चौकट सोनेरी भाग 1

आई आणि मुलाची गोष्ट
लग्न करून सासरी आलेली वैदेही एवढा मोठा बंगला, दारात गाड्या, दिमतीला नोकर -चाकर पाहून अगदी हरखून गेली. या मोठ्या बंगल्यात तिचं स्वागत त्या घराच्या स्टेटसला साजेस असंच झालं. पूजा, कुळाचार झाले आणि पाहुणे मंडळी निघून गेली.

"चला, आता आपापल्या कामाला लागा. तसाही या लग्नात माझा बराचसा वेळ खर्च झाला आहे." अपर्णा म्हणजेच वैदेहीच्या सासुबाई म्हणाल्या.
"माझ्या मैत्रिणी तिकडे वाट बघत असतील. आमची भिशी, किटी पार्टी, पब, हॉटेलिंग हे सगळं मिस करत असतील त्या. कसं आहे, माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही ना."

"अगं, असं काय म्हणतेस? शुभंकर तुझाही मुलगा
आहे आणि तुझ्या मैत्रिणींना फक्त तुझ्या पैशांची गरज असते म्हणून त्या तुझी वाट बघतात. हे काय मला माहित नाही की काय?" प्रदीप आपल्या बायकोला म्हणाले.

"तो शुभंकर आणि माझा मुलगा! माय फू.. मी तर त्याला माझ्या तालावर हवं तसं नाचवते. तो फक्त माझ्या हातातलं प्यादं आहे बस्. मी नेईन तिकडे जाणारं."

"तुझ्या जिभेला काही हाड?" प्रदीप भडकून म्हणाले.

"तो तुमचा मुलगा आहे प्रदीप. तुमचा आणि तुमच्या पहिल्या बायकोचा. माझा मुलगा नाहीय तो. माझं या घरातलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून मी आजवर त्याचा वापर करत आले. आता त्याचं लग्न झालंय त्यामुळे आपल्या या गडगंज संपत्तीचं वाटप लवकरात लवकर वाटप करून टाका म्हणजे झालं."
अपर्णा छद्मी हसत बाहेर निघून गेल्या आणि वैदेही खोलीत आली.
"काय झालं बाबा?" सासऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती म्हणाली.

"काही नाही बेटा. तू उद्यापासून आपल्या कंपनीत ये. तिथला कारभार शिकून घे. काही लागलं तर आम्ही आहोतच."

सासऱ्यांचा शब्द प्रमाण मानून वैदेही शुभंकर सोबत कंपनीत येऊ लागली. तेव्हापासून तिचं आणि सासूचं भेटणं -बोलणं फार कमी होत असे. एकाच घरात राहून दोघी आपापल्या विश्वात मग्न झाल्या होत्या.

तसं कंपनीतल्या लोकांकडून आपल्या सासुविषयी बऱ्याचशा गोष्टी तिच्या कानावर येत असत. मात्र काय खरं नि काय खोटं हे तिला बिलकुल ठाऊक नव्हतं. तसं घरात अपर्णाचं फारसं लक्ष नसायचं. शुभंकर आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता.

लग्नात मात्र दोघे अगदी सख्ख्या माय -लेकरा प्रमाणे वागत होते. ते केवळ दिखावा म्हणून.
खरंतर अपर्णा मनातून शुभंकरचा तिरस्कार करत होत्या. पण चारचौघात त्यांना तसं दाखवता येत नव्हतं की वागता येत नव्हतं. कारण प्रदीप मोठ्या कंपनीचे मालक होते आणि शुभंकर त्या कंपनीचा एकुलता एक उत्तराधिकारी!

क्रमशः

🎭 Series Post

View all