एक इजाजत.भाग-५६

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली एक प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -५६


“कमली गेल्यानंतर मी खूप हळवी झाले होते. मनूची काळजी मला छळत होती आणि मग मला माझ्या कुटुंबियांची आठवण येऊ लागली. आई, बाबा आणि शरद कसे असतील या विचाराने रात्र रात झोप येत नव्हती. त्यातूनच घरच्यांना मी एकदा पत्र पाठवण्याची हिंमत केली.” ती पुढे सांगू लागली.


“पत्र?”

“हम्म. मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून. शिवाय मी ठीक आहे, काम करून पैसे मिळवतेय हेही लिहिलं आणि सोबतीला थोड्या पैश्यांची मनीऑर्डर देखील केली. सोबतच तिकडे कधी परतणार नाही हेही लिहिले.”


“इतक्या दिवसांनी पत्र लिहूनही खरं सांगितलं नाहीत?” त्याने विचारले.


“कसं सांगणार होते? मी इथे अडकलेली आणि तिकडे अण्णासाहेबांनी घरच्यांना काही केले असते तर मी कशी जगू शकले असते?”


“पण पोस्टल ऍड्रेस वरून तुम्ही इथे आहात हे कोणालाही सहज कळले असते ना?”


“हो; पण पत्राद्वारे माझी ख्यालीखुशाली मी एकदाच कळवली. त्यानंतर फक्त पैसे पाठवत राहिले. नेमका पत्ता कळू नये म्हणून इथला पोऱ्या पोस्ट ऑफिसच्या मुख्य शाखेतून व्यवहार करत असतो. तरीही प्रकाशला माझा शोध कसा लागला ते कळलं नाही.

एकदिवस तो मला इथून घेऊन जायला आला होता. तो आला तेव्हा त्याच्या डोळ्यातील प्रेम तसुभरही कमी झाले नव्हते रे. क्षणभरासाठी वाटलं हे सगळं सोडून निघून जावं. पण मी त्याच्या लायकीची उरली नाहीये हे सत्य विसरण्यासारखं नव्हतं ना?” पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली.


“त्याचं तुमच्यावर खरं प्रेम असतं तर त्याने नक्कीच तुमचा स्वीकार केला असता.”


“त्याने स्वीकार केला असता रे; पण मलाच हे नातं मान्य झालं नसतं. एका वेश्येची जागा तिच्या कोठ्यापुरतीच. तिथे ती कित्येकांच्या शेजेला निजेल; मात्र खऱ्या प्रेमाच्या स्पर्शाची धग तिला नाही सोसावणार.” ती उसासा टाकत म्हणाली.


“चंपाजी..”


“आदी, आता पुरे झाले. निघायला हवं. रात्र चढत आलीय रे. शीलाआँटी वाट बघत असेल.”


“चंपाजी, तुम्हाला खरंच तिथे परत जायचंय? इतक्या वर्षांनी आज तिथून बाहेर पडल्यावर असा मोकळा श्वास घेतलाय. नेहमी खिडकीतून अनुभवणारा पाऊस आज अंगावर झेललाय. नदीकिनारी रिमझिम पावसात पहिल्यांदा बाहेर येऊन कणीस खाल्लंय आणि आता ही चांदण्यांनी नटलेली रात्रही बाहेर घालवता आहात. किती छान आहे हे सगळं. तरी तुम्हाला कोठीवरचं ते बंधिस्त जीवन खुणावते आहे?”


“हो आदी, त्या आयुष्याची सवय म्हण किंवा मग चटक म्हण; पण आता त्यातून बाहेर पडणं मला शक्य नाही. ते माझं कुटुंब आहे. परत जायला तर हवं.” किंचित स्मित करत ती म्हणाली.


“पण मग यापुढे तुम्ही तिथे काही करणार नाहीत असं मला वचन दया.” तिच्यापुढे हात करत तो म्हणाला.


