एक इजाजत.भाग -५४

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली एक प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -५४

“चंपा, इतका जीव नको गं लावू. तुला पुढे त्रास होईल. आपल्या कोठीवरचा नियम तुला ठाऊक आहे ना..”


“चांगलंच ठाऊक आहे गं. तुझ्याशी नातं नाहीच जोडत नाहीये मी. तुझ्या बाळाशी तर जोडू शकते ना? आणि तसेही आता मला कुठलाच त्रास होत नाही. ना शरीराच्या वेदनेचा अन् ना ही मनाच्या वेदनेचा.

का ठाऊक आहे? कारण माझ्यातील त्रास करून घेणारी रत्ना उन्मळून गेलीये. आता मी केवळ चंपा उरलेय, चंपा.. शीलाआँटीच्या कोठीवरची एक सुंदर ललना!”
तिच्या डोळ्यात वेगळेच भाव चमकत होते.

__________

“सेठ, तुम्हाला मी किती आवडते?” अशाच एका प्रणयधुंद रात्री चंपा धनराज lला विचारत होती.


“खूप जास्त.” तिच्या शरीरावर ताबा मिळण्याचा प्रयत्न करत तो.


“मग मी म्हणेल ते कराल तुम्ही?”


“बोल की गं. आकाशातील चंद्र तारे मागणार आहेस की काय?”


त्याच्या प्रश्नावर ती खळखळून हसली. कदाचित इथे आली तेव्हापासून पहिल्यांदाच ती अशी हसली असावी. तिच्या ओठाआडून झालेल्या शुभ्र मोत्यांची उधळण तोही पहिल्यांदाच अनुभवत होता.


“चंद्र तारे नकोत हो. जमिनीवरच्या माणसासाठी इथलंच काहीतरी मागतेय.”


“चंपा, तू नुसता आदेश करायचा. अशी विनवणी नाही.” तिला मिठीत खेचत तो.


“तर सेठ, आदेश हा आहे की कमलीच्या बाळाला तुम्ही तुमचं नाव द्यायचं.” त्याच्या छातीवरुन हात फिरवत ती म्हणाली.


“चंपादेवी, तुम्हाला मी इथे राणी बनवायला आणले होते समाजसेविका व्हायला नाही. वेश्येच्या पोरांना सभ्य माणसं नाव देत नसतात.”


“सभ्य? धनराज सेठ सभ्य गृहस्थ आहेत?” ती पुन्हा हसली. तिचा हा घाव त्याच्या वर्मी बसला.


“मी सभ्यच आहे. शालिमार वस्तीत जगणारी तू, तुला काय माहित कॉर्पोरेट जगातील माझी किंमत?” तो जरासा चिडून म्हणाला.


“माझीही किंमत तुम्हला कुठे कळलीय सेठ? आजपासून चंपासोबत रात्र घालवण्याची किंमत पूर्वीपेक्षा डबल झालीये.” ती तोऱ्यात म्हणाली.


“चंपा तू पक्की धंदेवाली झालीहेस.”


“हो. तुम्हीच धंद्यावर आणून बसवली मग पक्की धंदेवाली तर व्हायला हवीच ना? राणी व्हायचंय तर पैसाही बक्कळ हवाच की नाही? आणि तसेही आपल्या शरीराची किंमत इतरांकडून करण्यापेक्षा स्वतःला करता यायला हवी.“ मधाळ सुरात साखरपेरणी करत ती उत्तरली.


“दिली.. तू म्हणशील ती किंमत दिली. आता तरी खुश ना?” तिच्या उत्तरावर भाळलेल्या त्याने तिला मिठीत बंदिस्त करत तिचे ओठ त्याब्यात घेतले.

________

पाहता पाहता सहा महिन्यांचा काळ लोटला. या सहा महिन्यात अशा कित्येक धुंद रात्री धनराज बरोबर घालवून तिने लाखभर रक्कम गोळा केली. एका रात्री कमलीला प्रसवपीडा सुरु झाल्या आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.


