एक इजाजत.भाग-३५

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमाकथा!
एक इजाजत!
भाग-३५

“तू माझी कोण हे खरंच तुला अजूनही कळलं नाही? खरंच सांगू तू माझी कोण आहेस ते?” तिचा हात अलवारपणे हातात घेत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.


त्याचे डोळे आज तिला वेगळेच भासत होते. काहीतरी नवं सांगू पाहत आहेत असे वाटत होते. त्याच्या तशा अलवार स्पर्शाने ती काहीशी मोहरली. आजवर त्याने तिचे हात कित्येकदा हातात घेतले असेल मग आज हे मोहरणे का? तिलाही कळेना. त्या स्पर्शात गैर असे काहीच जाणवत नव्हते तरीही हातातून हात काढून घ्यायची तिची धडपड वाढली होती आणि तिच्या धडपडीबरोबर त्याची पकड आणखी घट्ट होत होती.

________


“वॉव! बाबा, डायरेक्ट हातात हात घेऊन नि डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत होतात? एवढाश्या वयात खूप डेरिंगबाज होतात तुम्ही तर.” डोळ्यावर भुरभूरणारे केस कानामागे घ्यायचा असफल प्रयत्न करत मनस्वी मोठ्याने हसत प्रकाशला विचारत होती.


“ए, अशी हसू नकोस गं.” हातातील कणीस बाजूला घेत तो म्हणाला. तिला तो हसायला मनाई करत असला तरी यावेळी त्याच्या ओठावर देखील हसू उमटले होते.


“ओहोहो! गालावर काय ग्लो चढलाय बघा तरी. असं वाटतंय जणू मावळतीच्या सूर्याने क्षितिजाआड जाण्यापूर्वी तुमच्या गालावर त्याची लाली उमटवून गेला असावा. तुमचा हा ब्लश पाहायला तुमची रत्ना इथे हवी होती.” तिच्या ओठावर पुन्हा हसू.


“मनू, काही काय बोलतेस अगं?” त्याचं हसून विचारणं.


“मी कुठे काय बोलतेय? ती तुमची रत्नाच बघा ना कशी काहीबाही विचारतेय? म्हणते कशी शपथा पाळायला मी तुझी आहे तरी कोण? एकदम ‘हम आपके हैं कौन?’ च्या स्टाईलने.” तिचे तसे चेष्टेच्या सुरातील बोलणे ऐकून प्रकाशचे ओठ आणखी विस्तारले.


“मनू लहान होती गं ती. माझ्या वागण्याने कदाचित बावरली असावी.”


“हो? पण तुम्ही तर एकदम हिरो स्टाईलने हात पकडला होता. तुम्हीही लहानच होतात की.”


“लहान कसला गं? दहावीत होतो मी. मला सोळावं सुरु झालं होतं. किशोरावस्थेत माझं पदार्पण झालं होतं. मिसरूड फुटू लागले होते अन् आवाजही बदलला होता. रत्नाबद्दलच वाटणं केवळ मैत्रीपुरतंच नाहीय याची जाणीव होवू लागली होती. फक्त तिला कसं सांगावं हे कळत नव्हतं. माझ्यापेक्षा ती लहान असली तरी तिचंही वय वाढत होतंच की. माझं वागणं तिला आवडेल की नाही हे ठाऊक नसलं तरी तिच्या मनात कुठेतरी मी आहे हे मात्र कळलं होतं.”


“मग? तेव्हाच तिच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंत?” डोळे विस्फारून मनुने विचारले.


“कसला प्रश्न?”


“तोच..हम आपके हैं कौन?”


“हम्म, उत्तर तर द्यावे लागणारच होते ना? त्याशिवाय तिला कसे कळले असते?”


“हाऊ स्वीट! पण तुम्ही तिला नेमकं काय सांगितलंत?” तिची उत्सुकता ताणली होती.


