एक इजाजत. भाग-५७

वाचा फुलण्यापूर्वीच कोमेजलेली प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -५७


त्या एका क्षणात त्याला मिठीत घेऊन मायेच्या ममतेने मस्तकावर ओठ टेकवावेत असे तिला लाखवेळा वाटून गेले. मात्र मनाला आवरत तिने केवळ त्याच्या केसातून हात फिरवला.


“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदी. खूप खूप मोठा हो आणि माणुसकीला असेच कायम जपत रहा.” डोळ्यातील पाणी टिपून ती धावतच जिना चढून वर निघून गेली.


“चंपा, तू ठीक तो हैं ना? इतनी देर कहाँ लगा दी? तुझी किती फिकर होत होती माहितीये?” ती वर पोहचताच शीलाआँटी काळजीने तिच्याकडे येत म्हणाली.


“आँटी, इतकी का घाबरतेस? अगं कुठेही गेले तरी परत इथेच तर येणार होते ना?”


“तेरे उपर तो मुझे विश्वास हैं रे; पर वो छोकरा? वो तुझे लेकर गया और इतना वक्त हुआ तो थोडी घबराहट हो रही थी।”


“वय ढळत चाललेय तसे माणसं ओळखायला विसरत चाललीस होय?” ती मिश्किलीने म्हणाली.

“मी काहीच विसरले नाही गं. पण तू गेल्यापासून इथल्या बायड्या बडबड करत होत्या म्हणून घाबरले, बस्स! तुझे पता हैं ना उसपर यहाँ की कितनी लडकीयाँ जान छिडकती हैं?” शीलाआँटी म्हणाली तसे चंपाने तिचा हात हाती घेतला.


“हम्म. पण आदी तसा मुलगा नाहीये. त्याला मी इथे येण्यापासून मनाई केली आहे. लोकांच्या वासना शमवण्यासाठी आपण काम करतो पण चांगल्या मुलांना इथे येण्यापासून परावृत्त करणे हेही चुकीचे नाहीये ना गं?”

“नहीं, तुमने तो बहुतही नेक काम किया हैं। चल आता आराम कर.” ती खोलीतून बाहेर जायला निघाली तसे आवाज देऊन तिने तिला रोखले.


“शीलाआँटी, आदीने मला आईचा दर्जा देऊ केला गं. एक आई आपल्या मुलाला कोठ्यावर कसे येऊ देईल?”


तिचा हळवा स्वर ऐकून शीलाआंटीचे मन भरून आले. ज्या धनराजने तिला कोठीवर आणून बसवले होते त्याच्याच मुलाला ती या वस्तीपासून दूर ठेवू पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून शीलाआँटी डोळे पुसत निघून गेली.


आपले आवरून चंपा बिछान्यावर येऊन बसली. आजचा संपूर्ण दिवस तिच्या नजरेसमोरून झरझर सरकत होता. किती वर्षानंतर ती अशी कुणापुढे मोकळी झाली होती. ती मनापासून हसली होती, मनभरून रडलीही होती. जी सहजता प्रकाशसोबत असताना तिला जाणवायची तितक्याच सहजतेने ती आदिसोबत वावरली होती.


प्रकाश!

आजही तो माझ्यासाठी झुरत असेल का? का दोघात इतकी साम्यता जाणवते? कारण दोघांचेही हृदय सारखे आहे, दुसऱ्यांना जपणारे आहे .तिचं मन तिला सांगत होते. डोळे मिटून ती बिछान्यावर रेलून बसली होती. तिच्या डोळ्यासमोर कालची ती पोर झळकून गेली.

मनस्वी..प्रकाशची लेक!


“तुझी आई कोण गं?” मनस्वी हे नाव ऐकताच मुद्दामहून तिने केलेला प्रश्न.

“तुमच्यापैकीच कोणीतरी एक; पण जर तुम्हीच असता तर खूप आनंद झाला असता.” स्वच्छ हसत तिने दिले उत्तर.. आणि ते उत्तर ऐकून तिच्या हृदयात झालेली कालवाकालव.. म्हणजे? प्रकाशने लग्न केलेच नव्हते कारण तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला तो त्याच्या आयुष्यात स्थान देऊ शकला नव्हता.


‘ओह प्रकाश! का इतका चांगला आहेस तू? या चांगुलपणाचा एक टक्का जरी अण्णासाहेबांजवळ असता तर आज आपण एकत्र असतो ना?’ किती दिवसांनी या विचाराने तिला रडू आले होते नाहीतर इतक्या वर्षात हा विचार करणं तिने सोडून दिला होता.

प्रकाश, मनस्वी आणि मग आदी.. तिघांच्याही प्रतिमा एका पाठोपाठ डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या आणि ती अधिकच अस्वस्थ होत होती.


‘मनू.. तू इथे परत का आलीस गं? आलीस आणि भूतकाळातील आठवणींचा मोहोळ पुन्हा उठलाय बघ. किती कष्टाने सगळ्या आठवणींना एका कुपीत बंद करून ठेवल्या होत्या? अन तू मात्र त्या कुपीतील प्रकाश नावाचं अत्तर सगळीकडे उधळून लावलेस. हा सुगंध केवळ आनंद देणारा; पण माझ्या डोळ्यात केवळ पाणी येतंय गं.4 माझ्या शब्दाखातर तो आजही तसाच आहे.. माझ्या शब्दांना जपत.. त्यांना प्रेमाने कुरवाळत!’
डोळे पुसून तिने कुस बदलून घेतली.
_________


“बाबा, आत येऊ?” मृदू स्वरात विचारणा करत मनस्वी दारात उभी होती.


