एक इजाजत.भाग -५५

वाचा फुलण्यापूर्वी कोमेजलेली एक प्रेमकथा!

एक इजाजत!
भाग -५५


दुसऱ्यांच्या टाकलेल्या कपड्याने अंग झाकणारी रत्ना स्वतःची उंची उंची कपडे वापरू लागली होती. दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगणारी आज शाही भोजनाचा आस्वाद घेत होती. जिथे एका खोलीत दोघी -तिघींची सेज सजत होती, मी स्वतःसाठी एक वेगळी खोली बनवून घेतली. माझ्या हिशोबाने मी राहू लागले, वावरू लागले. येणारा कस्टमर चंपाशिवाय दुसऱ्या कुणाचे नाव घेई ना तेव्हा आपोआप अंगावर मूठभर मांस चढल्याचा भास व्हायचा.” ती सांगता सांगता थांबली.


“मग?”


“मग काय? कमलीच्या अंताला माझं राणीपण कारणीभूत ठरले.” तिने एक आवंढा गिळला.


“मला कळलं नाही.”

“माझा वाढलेला व्याप आणि नव्या गिऱ्हाईकांचा रिघ..
धनराज सेठला हे सहन झाले नाही. त्याला हवी तेव्हा हव्या त्या वेळी मी उपलब्ध नसले की त्याचा नुसता जळफळाट व्हायचा. त्याला वाटायचं की त्याच्यामुळे मी हे सुख उपभोगतेय, तेव्हा माझ्यावर त्याचा पहिला हक्क आहे आणि मी म्हणायचे की मी एक कोठेवाली आहे, ज्याच्याकडून मिळालेला रोकडा जास्ती, त्या रात्री चंपा फक्त त्याची!” ती खिन्न हसली.


“त्याने मात्र माझ्यावर खुन्नस ठेवून कमलीचा पत्ता शोधून काढला आणि मी उपलब्ध नसले की तिच्याकडे जाऊ लागला. कमलीचा त्याच्यावर जीव होता रे. तिला वाटायचं तो तिच्याकडे येत राहील तर त्याला मनुचा लळा लागेल. पण कुठलं काय? त्याला तर तिच्याबददल कसल्या भावना नव्हत्याच त्यात काही दिवसांनी कमलीला पुन्हा दिवस गेले आणि त्या गरोदरपणात बाळासकट तिचा जीव गेला. माझी मनू आईविना रस्त्यावर आली रे.”


“तुम्ही तिला तुमच्याकडे का घेऊन आला नाहीत?” त्याचा स्वर जड झाला.


“कारण कोठीवरचा नियम.. तिथे लहान जीवांना कसे ठेवू शकले असते? दया दाखवून मात्र शीलाआंटीने तिची रवानगी अनाथाश्रमात केली.” डोळ्याबाहेर डोकावणारी टीपं अलगद पुसत ती म्हणाली.


“तेव्हापासून तुम्ही तिला कधी भेटला नाहीत?” त्याने अविश्वासाने विचारले.


“कधी शीलाआँटी तिला भेटायला घेऊन आली की भेटायचे. खूप लाड करायचे. पण असं दोनचार महिन्यातून एकदाच घडायचं. त्यानंतर काही वर्षांनी तिचे इथे येणे बंद झाले आणि मी कारण विचारले असता तिला कोणीतरी दत्तक घेतल्याचं कळलं.” ती पदराच्या टोकाशी चाळा करत म्हणाली.


“तुम्ही तिची कुठलीच चौकशी केली नाहीत?”


“नाही. एकदा बाळ दत्तक गेले की आम्हाला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची परवानगी नसते. तसे शीलाआँटीकडून एवढं कळलं होतं की मनू चांगल्या घरी गेलीय. तिला जीव लावणारी माणसं भेटलीत. त्यानंतर पुढे काहीच कळलं नाही. मी कोठीवर राणी म्हणून मिरवत असले तरी कोठीबाहेर पाय टाकायची हिंमत माझ्यात कधीच धजावली नाही.”


“आणि पप्पा? त्यांना पुढे कधी भेटलात की नाही?”


