एक इजाजत.भाग -५८

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -५८


“मनू, रत्ना खूप हुशार होती गं. बारावीला तिला उत्तम गुण मिळाले आणि मग मेडिकलच्या राऊंडसाठी ती मुंबईला जाणार होती. आमचे पत्रव्यवहार बंद असलेल्या तरी अण्णांकडून मला खबरबात होत होती.”


“मग?”

“पण ती राउंडसाठी गेली ती कधीच परत आली नाही.”


“काय?” मनू तोंडावर हात ठेवून त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होती.


“आठवडा लोटला तरी तिच्या राऊंडचं काय झालं? नंबर कुठे लागला? मला काहीच खबरबात नव्हती. त्यामुळे एक दिवस सुट्टी टाकून मी गावाला आलो आणि तिथे जे कळले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.


“प्रकाशदादा? तुम्ही इथं?” अण्णांचा खास माणूस गजादादा मला अचानक वाड्यावर बघून दचकला.
भूतकाळातील आठवणीत पुन्हा पाऊल टाकत प्रकाश मनस्वीला त्याची हकीकत पूढे सांगू लागला.


“हो, उद्या रविवार ना? म्हणून आज सहज येणं केलं. आईची आठवण येत होती. बाकी गावात कसं काय चाललंय?” प्रकाशने विचारताच गजा कसंनूसं हसला.


“काय झालंय?”


“काही नाही जी. घरी गेलात तर कळेल की.”त्याचं कोड्यात बोलणं.


“म्हणजे?”


“मी काही सांगू शकणार नाही. तुम्हाला जे घडलं ते अण्णासाहेब सांगतील.”


“काय झालं ते सांगशील तरी.”


“लै वंगळ झालं. बस्स, एवढंच काय ते सांगू शकतो. बाकी माफी असावी.” त्याने कानाला हात लावले.


“आई, अण्णाऽऽ”

वाड्यात प्रवेशताच काळजीने प्रकाश अंगणातूनच हाका मारू लागला.


“डॉक्टरसाहेब? तुम्ही या वक्ताला?” त्याचा आवाज ऐकून आबासाहेब बाहेर येत म्हणाले.


“हो आबा. काय झालं? सगळं नीट आहे ना?” त्यांचा काळजीचा सूर ऐकून प्रकाशच्या हृदयात धडधड वाढली.


“हो सारंच ठीक आहे. तुम्ही असे न कळवता आलात म्हणून जराशी काळजी वाटली, बस्स एवढंच.” ते स्मित करत म्हणाले. मात्र कुठेतरी काहीतरी बिनसले आहे हे प्रकाशला जाणवत होते.


दुपारची जेवणं आटोपली आणि शेवटी प्रकाशने गौरीला रत्नाकडे जाण्याबद्दल विचारणा केली.


“गौरी, रत्नाच्या ॲडमिशनचं काय झालंय गं? मला काही कळलं नाही बघ. आपण तिच्याकडे जाऊयात का? त्या निमित्ताने भेटही होईल.”


“दादा आपण नको जायला.” नेहमी रत्नाकडे जाण्यासाठी एका पायावर तयार असणारी गौरी अचानक नकार देतेय हे बघून त्याला चुकल्यासारखे वाटले.


“का गं?” त्याने विचारले.


“दादा, रत्ना हिवरेवाडीत नाहीये.”


“म्हणजे? कुठे गेलीय ती? तिच्या गावाला वगैरे का? पण अशी तर आजवर कधी गेली नाही ना?” तिच्या एका वाक्याने प्रकाशचे चार प्रश्न बाहेर पडले.


“तसं नाही.म्हणजे.. ती..” बोलताना गौरी जराशी अडखळली.

“गौरी, अगं निट सांग ना.”


“गौराई, तुम्ही थांबा. डॉक्टरसाहेब, रत्ना हिवरेवाडीत नाहीय म्हणजे काय ते आम्ही सांगतो.” गौरीला हाताने इशारा करून तिला थांबवत अण्णा म्हणाले.


