बंधन नात्यातले.. भाग एक

गोष्ट त्या एकरूप झालेल्या जीवांची..
"आलीस, ये. तु फ्रेश हो मी जेवायला वाढतो."

"नको अहो राहुद्या."

"काय झालं? चेहरा का बरं असा पडलाय तुझा?"

"आज आश्रमात गेले होते. तिथे खुप गोंधळ सुरू होता. विचारलं तर कळलं, कोणीतरी नवजात मुलीला असच कोणीतरी सोडून निघून गेलं."

"मग?"

"पोलिसांना कळवलं आश्रमातल्या लोकांनी. तपास सुरू आहे."

"तु ठीक आहेस ना?"

"मी ठीक आहे. पण ते बाळ, ठीक नव्हतं. लहानगा जीव बिचारा. काय कळतं असेल त्याला? किती तो त्रास!" रमाची चिंता तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होती.

"दत्तक घेऊया का आपण त्या बाळाला?" विनायक काळजीच्या स्वरात म्हणाला.

"अशी कितीतरी बाळ आहेत तिथे. ज्यांची आई व्हायचंय मला. सगळ्यांना दत्तक घेता येईल का?" ती काहीश्या हताश आवाजात म्हणाली.

"आपण ना एक काम करू, तिथे अशी मेंबरशिप बघू ज्यात आपल्या दोघांना आजीवन तिथे असलेल्या प्रत्येक मुलं बाळांचे आई वडील होऊ शकू." विनायक तिचा मूड फ्रेश होण्यासाठी विषय बदलू पाहत होता.

"काय ओ. मस्करी करता आहात का माझी? आज माझ्याकडे जर बक्कळ पैसा असता ना तर तिथल्या प्रत्येक मुलासाठी काही ना काहीतरी केलच असतं. पण पैशा अभावी काहीच करता येत नाही. अस हतबल होऊन राहून जातो, नकोस वाटतं कधीतरी हे जीवन. पण तिथल्या मुलांना पाहून जगावस वाटतं. पुन्हा पुन्हा नव्याने. जगातलं खर चैतन्य तिथे त्या मुलांच्या असण्याने वाटत. अश्या गोड मुलांना कसं बर कोण सोडून जाऊ शकत?"

"रमा.. तिथे गरज फक्त पैशांची नाही. मायेची ऊब आणि प्रेमाची सुद्धा खुप गरज आहे. जी तु तुला जमेल तशी देतेस. आणि मी देखील तुझ्या सोबत आहेच ना."

"हो खरचं. मी त्यांच्या आई वडिलांची जागा तर घेऊ शकणार नाही कधीच पण मी त्यांना इतकं प्रेम देईल ना, त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ मिळवून देईल."

"आता कसं बोलीस. चला मग बसायचं का आता जेवायला?"

असे हे गोडी गुलाबी ने, एकमेकांना सांभाळून घेत संसार करणार एक सुंदर जोडपं. रमा आणि विनायक. रमा दिसायला सोज्वळ तर विनायक देखील तितकाच देखणा. एकमेकांना एकरूप. त्या काळचा प्रेमविवाह त्यांचा. खुप बंधन आली. तरीही एकमेकांची साथ न सोडता ते एकत्र आले पण दोन्ही घरच्यांनी मात्र प्रेम विवाह म्हणता त्यांची साथ सोडली होती. मेहनत आणि प्रेम ह्या दोन गोष्टी जोडीला ठेवून दोघांनी एक एक भांडी जमवत लहानसा संसार उभा केला होता.

त्यांच लग्न झालं असताना अल्लड आणि अवखळ असलेली रमा त्याच्या घरची रमाई कधी झाली कळलंच नाही. किती प्रेम करायची सगळ्यांवर. लहान मुलं तर नेहमी तिच्या अवतीभवती "रमाई, रमाई" करत फिरत राहायची. त्यांचा गोंगाट आणि विनायक ची मात्र चीड चीड व्हायची. मग ती तितक्याच प्रेमाने त्याला समजवायची. सगळे मिळून मग दंगा घालायचे. लग्नाला खुप वर्षे होऊनही मुल न झाल्यामुळे लोकांचे टोमणे, टोचून बोलणे समारंभात न बोलवने सगळं काही तिने पाहीले होते. पण तरीही ती लहान मुलांच्या तोंडून रमाई हाकेच्या शब्दात आईपण शोधत त्यांच्या वर प्रेम करायची. पण हे चित्र फार काळ टिकलं नाही. आजुबाजूच्या स्त्रिया आपल्या मुलांना तिच्या जवळ जाऊ देत नव्हत्या. मनातल्या यातना अश्रुंवाटे वाहत जायच्या. तिला लेखनाची आवड असल्याने आपलं सुखं दुःख सगळकाही ती कागदावर उतरवायची.

क्रमशः