“आमच्या कोठीवरचा सगळ्यात पहिला नियम होता.. कोणालाच जीव लावायचा नाही. कोणाशी नातं जोडायचं नाही. पण कमलीशी आणि तिच्या बाळाशी मी कशी जुळले मला कळलंच नाही रे. शीलाआँटी मला म्हणाली होती की याचा खूप त्रास होईल. कमलीही कित्येकदा हे बोलली होती. पण आमचं नातं अशा रीतीने खुंटेल हे मला कधी वाटलंच नाही. या साऱ्याला धनराज सेठ कारणीभूत होता. त्यामुळे गिऱ्हाईकाला खुश ठेवायचं हा नियमही मी गुंडाळला. माझ्या खोलीच्या आत त्यानंतर मी कधीच प्रवेश करू दिला नाही.


“त्यानं त्याच्या आयुष्यात कित्येक स्त्रियांना वाटेल तेव्हा जवळ केलं असेल आणि कित्येकींना दूर लोटलं असेल; पण ही चंपा एकमेव अशी होती की जीने त्याला स्वतःहून झिडकारलं होतं.” ती पाण्याचा घोट घेत म्हणाली.


“पप्पावर इतका राग होता आणि तरीही तुम्ही मला तुमच्या दरबारी येऊ दिलंत. तुम्हाला माझा राग कधीच कसा आला नाही?”


“आदी, तू खूप वेगळा आहेस हे पहिल्याच नजरेत मला कळलं होतं रे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे माझा. नजरेतून ती व्यक्ती कशी आहे हे कळायला वेळ लागत नाही ना? तू कोठीची पायरी चढलीस खरी; पण आयुष्याच्या या पानावर तू अजूनही तुझं कोवळेपण जपले आहेस हे जाणवत होतं की. मग तुझा राग का करू ना?” तिने त्यालाच प्रश्न केला.


“हो आणि माझ्यात तुम्हाला तुमचा पूर्वायुष्यातील प्रियकर दिसत होता मग तर रागावणं बाजूलाच पडलं असेल हो ना?” मिश्किलीत तो म्हणाला तशी ती किंचित हसली.


“चंपाजी, तुम्हाला तो भेटायला आला होता हे तुम्ही सांगितलंत; पण त्याला तुम्ही इथे आहात हे कसे कळले याचा उलगडा मात्र मला झाला नाही. तेही सांगा ना.”


“आदी तुला जे कळायचे होते ते कळले की. माझ्याबद्दल तुझ्या मनातील वाईट प्रतिमाही मिटली. आता पुन्हा अधिक जाणून काय करायचे आहे?” तिचा उलट सवाल.


“माहित नाही. पण तुमच्याबद्दल सारं काही जाणून घ्यावं अस मला वाटू लागलंय.”


“वेड्या, अशाने प्रेमात पडशील रे माझ्या.” ती उगाचच हसली.


“प्रेमात तर केव्हाच पडलोय. पण तुमच्या वरवरच्या सौंदर्याच्या प्रेमात नव्हे तर तुमच्यातील दरवेळी झळकणाऱ्या. स्त्रीत्वाच्या निरनिराळ्या छटेच्या प्रेमात पडलोय. खरं सांगू? आज दिवसभरात तुमच्या प्रेमात मी कित्येक वेळा पडलोय ना माझं मलाच आठवत नाहीये.


सकाळी पहिल्यांदा त्या मुलीचं तुम्हाला भेटायला येणं आवडलं नाही म्हणून तिच्याबद्दल काहीबाही बोलत असताना तुमचं तिचं बाजू घेणं मला भावलं होतं. तिच्यासाठी दिसलेली तुमची आक्रमकता माझ्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. दुसऱ्यांदा तुमच्या कोठीवरच्या एकीने मला गळाला लावण्याचा प्रयत्न करताच तिच्या नरडीला पकडून मी तसा मुलगा नाही हे तुमचं सांगणं आणि माझ्यावर विश्वास दाखवणं मला अधिक भावून गेलं.