“काय झालं अण्णा? काही विपरीत घडलंय का? तिचा मेडिकलला नंबर लागला नाही का?” तो जाणून घ्यायला अधीर झाला होता.


“डॉक्टर साहेब, मेडिकलला नंबर लागायला आधी तिने राउंड तर पूर्ण करायला हवा होता ना.” ते शांत सुरात म्हणाले.


“म्हणजे? ती तर गजादादा, दिनकरदादा आणि तुमच्यासोबत मुंबईला जाणार होती. तुम्हीच हे मला सांगितलं होतं की.”


“हो जायला तर निघालो होतो, पण मुंबईचं काम कॅन्सल होऊन मला वेळेवर जळगावी काम निघालं म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही आणि इथंच सगळा घात झाला.” एक दीर्घ श्वास घेत ते पुढे म्हणाले.


“अण्णा, कसला घात? काय सांगायचंय ते नीट सांगा ना.” प्रकाशचा जीव वर-खाली होत होता.


“डॉक्टरसाहेब, ती रत्ना तिच्या यारासोबत पळून गेली.”


“अण्णाऽऽ”

त्यांनी सांगायचे अवकाश की प्रकाश जोराने कडाडला.

“तुम्ही हे काय बोलताय?”


“डॉक्टर साहेब, बापाशी बोलताना आवाजाची पातळी खाली ठेवून बोलायची एवढंही तुम्हाला कळत नाही का?” कधी नव्हे ते आबासाहेब अण्णांच्या मदतीला धावले.


“पण आबा..”


“अण्णा बोलतोय ते खरं आहे प्रकाश.” आबा साहेबांचा स्वर उतरला होता.


“अहो आबा, हे कसं शक्य आहे?”


“का शक्य नाही? अरे तिचे कोणासोबत तरी प्रेम संबंध होते हे तिच्या आईने, त्या वच्छीनेच मान्य केलेय की. आणखी तुला कुठला पुरावा हवा?”


“आबा, हे खरं आहे. कारण.. कारण रत्ना आणि मी एकमेकांवर प्रेम करतो आणि अण्णांना हे माहिती आहे.” त्याने एका दमाने सांगून टाकले आणि सगळेजण डोळे फाडून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.


“अण्णा, प्रकाश काय बोलतोय?”


“होय आबासाहेब. आपले डॉक्टर खरे बोलत आहेत. त्यांचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. तसं पाहिलं तर माझा या नात्याला विरोधच होता. माणसानं आपली पायरी ओळखून वागावं या मताचा मी. पण पोराच्या आनंदासाठी मी ते नातं मान्य करायला निघालो होतो. पोरांचे शिक्षण पूर्ण झाले की तुमच्या कानावर मी हे सारं टाकणारच होतो; पण देवाची लीला की त्याने मध्येच आपले डोळे उघडले आणि ती दुसऱ्या कुणा पोराबरोबर पळून गेली.” अण्णासाहेब आपला मुद्दा पटवून देत म्हणाले.


“अण्णा, आबा मी सांगतोय ना. अहो, रत्ना अशी वागणारी नाही. ती बिचारी पापभिरू आहे हो. यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती माझ्याशी असं वागू शकत नाही.” रत्नाचे वकीलपत्र घेत तो म्हणाला.


“प्रकाशराव, अहो तुम्हाला काय माहिती? पैशांच्या राशी रोज डोळ्यांनी बघणारे तुम्ही, तुम्हाला त्या पैश्याविषयी काहीच वाटणार नाही. पण या अशा मुली कुणी श्रीमंत मुलगा दिसला की एकाला सोडून दुसऱ्याच्या मागे धावणाऱ्यातल्या. ही रत्ना देखील त्यातलीच निघाली.”


“अण्णा माझं मन हे मानायला तयार नाही हो.” त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

“तुम्ही त्या दमडीच्या मुलीसाठी डोळ्यातून पाणी काढू नका. तुम्हाला ठाऊक आहे प्रकाशराव, सुरुवातीला तुमच्या प्रेमाच्या विरोधात असलो तरी पुढे मी तुमच्या नात्याला स्वीकारले होते. मात्र ती मुलगीच तशी निघाली त्यात तुमचा अन् आमचाही काय दोष?”


