चौकट सोनेरी भाग 2

आई आणि मुलाची गोष्ट
ते काहीही असो, सावत्र आई आपला तिरस्कार करते याची शुभंकरला पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे तो अपर्णा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा.

लहानपणापासून मोठं घर, गाडया, भरपूर कपडा - लत्ता, खाण्यासाठी रोज हवा तो पदार्थ आणि हवी ती वस्तू कायम त्याच्या पुढ्यात हजर असायची. दिमतीला नोकरही होते.
शाळेच्या अभ्यासासाठी स्पेशल ट्युशन घरी येऊन घेतली जात असे. कॉलेजमध्ये तर तो केवळ प्रदीप यांचा मुलगा आहे म्हणून जरा जास्तच प्रसिद्ध होता. अशी सगळी सुखं हात जोडून त्याच्यापुढे उभी होती. पण याचा शुभंकरला गर्व नव्हता. या साऱ्यांत एकच कमतरता होती, ती म्हणजे आई.

अपर्णाला कधीच शुभंकरची आई होता आलं नाही. शुभंकरला वाटे, आपल्या भोवती अनेक सोनेरी सुखाच्या चौकटी आहेत आणि त्या प्रत्येक चौकटीत तो एकटाच उभा आहे.
अपर्णा -बाबा आणि आर्या यांचं जग हे त्या चौकटीच्या पलीकडे आहे. स्वच्छ, सुंदर, मनमोकळं, स्वतंत्र! अगदी हवं तसं घडवता येणारं त्यांचं आयुष्य. अन् मी मात्र त्या चौकटीच्या आत राहून या सर्वांकडे अलिप्त नजरेने, बंदिस्त राहून बघतो आहे.

त्या चौकटीच्या आतलं जग सुंदर आहे. पण आपण मात्र बाहेर पडण्यासाठी धडपड करतो आहोत. आपल्या मनात खूप काही साचलं आहे. ते बाहेर पडत नाही आणि पडू पाहत असेल तर या सावत्र आईच्या एका नजरेने ते कुठल्या कुठे विरून जातं.

अपर्णा आणि प्रदीपची मुलगी आर्या ही परदेशात राहत होती. शुभंकर आणि तिचं छान जमायचं. आपली आई त्याचा इतका तिरस्कार का करते? याचं उत्तर तिला अजिबात मिळत नव्हतं.

खरंतर या सोनेरी चौकटीच्या आत खूप काही घडत होतं. प्रदीप सगळ्या आघाड्यांवर एकटे लढायचे. शुभंकर आणि अपर्णा यांच्यातला वाद मिटावा, त्यांच्यातली दरी कमी व्हावी आणि निदान आता तरी आपल्या मुलाला आईचं प्रेम मिळावं म्हणून ते अपर्णाची मर्जी राखण्याचा प्रयत्न करायचे.

मात्र अपर्णा यांनी स्वतःचं असं एक जग तयार केलं होतं. त्यात भावनिकतेला जागा नव्हती. होता तो फक्त व्यवहार आणि पैसा. त्या आपल्या लेकीला सारख्या समजावत, तूच या घराची खरी वारस आहेस. इथे येऊन कंपनीत, इस्टेटीत लक्ष घालत जा. मात्र आर्याला यात काहीच रस नव्हता. ती आईला उलट सांगे, 'दादाला धरून रहा.'
हे ऐकून अपर्णा जास्त चिडचिड करत.

इकडे अपर्णाच्या हट्टामुळे प्रदीपनी आपल्या इस्टेटीची वाटणी करायचं ठरवलं. त्यानुसार कंपनी शुभंकर आणि वैदेहीच्या नावे केली. स्वतःच्या बऱ्याच लाखोंचा बँक बॅलन्स अपर्णाच्या नावे केला. दाग-दागिने आर्याला दिले आणि ते हयात असेपर्यंत घर मात्र स्वतःच्या नावे ठेवलं.
'तुम्ही शुभंकरला जे द्याल, त्यापेक्षा जास्त वाटा माझा असेल.' असं अपर्णानं त्यांना निक्षून सांगितलं होतं. प्रदिपना कळत नव्हतं, मुलाची बरोबरी करण्यात या बाईला कसला आनंद मिळतो ते?

क्रमशः

🎭 Series Post

View all