“ऐक तरी.” वाघुर धरणाच्या सभोवतालच्या हिरव्या रूपावरून नजर फिरवत तो म्हणाला.


सांजवेळची वर आकाशी दाटलेली अन् आता काहीशी फिकट होत जाणारी तांबडाई आणि खाली हिरवा शालू पांघरलेली धरणीमाई.. त्याचे मन परत हिरवे वाडीत दाखल झाले.


ती टळटळीत दुपार. शाळेत रत्ना दिसली नाही म्हणून मधल्या सुट्टीपूर्वीच बरं नसल्याच्या बहाण्याने त्याने सायकलवर मारलेली टांग. वाटेत त्याला भेटलेली रत्ना. तिच्या डोळ्यातील पावसाने चेहऱ्यावर उतरलेली लालिमा आणि भोवताल परतीच्या पावसाळ्यातील निसर्गाने ल्यालेला हिरवा साज.

ऊन लागू नये म्हणून त्याने तिला झाडाच्या सावलीत उभे केले होते आणि रडण्याचे कारण विचारत हक्काने शपथही घातली होती.


ती मात्र अजूनही नासमज! त्यालाच तिचा उलट प्रश्न.. ‘हम आपके हैं कौन? मी तुझी आहे तरी कोण?’ त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला म्हणून त्याने तिच्या हातावर घट्ट केलेली पकड आणि हात सोडवण्याची तिची चाललेली धडपड. त्याच्या अलवार स्पर्शाने तिचे मोहरणे आणि त्या थेट नजरेने बावरणे!

“आऽऽह!”

त्याची हातावरची पकड घट्ट होताच रत्नाच्या तोंडून वेदनेचा हुंकार बाहेर पडला. तिच्या त्या स्वरासरशी त्याने चटकन तिचा हात सोडला.


“काय झाले?” आपल्या हातून काही चुकीचे घडले असे त्याला वाटून गेले.

उत्तरादाखल तिची केवळ नकारार्थक हलणारी मान.


“त्रास झाला का गं खूप? बघू तरी. माझ्या अशा घट्ट पकडण्याने तुला वेदना होईल हे माझ्या ध्यानी आलं नाही. सॉरी गं. मला माफ कर.”


वेदना तिला झाली होती आणि त्याचा होणारा त्रास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने पुन्हा हळूवारपणे तिचा हात हाती घेतला आणि त्यावर फुंकर घालू लागला तेव्हा तिच्या तळहातावर आणि बोटावर उमटलेल्या लाल खुणांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. या खुणा त्याच्या हात पकडण्याच्या नव्हत्याच; मात्र त्याने दिलेल्या दाबामुळे तिथली वेदना मात्र वाढली होती.


“रत्ना, अगं काय आहे हे? तुझे हात एवढे लाल कशाने झालेत? बोटांवर हे कसले वळ उमटलेत?” त्याच्या डोळ्यात काळजी दाटून आली.


“शाळेत यायचं सोडून तू कुठे गेली होतीस ते मला कळेल का? माझ्या शपथेचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नसेल नि तुला काही सांगायचं नसेल तर मग मला विचारून तरी काय फायदा? माझंच चुकलं. शाळा सोडून तुला शोधायला निघालो. जातो मी आता.” ती काहीच बोलत नाही हे बघून तिचे हात सोडत तो सायकल घ्यायला वळला.


“मी वाड्यावर गेले होते.” शपथेची नाही; पण त्याच्या चिडण्याची मात्रा बरोबर लागू पडली आणि तो जातोय असे वाटून रत्ना बोलून गेली.


“वाड्यावर? कशाला? गौरी शहरात गेल्यापासून तू वाड्यावर तर कधीच आली नाहीस मग आज कशी?” क्षणार्धात त्याचे चिडणे बाजूला पडले आणि तो काळजीने तिच्याजवळ येऊन उभा राहिला.


“ते अण्णासाहेबांनी बोलावले होते..” आता काही लपवून ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे तिने घडलेला सारा प्रसंग त्याच्यासमोर कथन केला.