“आई, आजी तुम्ही तरी सांगा ना. रत्ना तशी नाही. गौरी अगं, तू तरी काही बोल.”


“दादा या गोष्टीवर आमचाही कुणाचा विश्वास बसला नव्हता; पण अण्णा जे सांगत आहेत ते दुर्दैवाने खरं आहे रे. तुला त्रास होईल म्हणून तुला कळू देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही तुला काहीच कळवलं नाही, हे आमचं चुकलं. मात्र अण्णा तुझ्या भल्यासाठीच हे बोलले होते. त्यांना तुझ्या मनातील भावना ठाऊक होत्या त्या जपण्यासाठीच रे.

अरे, आपल्याच घरातील लोक आपल्या विरोधात कशी असतील ना? कदाचित रत्ना तुझ्यासाठी बनलीच नसेल. कदाचित तुझ्या आयुष्यात तिच्यापेक्षा कोणीतरी चांगली असेल म्हणून हे असं घडलं असावं असा विचार कर.” गौरी त्याचे अश्रू पुसत म्हणाली.


“रत्ना नाही तर कोणीच नाही. आबा, अण्णा, आजी, आई.. मी रत्नाशिवाय जगू शकणार नाही.” त्याने एक हुंदका दिला.

“प्रकाशराव विषय वाढवून तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. तुम्ही आपल्या गावचे पहिले डॉक्टर आहात. एका पोरीपायी आपलं नुकसान करून घेऊ नका. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि चांगले गुण मिळवून दाखवा.” आबासाहेब त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले.


“मला गजादादा आणि दिनकरदादाला भेटायचं आहे.” तो नाक पुसत म्हणाला.


“भेट की. तुला कोणी अडवले? तुला जो सोक्षमोक्ष लावायचा आहे तो आजच लावून टाक. यापुढे मात्र त्या पोरीचा विषय घरात निघायला नको.” अण्णा म्हणाले.

“मला त्या दोघांशी एकट्यात भेटायचं आहे.” तो ‘एकट्यात’ या शब्दावर भर देत निग्रहाने म्हणाला.


“भेट. आमची काहीच हरकत नाही. घरच्यांवर विश्वास नसेल तर त्यांच्यावर तरी विश्वास ठेवून बघा.” अण्णासाहेबांनी त्याला परवानगी दिली.


“..हे खरं आहे प्रकाश दादा. अहो,जळगावहून दिन्यादादा आणि मी निघालो आणि घाटामध्ये ती दांडगी पोर आडवी आली. काही कळायच्या आत त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली आणि रत्ना हसत हसत त्यांच्यासोबत निघून गेली. फक्त घरातून बाहेर पडण्यासाठी म्हणून राऊंडच्या निमित्ताने ती आमच्यासोबत आल्याचे तिचे म्हणणे होते.” गजा सांगत होता.


“गजा दादा, तू मागशील तेवढे पैसे तुला द्यायला मी तयार आहे. हवे तर त्यापेक्षाही जास्त; पण नेमकं काय घडले ते मला खरं खरं सांग ना.” प्रकाशने गळ घातली.

त्याने पैशाचे आमिष दाखवताच गजाने तोंडावर हात ठेवला.


‘प्रकाशदादा, अहो, देवाच्यानं सांगतो. मी खोटं बोलत नाही आहे. मी या घरचं मीठ खाल्लंय. माझ्या आजोबा आणि बापापासून सगळे या घराच्या चाकरीला बांधलेली आहेत. एवढं सगळं असताना मी का खोटं बोलेन? अहो, पैसा काय? आज आहे तर उद्या नाही. पण म्हणून मी माझे इमान विकणार नाही.”


गजा पोटतिडकीने म्हणाला आणि त्याचे बोलणे ऐकून प्रकाश खाली बसत ढसाढसा रडू लागला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all