भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली
अफलातून

सर्वश्रेष्ठ दान मरणोत्तर देहदान
तेव्हा आजच देहदानासाठी नोंदणी करा
जिवंतपणीचं मजेत तेरावं करून
निश्चितपणे अगदी सुखाने मरा....


जिवंतपणी तेरावं छान कल्पना आहे
करायची कां सुरुवात आपल्यापासून?
डोळे मिटण्याच्या आधी हा सोहळा अनुभवा
कारण खरचं ही कल्पना आहे अफलातून...

लोक काय म्हणतील ते म्हणू द्या
विचारही मनात आणायचा नाही
आयुष्यभर दुसऱ्यांचाच केला विचार
आता मात्र घाबरायचं नाही....

रडण्याऱ्यां ऐवजी हसणारेचं असतील
करून तर पहा हा सोहळा
खरंच खूप मजा येईल हो
कारण हा प्रसंग असेल आगळा...

जिवंतपणी फक्त रडवलंच ज्यांनी
त्यांना नाटकी रडताना पहावेल कां?
नका त्यांच्या नाटकीपणाला फसू
त्यांनाही हसताना पाहायचं कां?...

त्याच त्या परंपरा जपण्यापेक्षा
नवीन काहीतरी करायला हवं
कितपत बसाल परंपरेला चिकटून
त्यातून बाहेर पडायलाच हवं....

कोणीतरी पुढाकार घेतला तर
लोक हळूहळू अनुकरण करतात
नव्या युगाचे नवे विचार
मग वेगाने अमलात येतात....

जबाबदारीतून मुक्त झाले असाल तर
करा सुरुवात या नेक कामाला
आणा तेरवी निमंत्रण पत्रिका छापून
अन् आश्चर्याचा धक्का द्या सर्वांना....

मेल्यावरच तेरावं, गोड जेवण
हा नियम कुठे लिहिला आहे कां हो?
असलेही लिहिला तर द्या त्याला फाटा अन् जिवंतपणीचं हा विधी पाहण्याचा आनंद लुटा....

वाढदिवस, मुंज, लग्न विधी
किती आनंदात साजरे करतो आपण
मग या विधीचाही घ्या नां आनंद
मनसोक्त खीर खाऊ, सोबत आप्तजण..

मृत्यूनंतर माझ्या घरी कोणीही येऊ नका
कार्यक्रमातच हे जाहीर करून टाका
कशाला उगाच इतरांना त्रास देता
गोडधोड कपडेलत्ते त्यांना आजच घेऊन टाका....

प्रवाहा विरुद्ध विचार रुजायला वेळ खूप लागतो
थोडी खत पाणी घातले तर तो वेगाने वाढतो
खूपच मजेदार होईल हो हा सोहळा
कारण प्रसंग असेल हा आगळावेगळा.

सौ. रेखा सतीशराव देशमुख
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका
अमरावती.