलं आयुष्य आता पासूनच भकास वाटू लागलं होतं. तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिल्यावर त्याला आश्रमातील सगळी मुलं मुली गोळा झालेली दिसली. त्यांना पाहताच त्याला रमेचे शब्द आठवले. "माझ्या रमेची ही बंधन आहेत नात्यातली." विनायक मनोमन म्हणाला.

"बाबा आता तुम्ही एकटे नाहीत. रमाई इथेच आहेत. आणि आम्ही सगळे सुद्धा." असे प्रेमळ शब्द कानावर पडताच विनायक च्या चेहऱ्यावर पुसट हास्याची लकेर उमटली. आणि त्याला त्याच्या उरलेल्या जीवनाचा अर्थ मिळाला.

- समाप्त