“काहीही काय रे? दोन वर्षापासून तुझ्यामुळे मला दुसरे कस्टमर गमवावे लागले. आता तरी मला माझे काम करू दे. या कामातून मिळणाऱ्या पैश्यातून मला बऱ्याच ठिकाणी देणग्या द्यायच्या असतात.” समोर आलेली बट मागे घेत ती म्हणाली.


“आणखी किती वर्ष तुम्ही हे करणार आहात?” त्याने तिला थेट विचारले.


“आमच्या धंद्यात वर्षांच्या हिशोबाने रिटायर्डमेंट येत नसते रे. जोवर माझं रूप समोरच्याला भुलवील तोवर हे काम चालू असेल बघ. आणखी पुढील किमान दहा वर्ष तरी.” ती उत्तरली.


“आणि या दहा वर्षात तुम्ही किती कमावणार?” तिच्या डोळ्यात बघत तो.


“माझा हिशोब घेतोहेस? तर ऐक, किमान करोडभर तरी रक्कम कमावू शकते. फक्त कस्टमर तगडे हवेत, पैसेवाले.”


“मग हा घ्या दोन करोडचा चेक! असं समजा तुमचं तारुण्य मी विकत घेतलंय.. पुढली किमान वीस वर्ष. अट केवळ एकच की यापुढे तुम्हाला मी हे काम करू देणार नाही.” पाकिटातून चेकबुक काढून त्यावर सही करत तो म्हणाला.


“वेडा आहेस का तू आदी?” ती धक्का लागल्यागत म्हणाली.


“हो तुम्हाला वेडा वाटत असेल तर आहेच मी वेडा.”


“का करतोहेस असं?”


“कारण तुम्हाला मी आईच्या ठिकाणी बघायला लागलोय. एक मुलगा आपल्या आईला असे कोठ्यावर काम करायला परवानगी देईल काय?”


तो म्हणाला तसे तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. कमलीच्या छोट्या मनूला या कोठ्यावरच्या जीवनाचे चटके बसू नयेत म्हणून तिने कमलीला असेच तर लाखभर रुपये दिले होते आणि आज त्याच मनूचा भाऊ, धनराज सेठचा मुलगा तिला या आयुष्यातून बाहेर पडायला दोन करोड देऊ करत होता.


“हा चेक तुमच्याकडे ठेवा. हवे तर हे संपूर्ण चेकबुक सुद्धा घ्या. तुम्हाला आणखी रक्कम वाढवायची असेल तर ती लिहू शकता. चंपाजी, अगदी आजच तुम्ही निर्णय घ्या असे मी म्हणत नाहीये; पण तिथून बाहेर पडा एवढंच सांगणं आहे.”

तो हात जोडून उभा होता आणि चंपाच्या गालावरचे ओघळ खाली वाहू लागले होते. इतका वेळ अविरत बडबडणारी ती अगदी शांत झाली होती.


“आदी, तुझे पैसे मला नकोत. त्या ओझ्याखाली मी फार दिवस जगू शकणार नाही.”


“चंपा झाल्यानंतर इतक्या वर्षात तुम्ही केवळ आजचा दिवस खऱ्या अर्थाने जगलात. धनराज सेठने हिरावलेल्या आयुष्याची ही किंमत समजा. चला आता.” तिचा हात पकडून तिला उठवत तो म्हणाला.


ती भारावल्यासारखी त्याच्यासोबत चालत होती. त्याने कारचा दरवाजा उघडताच ती यंत्रवत आत जाऊन बसली.


कोठीवरून बाहेर पडायला तयार नसताना त्याच्या हट्टापुढे ती तयार झाली होती आणि खरच तो म्हणाला तसा आजचा दिवस मनमुराद जगली होती. त्याचे औक्षण करताना तिला मघाशी क्षणभर आई झाल्यासारखे वाटले होते आणि दिवसाच्या शेवटला त्याने खरंच तिला आईपण बहाल केले होते.


