बंधन नात्यातले.. भाग दोन

गोष्ट त्या एकरूप झालेल्या जीवांची..
मनातल्या यातना अश्रुंवाटे वाहत जायच्या. तिला लेखनाची आवड असल्याने आपलं सुखं दुःख सगळकाही ती कागदावर उतरवायची.

आईपण नक्की म्हणजे काय ?

स्वतःला विसरून घराला आपलंस करणं,
म्हणजे आईपण..
इतरांच्या दुःखावर मायेने फुंकर घालणं,
म्हणजे आईपण..
सुखात कमी, दुःखात वाटेकरी असणं,
म्हणजे आईपण..
वासरू दुसऱ्याचे असूनही त्याला प्रेमाने गोंजारण,
म्हणजे आईपण..
प्रत्येक जीवाला जीव लावत आईपण मिरवण,
म्हणजे आईपण..

आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर
ह्या दोन शब्दांत दुनिया सामावली,
आईचं रूप न मागताच मिळतं कारण
प्रत्येक स्त्री जन्मतःच असते माऊली..

ज्या गोष्टींना समाज इतका कठीण करून बसतो त्याला किती साध्या, सरळ आणि सुंदर पद्धतीने त्या गोष्टींची व्याख्या लिहायची..

क्षण क्षण जगला होता तो तिच्यासोबत आणि आज तीच रमा, क्षणा क्षणाला विनायक च्या हृदयाचे ठोके वाढवत होती. आय.सी. यू मधल्या निपचित पडून असलेल्या रमा कडे विनायक काचेतून निर्विकार चेहऱ्याने एकटक पाहत बसला होता. मनात असलेल्या विचारांना बाजूला करत तो आय.सी.यू. च दार ढकलत आत हळू हळू तिच्या दिशेने चालू लागला.

"तिच्या समोर जाऊन रडू नका. व्हेंटिलेटरवर असलेल्या माणसांना कळतं सगळं. ते ऐकत असतात. सकारात्मक बोला, प्रतिसाद सकारात्मक येईल. बाकी सगळं देवाच्या हातात.." कोणा एका त्याच्याच नातलागाचे शब्द त्याच्या कानावर पडले होते. ते त्याला ह्या क्षणी आठवत होते. आपल्या प्रिय व्यक्तीला अस निपचित पडलेलं पाहन त्याला जमत नव्हतं. तो हळूच तिच्यापाशी जाऊन बसला. सगळीकडे निरव शांतता, आवाज होता तो फक्त त्या व्हेंटिलेटर चा.

तिच्याशी काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हतं. इतकी वर्ष संसार केला पण खुप काही बोलायच राहून गेलं अस त्याला जाणवलं.
"जीवन ह्यालाच म्हणतात का? एक दिवस ती आपल्याला, किंवा आपण तिला सोडून जाणार आहोत हे माहीत असूनही आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गृहीत धरून, अमुक अमुक झालं की आहे निवांत वेळ तेव्हा मनासारखं जगू अस ठरवून मोकळं होतो. पण अचानक अस काहीतरी घडत आणि आपल जग थांबत. आपल्या साथीदाराची साथ इथपर्यंतच आहे कळल्यावर मग जाणीव होते. अरे आपण तर मनमुराद जगलोच नाही. आणि मग फक्त दोन क्षण शेवटचे देवाने जगू देण्याची त्याला हातपाय जोडत विनंती करतो." विनायक आपल्याच मनाशी बोलत होता. त्याने कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

"रमे उठ ग.. तुझ्या नाकात हे कसले पाईप..? चल काढ बघू. माझ्या रमेला नाकात फक्त नथ च शोभून दिसते ग. आणि काय ही मशीन नुसती टी टी टी आवाज करतेय. उठ मला तुझी गोड बडबड ऐकायची आहे. अग ही मशीन पण बंद होईल तुझी बडबड ऐकून. इतकी तु हवीहवीशी आहेस." अस म्हणत तो काहीसा अस्पष्ट हसला पण त्याला ते काही जमलं नाही.

त्याला आठवलं रमा आजारी असताना अचानक एक दिवस त्याचा हात हातात घट्ट पकडून बसली होती.


क्रमशः