“मुलगा झालाय ना गं?” वेदना विसरून तिने बाळाकडे पाहत प्रश्न केला.


“लडकी हुई हैं। सावंली हैं पर तेरे से भी सुंदर.. बडी बडी आखोंवाली!” बाळाला हातात घेत शीलाआँटी कौतुकाने बोलत होती.


“लडकी?” आनंदाच्या या घडीला कमलीला रडू फुटले.


“मुलगी झाली म्हणून रडतेस?” चंपा तिच्या छातीला बाळाचे ओठ लावत म्हणाली.


“चंपा मला माझ्या लेकराला या दलदलीत नाही गं आणायचंय.”


“श्शू! काही काय बोलतेस? किती छोटी आहे ती. तिच्या पंखात आपण उडान भरायची की. तिला वाटेल ते व्हायला आपण मदत करू. तिचं बालपण सुंदर करू. तिचं किशोरपण जपू, तिला मोठी स्वप्न पाहायला शिकवू आणि मुख्य म्हणजे तिच्या स्वप्नांना पूर्ण करायला मदत करू..”

डोळे मिटून कमलीच्या छातीवर पहूडलेल्या इवल्या परीकडे डोळे भरून बघत चंपा बोलत होती. ती बोलायची थांबली आणि तिथे उभ्या असलेल्या सर्व टाळ्या वाजवल्या.


“बोलायला काय जातं गं? आपल्यासारख्या बायकांची यातून सुटका नाही.”त्यातील एक बोलून गेली.


“मी करेन सुटका. आजपासून ही परी केवळ कमलीचीच नाही तर माझीही लेक आहे.” बोलणाऱ्या तिच्याकडे चंपाने असे बघितले की ती पुढे काही न बोलता तिथून निघून गेली.

“हिच्यासाठीएवढं करतेस मग नाव देखील तूच ठेव की.” कमली तिच्याकडे पाहून म्हणाली.

“मनू..! तुला चालेल?” चंपाचा स्वर गहीवरला.

चालेल काय? खूप आवडलंय.”कमली खुश होत म्हणाली.

__________

“चंपा, ये क्या नया नाटक हैं रे? सुना हैं कमली को तू यहाँ से भेज रही हैं?” शीलाआंटीने चंपाला बोलावणे धाडले होते.


“शीलाआँटी मनू अब बडी हो रही हैं। कमली तिच्या मुलीला घेऊन इथे नाही राहू शकणार.”


“तो? यहाँ के फैसले तू लेंगी?”


“प्रश्न मनूचा असेल तर फैसला मला घ्यावाच लागेल.”


“चंपा, लक्षात ठेव ही शिलाबाई अजूनतरी जिवंत आहे आणि ही कोठी तिच्या मालकीची आहे. खुद को यहाँ की राणी समझने की कोशिश ना कर। यहाँ आके तुम्हे हुए ही कितने दिन हैं? सालभर नहीं हुआ और तू यहाँ अपना रौब झाड रही हैं, वो भी मेरे ही सामने?”ती चिडली होती.


“शीलाआँटी ये कोठी सिर्फ तुम्हारी हैं। इथली मालकीण तूच आहेस पण राणी मात्र मीच असेन. चंपा! आणि हो राणी बनायला मी इथे केव्हा आले हे महत्त्वाचे नाही तर मी किती कमावतेय हे महत्त्वाचे आहे आणि तुलाही माहितीये आँटी, इथे माझा रेट सगळ्यात जास्त आहे.” ती तोऱ्यात म्हणाली.


“हुशार आहेस!” शीलाआँटी स्मित करत उत्तरली.


“ती तर मी आहेच.”


“सगळ्यांसमोर ही हुशारी दाखवू नकोस. उगाच तुझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण व्हायला नको.”


“ते काही असो आँटी; पण कमलीला यातून बाहेर काढायला तुझी संमती आहे ना?”