“आदी, थँक्स पण माझ्याशी नातं जोडून तुझी किंमत कमी करतो आहेस तू.”शालिमार गल्लीत पोहचताच कारमधून उतरत असताना ती त्याला म्हणाली.


“तुमची खरी किंमत तुम्हाला कुठे कळलीय? आणि एक सांगू? सोबत आई असली की तिच्या लेकराची किंमत कितीतरी पटीने वाढत असते. आईविना तिन्ही जगाच्या स्वामीला भिकारी म्हणतात ते खोट नाही ना?”


“आमच्या कोठीवर पहिल्याच दिवशी मी शिकलेला पहिला नियम.. म्हणजे कोणाशीही कुठलं नातं जोडायचं नाही. नाहीतर केवळ दुःखच मिळतं. मी कमलीशी नातं जोडलं, ती मला दुरावली. तेव्हा तुझ्याशी नातं जोडून मला असा अनुभव घ्यायचा नाहीये आदी.

तू खूप चांगला मुलगा आहेस. तुझं माझ्या आयुष्यात येणं एखाद्या स्वप्नासारखं आहे.. सुखद स्वप्नासारखं! ते स्वप्न तसंच असू दे. कधीतरी ते स्वप्न आठवलं की आपसूक ओठावर हसू उमटेल; पण आईपणाच्या नावाचं लेबल मला लावू नकोस.


ही असली नाती जपण्याच्या खूप पलीकडे चंपा गेलीय रे. त्यापेक्षा तू तुझ्या मम्मावर जीव लाव. त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवून त्यांना जप. धनराज सेठ कसेही असले तरी ते तुझे वडील आहेत. त्यांना योग्य ट्रीटमेंट दे. मला मात्र या नात्यांच्या गुंत्यात अडकवू नकोस.” चेकबुक त्याच्या हाती ठेवत त्याच्या गालावर हलकेच स्पर्श करत ती म्हणाली.


“मला वाटलं वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्यातील आईपण मला द्यायला तयार होणार. पण चंपाजी तुम्ही तुमचे विचार पुढे ठेवण्यात ठाम आहात हं. मी तुमच्या निर्णयाचा आदर करतोय मात्र हा चेक तुमच्याकडेच असू दे. जेव्हा कुण्या गरजू व्यक्तीला मदत हवी असेल तुम्ही यातून ती करू शकाल. हवं तर माझ्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट समजा. चला मी तुम्हाला वर सोडून येतो.”

“नाही आदी. यापुढे तू इथली पायरी चढू नयेस असं वाटतं. आजवर माझ्याकडे येत राहिलास म्हणून स्वतःला सावरलंस. पण यापुढे एखादीने तुला अडकवणायचा प्रयत्न केला आणि तुझा पाय घसरला तर स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होऊन जाईल. बाईची नशा बाटलीपेक्षा जहाल असते हे विसरू नकोस.”


“चंपाजी..”

ती जायला वळली तसे त्याने जड आवाजात हाक दिली.

त्याच्याकडे वळून नजरेनेच काय म्हणून विचारत असतानाच त्याने वाकून तिच्या पायाला स्पर्श करत नमस्कार केला.


“आयुष्यात पुढे कधी भेटीचा योग येईल की नाही माहित नाही; मात्र तुमचे शब्द मी कायम लक्षात ठेवेन. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे.” तो उठत म्हणाला.


त्या एका क्षणात त्याला मिठीत घेऊन मायेच्या ममतेने मस्तकावर ओठ टेकवावेत असे तिला लाखवेळा वाटून गेले. मात्र मनाला आवरत तिने केवळ त्याच्या केसातून हात फिरवला.


“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदी. खूप खूप मोठा हो आणि माणुसकीला असेच कायम जपत रहा.” डोळ्यातील पाणी टिपून ती धावतच जिना चढून वर निघून गेली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all