चौकट सोनेरी भाग 3 अंतिम

आई आणि मुलाची गोष्ट
वैदेहीला हळूहळू आपल्या घरात काय चालतं याची कल्पना आली होती. तिनेही प्रदीपना साथ देत शुभंकर आणि अपर्णा यांचं नातं सुधारावं यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांच्यातलं अंतर मिटलं नाही.

वाटण्या झाल्या म्हणून अपर्णा खुश होत्या. आधी होता त्यापेक्षाही जास्त पैसा आता त्यांच्या हातात आला होता. त्यांच्या पैशावर मजा करणाऱ्या मैत्रिणी आता अपर्णाची जास्तच स्तुती करू लागल्या. त्यांचं आणि शुभंकरच नातं अजून कसं बिघडेल यासाठी कान भरण्याचे या मैत्रिणींचे काम अजूनही सुरू होते.

वाटण्या झाल्यापासून अपर्णांचं वागणं बेफाम झालं होतं. त्यांच्या कुठल्याही चौकटीत न बसणारा शब्द म्हणजे नातं. आता जास्तीचा पैसा हाती आल्यावर या शब्दाचा आणि त्यांचा संबंध अधिकच दुरावला होता. आधी मैत्रिणींसोबत बाहेर होणाऱ्या पार्ट्या घरात होऊ लागल्या. त्याला वेळ नव्हता ना काळ. यामुळे घराच्या दोन विभागण्या झाल्या नसल्या तर नवलच होत. यात आता सततच्या परदेशवारीची भर पडली.

शुभंकर आणि अपर्णाचं पटत नव्हतं म्हणून वैदेही सुद्धा अपर्णापासून काही अंतर राखून होती. नाही म्हंटलं तरी वैदेहीला सासू म्हणून अपर्णा जवळ हवी होती. तिच्या या विचारांना शुभंकरने कधीच विरोध केला नव्हता. मात्र शुभंकर प्रमाणे अपर्णांने तिलाही लांब ठेवणं पसंत केलं. 'मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगते' या उक्तीनुसार अपर्णांनी आपलं एक विश्व तयार केलं होतं आणि त्या विश्वात कोणालाही जागा नव्हती.

या साऱ्यात सर्वात जास्त फरपट झाली ती प्रदीपची. आपलं कुटुंब कायम एकत्र असावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. मात्र बायकोची साथ नसल्या कारणाने मुलगा आणि सून सोबत असूनही ते एकटे पडले होते.

वर्षे अशीच सरत होती. शुभंकर आणि वैदेहीचा संसार फुलला. प्रदीप आपल्या नातवंडात रमून गेले. इकडे अपर्णांचा बँक बॅलन्स रिकामा होत होता. आधी त्यात भर पडायची. पण आता साठवलेला सगळा पैसा रिता होऊ लागला होता. जसा पैसा उधळण बंद झालं, तशा हळूहळू मैत्रिणी त्यांच्यापासून दूर जाऊ लागल्या.

घरच्या लोकांपासून अपर्णा कधीच लांब गेल्या होत्या. आता काही मोजक्या मैत्रिणी सोडल्या तर बाकींनी त्यांची साथ सोडली होती.

इतकी वर्ष आजूबाजूच्या माणसांत रमणाऱ्या व्यक्तींला जेव्हा एकटेपणा येतो तेव्हा तो जीव नकोसा करून सोडतो. सोबत मान, आदर, प्रतिष्ठा कमी होते तेव्हा व्यक्ती आपल्याच नजरेतून खाली पडते. अपर्णाच्या बाबतीतही अगदी हेच झालं. एकटेपणाची जाणीव भयानक असते. मग अशा एकट्या व्यक्तीला दुरावलेल्या आपल्याच माणसांची आठवण आली नसेल तर नवलच!
आता याच जवळच्या मोजक्या मैत्रिणी म्हणू लागल्या, "आम्ही इतके वर्ष हेच सांगत होतो आपल्या कुटुंबाला धरून राहा म्हणून." अपर्णा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या.

इतक्या उशीराने चुकीची जाणीव झालेल्या अपर्णा आपल्या नवऱ्याची माफी मागण्यासाठी आल्या.
"मी कोण तुला माफ करणारा?" असं म्हणत प्रदीपनी हा विषय टाळला.

आता शुभंकर पुढे कसं जायचं? हा प्रश्न पडलेल्या अपर्णांनी वैदेहीची मदत घेतली. बत्तीस वर्षात या मुलासाठी आपल्या मनात एक आई असूनही आईची भावना का जागृत होऊ नये? हा प्रश्न मनात घेऊन अपर्णा आज पहिल्यांदाच शुभंकर पुढे उभ्या होत्या.

"मला माफ कर रे." इतकं बोलून त्यांच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. प्रदीपच्या मांडीवर बसलेल्या नातवंडांकडे पाहून आपण इतकी वर्ष काय गमावलं याची त्यांना कुठेतरी जाणीव झाली.

शुभंकर काहीच बोलला नाही. त्याचं शांत राहणं त्यांना अस्वस्थ करू लागलं.
"इतकी वर्षे मनात साठवून ठेवलेला राग बाहेर काढ. भांड माझ्याशी, ओरड मला, निदान चीड तरी माझ्यावर.." उद्विग्न होऊन त्या बोलत होत्या.

वैदेही डोळ्यांनी शुभंकरला खुणावत होती. मात्र शुभंकरवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

"सतत अनेक वर्षे मनावर आघात होत असतील तर माणूस अंतर्बाह्य अतिशय शांत होतो. त्याला ना सुखाचा आनंद होतो, ना दुःखाने तो दुःखी होतो. बाबा, हे तुमच्या बायकोला सांगा.

"बायको..? मी आई आहे रे तुझी." अपर्णा त्याच्या जवळ येत म्हणाल्या.

"या शब्दाचा अर्थ तरी कळतो का यांना?" शुभंकर दूर होत म्हणाला. "पैसा संपला, प्रतिष्ठा, पत, किंमत गेल्यावर आपल्या माणसांची आठवण होणारच. माझ्याकडून हे नातं कधीच संपलंय. आजपर्यंत ज्या सोनेरी चौकटीत मी उभा होतो, तिथे आता या उभ्या आहेत. सगळं काही असूनही हातात काही नसल्यासारख्या.

यांना फक्त पैसा हवा होता. यांच्या आयुष्यात नात्यांना कधीच महत्त्व नव्हतं. पण आज पैशांपेक्षा नाती श्रेष्ठ ठरली. चल वैदेही, आपलं घर कधीच विभागलं गेलं आहे.

जाणाऱ्या शुभंकर, वैदेही आणि आपल्या नातवंडांना पाहून अपर्णा एका जागी खिळून तशाच उभ्या राहिल्या. बोलण्यासाठी त्यांच्याकडे काय उरलं होतं? आता या सोनेरी चौकटीत त्या अडकल्या होत्या आणि घरातील इतर व्यक्तींचं आयुष्य सुंदर, स्वच्छंद, मनमोकळं होतं..एकदम स्वतंत्र होतं.

समाप्त.
सायली धनंजय जोशी.


🎭 Series Post

View all