“कुणाला इथून जायचे असेल तर मी कधीच रोखणार नाही; पण चंपा, इथलाही काही करार असतो. गेल्या दिड वर्षात कमलीने काहीच कमावून दिले नाहीय. ते तर तिला द्यावेच लागतील. तोवर ती कशी जाऊ शकेल?”


“तुला पैसा हवाय ना? तो मी कमावून देईन मग तर झालं ना?”


“चंपा.. यहाँ किसीसे रिश्ता जोडे तो सिर्फ दुख ही मिलेगा। कमलीशी नातं जोडताना तूही हे लक्षात घे.”


“कमलीसाठी कुठे? मी तर मनुसाठी हे करतेय.” ती हसत म्हणाली.


“ओ मेरी चंपाराणी, तुझ्यापुढे कोणी जिंकू शकतेय हो? ठीक आहे कमलीला जिथे जायचंय ती जायला मुक्त आहे.” शीलाआंटीने होकार देताच चंपाने आनंदाने तिला मिठी मारली.


“ठीक हैं, ठीक हैं, मुझे जादा मस्का मत लगा आज रात्रीच्या कस्टमरकडून तगडी रक्कम वसूल कर म्हणजे झालं.”तिला दूर करत शीलाआँटी.


“तुम्हारा हुकूम सर-आँखो पर!” चंपा खुशीने लहरत होती.

__________


“मग तर कमली आणि तिच्या बाळाचा प्रश्न मिटला होता की. तरी फरफट का म्हणताय? आणि ती मुलगी आहे तरी कुठे?” आदीने कमलीच्या बाळाची जन्मकथा ऐकून विचारले.

तुला त्या बाळाबद्दल एवढी आत्मीयता का वाटतेय?” तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत चंपा म्हणाली.


“कमलीची मुलगी ही धनराज सेठची मुलगी होती ना? म्हणजे ती माझी बहीण झाली ना?” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.


“एका वेश्येच्या मुलीला तू बहीण म्हणून स्वीकारलं असतंस?” तोंडावर हात ठेवत तिने आश्चर्याने विचारले.


“का नाही? वेश्या असली तरी तिही एक आईचं होती ना? कुठे आहे कमली? कुठे आहे माझी बहीण?” त्याने विचारले.


“दुर्दैवाने कमली आज जिवंत नाहीये आणि मनू..? तिचाही मला काहीच ठावठिकाणा नाहीये.” ती खाली मान घालून म्हणाली.


“पण तुम्ही तर तिला कोठीपासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवले होते ना?”


“हो. कमलीने शालिमार गल्ली सोडली होती. आमच्या कोठीवर माझा जम बऱ्यापैकी बसला होता. माझ्या धंद्याचा मी माझा एक उसूल बनवला होता. केवळ धनराज नाही तर कोठीवर येणाऱ्या अनेक बड्या हस्तींना आपले गिर्हाईक व्हायला भाग पाडले. धनराज सेठने म्हटल्याप्रमाणे मी खरंच राणी झाले होते.


दुसऱ्यांच्या टाकलेल्या कपड्याने अंग झाकणारी रत्ना स्वतःची उंची उंची कपडे वापरू लागली होती. दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगणारी आज शाही भोजनाचा आस्वाद घेत होती. जिथे एका खोलीत दोघी -तिघींची सेज सजत होती, मी स्वतःसाठी एक वेगळी खोली बनवून घेतली. माझ्या हिशोबाने मी राहू लागले, वावरू लागले. येणारा कस्टमर चंपाशिवाय दुसऱ्या कुणाचे नाव घेई ना तेव्हा आपोआप अंगावर मूठभर मांस चढल्याचा भास व्हायचा.” ती सांगता सांगता थांबली.

“मग?”


“मग काय? कमलीच्या अंताला माझं राणीपण कारणीभूत ठरले.” तिने एक आवंढा गिळला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all