शालिमार गल्लीतून पहिल्यांदा बाहेर येताना तुमच्या मनातील बाहेर आलेली छोटी रत्ना आणि तिची भीरभीरणारी नजर मला आणखी तुमच्या जवळ घेऊन आली. माझं औक्षण करून वाढदिवस साजरा करताना तुमच्यातील आई दिसली तेव्हा त्या छटेच्या प्रेमात पडलो. एवढेच नव्हे तर तुमचा रत्नापासूनचा चंपापर्यंतचा जीवनप्रवास ऐकताना प्रत्येक रुपावर मी भाळलोय.


ती छोटीशी चुणचुणीत, निरागस गोड रत्ना, प्रकाशच्या प्रेमात पडलेली अल्लड रत्ना, शीलाआंटीच्या कोठीवर पोहचलेली अन् स्वतःवरचा विश्वास हरवलेली दयनीय रत्ना आणि त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच उड्डाण घेत कोठीवरची राणी झालेली चंपा.. तुमची सारीच रूपं प्रेमात पाडण्यासारखीच तर आहेत.


धनराज सेठला जमिनीवर आणलंत. मनूला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून प्रयत्न केलेत. आताही तुमच्या कमाईचा हिस्सा अनाथाश्रम, शाळा, दवाखाने कुठे कुठे दान करत असता. आणखी असं कुठलं रूपं उरलंय जे माझ्या समोर आलेलं नाहीये?” तो भारावून बोलत होता.


“बस, बस. पुरे! एवढं कौतुक ऐकून मीच मला ओळखेनाशी होईल.” त्याला थांबवत ती हसायला लागली.


“पण मला मात्र तुमची पूर्णपणे ओळख पटलीय. चंपाजी.. तुमच्यामुळे किती गोष्टींचा आज उलगडा झालाय. पप्पांचा तर इतका राग येतोय ना. त्यांच्यामुळे किती जीवांची वाताहत झाली हो. त्यांनी तुम्हाला इथं आणलं. कमलीचे तसं झालं. मनू कुठे आहे काहीच ठाऊक नाही. त्यांना तर त्याचं कधी काहीच वाटलंही नसेल.


तुम्हाला सांगू? मला ना आज एकदम खुजेपण आल्यासारखे वाटत आहे. मी स्वतःला खूप यशस्वी उद्योजक समजत होतो. मात्र आता पटतंय की तुमच्यापुढे मी काहीच नाहीये.”


“अच्छा?”


“हो आणि म्हणूनच मला तुमच्या प्रकाशबद्दल जाणून घ्यायचं आहे. जे काम पप्पा करू शकले असते पण केवळ वासनेपोटी त्यांनी तुम्हाला मदत न करता अशा ठिकाणी आणून ठेवले, मला तिथून तुम्हाला बाहेर काढायचे आहे. तुमच्या प्रकाशला भेटवायचे आहे.” तो मनापासून बोलत होता.


“आदी, नको त्या गोष्टीत स्वतःला गुंतवू नकोस आणि माझं ऐकशील तर यापुढे कधी कोठीवरही येऊ नकोस. तुझी कंपनी, तुझा बिझनेस.. तेच तुझं जग आहे. त्याची व्याप्ती वाढव. तुझ्या मम्मापप्पांना जेवढा वेळ देता येईल तो दे. त्यांची सेवा कर. बाकी अशा जगात तुझ्यासारख्या मुलाचे काही काम नाहीये रे.” ती समजावत म्हणाली.


“चंपाजी, मी किती पावरफुल आहे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं नाहीये. माझ्यापरीने मी प्रयत्न केले तर तुमचा प्रकाशच काय तर त्या अण्णांनाही शोधून तुमच्या पायावर डोकं टेकवायला भाग पाडू शकतो. पण मला तसं करून कसले कॉम्प्लिकेशन्स निर्माण करायचे नाहीयेत.”


“कमली गेल्यानंतर मी खूप हळवी झाले होते. मनूची काळजी मला छळत होती आणि मग मला माझ्या कुटुंबियांची आठवण येऊ लागली. आई, बाबा आणि शरद कसे असतील या विचाराने रात्र रात झोप येत नव्हती. त्यातूनच घरच्यांना मी एकदा पत्र पाठवण्याची हिंमत केली.” ती पुढे सांगू लागली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all