“मनू? अगं ये ना. तुला कधीपासून माझी परवानगी घ्यावी लागतेय?” चेहऱ्यावरची अस्वस्थता लपवत प्रकाश हसून म्हणाला.


“हे दूध आणलं होतं. तेवढं पिवून घ्या. कदाचित त्याने शांत झोप येईल.” टेबलवर ग्लास ठेवत ती जायला वळली तसे त्याने तिचा हात पकडून अडवले.


“मनुड्या रागावलीस होय?” हृदयातील सारं प्रेम त्याने त्या शब्दात ओतलेय असं तिला वाटले.


“नाही हो. मी का रागावू? मी लाख विचारेन पण तुमच्या पर्सनल गोष्टी सांगायच्या की नाहीत हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असेल ना? आता नकोच तो विषय. ज्यामुळे माझ्या बाबांना त्रास होतो तो विषय मी कधीच काढणार नाही. झोपा तुम्ही.”


“मनू, तू बस ना.. इथेच. माझ्याजवळ. सॉरी गं. तुझ्या प्रश्नांना मघाशी उत्तर नाही देऊ शकलो पण आता वाटतंय तुला असे दुखवायला नको होते. आपल्या बाबांविषयी जाणून घ्यायला तुला पूर्ण अधिकार आहे.” तिला बाजूला बसवत तो म्हणाला.


वाघुर धरणावरचा आजचा दिवस फार मस्त गेला होता. प्रकाश आणि त्याच्या काजुकतलीच्या म्हणजे रत्नाच्या आठवणींनी रंगत आणली होती. हिवरेवाडीत झालेले छोट्या रत्नाचे आगमन, तिची सुरु झालेली शाळा आणि गौरी, प्रकाश अन् रत्नाच्या मैत्रीची कथा तिने किती मन लावून ऐकली होती. गौरी आणि तिच्या नात्यातील दरी आणि मग प्रकाश आणि रत्ना दोघांनाही अल्लड वयात प्रेमात पडल्याची जाणीव.. ऐकतानाती पार हरखून गेली होती. असं वाटत होतं जणू त्या साऱ्या क्षणाची ती साक्षीदार आहे. तिच्यासमोरच सारं काही घडतंय.


प्रकाशचा मेडिकलला लागलेला नंबर, त्याने तिला भरवलेली काजूकतली अन् सोबतीला श्रावणातील पावसाने धरलेला फेर.. सारं तिला कसं रोमँटिक वाटत होतं. ऐकताना तिने त्यावरून चिडवलंही होतं. त्याचे कॉलेजला जाण्यापूर्वी अण्णांना लागलेला सुगावा आणि शेवटी त्यांच्या प्रेमकथेला मान्यता देऊन हिरवी झेंडी दाखवल्याचे कळताच तिने सुटकेचा श्वास सोडला.


“सगळं कसं गुडी गुडी चाललं होतं? मग नेमकी माशी कुठे शिंकली? इतक्या गोड रत्नाची ही अशी चंपा कशी झाली?” तिने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.


“मनू, घरी परत जायचे?” तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो म्हणाला.


“हे काय हो बाबा? आपलं जेवण व्हायचंय की अजून आणि घरी जाण्याबद्दल का बोलताय? माझ्या प्रश्नामुळे त्रास झालाय का? तिने सहज म्हणून विचारले.

हम्म. तसंच काहीसं. ज्या प्रश्नाचं उत्तर आजवर मलाच निट कळलं नाहीये त्याचं उत्तर तरी कसे देऊ ना? एवढंच सांगेन की आमच्या प्राक्तनात हेच असावे.” बोलताना त्याचा आवाज कापरा झाला होता.


“बाबा, त्या आठवणींचा त्रास होत असेल तर आपण इथेच थांबूयात. तुमच्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं मला काहीच नाहीये. आपण जेवण करूया आणि घरी जाऊया.” तो विषय तिथेच थांबवत तिने जेवणाची ऑर्डर दिली.


“दोघं जेवायला बसले खरे पण प्रकाशला काही खायची इच्छा उरली नव्हती. बळेबळे दोन घास घऊन त्याने अन्नदेवतेची माफी मागितली आणि दोघेही घरी येऊन पोहचले. घरून बाहेर जाताना दोघांनाही जी उत्सुकता होती ती आता खुंटली होती. उलट प्रकाश मनातून जास्तच अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनाची ही अवस्था हेरूनच मुद्दाम मनू त्याच्यासाठी आता दूध घेऊन आली होती. आपल्या लाडक्या बाबाला उपाशी झोपू देणे तिला कसे रुचले असते?


“मनू, आमच्या नात्यात माशी कुठे शिंकली हे जाणून जाणून घ्यायचे होते ना? माशी कुठे शिंकली होती ते मलाच कळले नव्हते गं.” तिला जवळ बसवत तो हळवेपणे म्हणाला.


“बाबा..”


“मी डॉक्टर होणार याचा तिला खूप आनंद झाला होता. तिलाही तर माझ्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. अण्णाना आपल्याबद्दल कळलंय आणि त्यांना ते मान्य आहे हे मी तिला कळवले होते. त्यामुळे मी नसताना आमच्या नात्याचे तिला दडपण येऊ नये असे वाटत होते.


मनू, रत्ना खूप हुशार होती गं. बारावीला तिला उत्तम गुण मिळाले आणि मग मेडिकलच्या राऊंडसाठी ती मुंबईला जाणार होती. आमचे पत्रव्यवहार बंद असलेल्या तरी अण्णांकडून मला खबरबात होत होती.”


“मग?”

“पण ती राउंडसाठी गेली ती कधीच परत आली नाही..”
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all