“प्रकाश, माझी चाचणी परीक्षा होती अरे, पण तीच देता आली नाही मग कुठल्या तोंडाने मी शाळेत येणार होते?” तिचे थांबलेले रडू परत सुरु झाले.


“वेडाबाई, हात बघ कसे झाले आहेत आणि तुला परीक्षेचे येऊन पडलेय. हे अण्णासुद्धा कुणालाही कसे कामाला लावतात? तुझं वय काय हे काम तुला झेपेल का? याचा जराही विचार त्यांना आला नाही का गं?”

तिच्या बोटांवर आणि हातावर फुंकर घालता घालता तो विचारत होता. आवाज अचानक हळवा झाला होता. डोळ्यातुन दोन थेंब तिच्या हातावर येऊन विसावले तसे त्या ओल्या स्पर्शाने ती भानावर आली.


“प्रकाश, तू का रडतो आहेस? माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात अश्रू नको आणू ना.” त्याचे अश्रू बघून तिला भरून आले.


“रत्ना, तू विचारलं होतंस ना की मी तुला शपथा का घालतो म्हणून? तू माझी कोण आहेस हा तुला प्रश्न पडला होता ना? मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. रत्ना तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस गं. तू आनंदी असलीस की मला आनंद होतो आणि दुःखी असलीस की मलाही दुःख होते. तुझ्या डोळ्यात अश्रू आले की माझ्या हृदयात कालवाकालव होते. तुला वेदना झाल्या तरी त्याचा त्रास मला होतो. तुला ठाऊक आहे असे का होते?”


“हो. कारण आपली मैत्री आहे.” तिचे निरागस उत्तर.


“हो गं. मैत्री आहेच; पण त्याही पलीकडे काही आहे. माझ्या वर्गातील माझ्या मैत्रिणीबद्दल मला असे काही वाटत नाही जे तुझ्याबद्दल वाटते. कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस.”


तिच्या नजरेला नजर भिडवत तो म्हणाला तशी तिने तिची नजर खाली केली. त्याचा प्रत्येक शब्द तिच्या कानातून थेट अंतरात उतरत होता. त्याचे बोल ऐकून तिचे कान आणि मन दोन्ही तृप्त होत होते. त्याचे बोलणे थांबूच नये असे तिला वाटत होते.नुकतीच चौदाव्या वर्षात प्रवेशलेली ती या नव्या भावना अनुभवू पाहत होती.


“रत्ना, तुला एक विचारू? मला जे वाटते ते तुलाही वाटते का गं?”

त्याचा तो प्रश्न; पण उत्तर द्यायला तिचे चित्त थाऱ्यावर तरी कुठे होते? मन पाखरू होऊन कुठल्याकुठे उडू लागले होते. प्रकाश आणि ती.. ती आणि प्रकाश! बाकी कोणीच नाही.


तो तिला अभ्यासातील न समजणाऱ्या गोष्टी समजावून सांगतोय आणि ती खूप खूप अभ्यास करतेय, डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतेय.. मन कुठल्याकूठे वाहत जात होते अन् अचानक एका वळणावर तिला गजा दिसला. तिच्याकडे बघून दात विचकावून हसणारा.. कितीही शिकलीस तरी तुझी लायकी गंगीचे शेण काढण्याइतकीच आहे हे पटवून देणारा. सोबतीला शिकण्याची मनाई नसली तरी त्यांच्या तुकड्यावर जगत असताना शाळेआधी त्यांची कामं महत्वाची आहेत हे सांगणारे अण्णाही दिसले आणि ती धपकन जमिनीवर परत आली.


“रत्ना, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांग ना गं. मला तुझ्याबद्दल जे वाटतेय तेच तुलाही माझ्याबद्दल वाटतेय ना?” प्रकाश तिला विचारत होता.


रत्ना त्याला उत्तर देऊ शकेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all