एक इजाजत.भाग-५९

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग-५९

‘प्रकाशदादा, अहो, देवाच्यानं सांगतो. मी खोटं बोलत नाही आहे. मी या घरचं मीठ खाल्लंय. माझ्या आजोबा आणि बापापासून सगळे या घराच्या चाकरीला बांधलेली आहेत. एवढं सगळं असताना मी का खोटं बोलेन? अहो, पैसा काय? आज आहे तर उद्या नाही. पण म्हणून मी माझे इमान विकणार नाही.”


गजा पोटतिडकीने म्हणाला आणि त्याचे बोलणे ऐकून प्रकाश खाली बसत ढसाढसा रडू लागला.

_________

“किती भयंकर आहे हे सगळं? पण हे सारं खोटं होतं हो. तुमची रत्ना असं करणं शक्यच नाही. बाबा, मी भेटलेय ना तिला. जरी आता परिस्थिती वेगळी असली तरी त्यांच्या सात्विक आणि सोज्वळ स्वभावाचा अंदाज तर मलाही आलाय.”


“मी सर्वांना किती पटवून द्यायचा प्रयत्न केला; पण हाती काहीच आलं नाही. गजादादा त्याच्या बोलण्यावर ठाम होता आणि तो खोटं बोलणार नाही असे अण्णांचे ठाम मत होते आणि त्याच्या वागण्यातूनही तसेच जाणवत होते.” तो डोळे पुसत म्हणाला तसे मनस्वीने त्याच्या खांद्यावर हात ठेवले.


“तिचा कुठलाच सुगावा मिळत नव्हता गं. त्यामुळे जे सांगितल्या गेलं त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं.”


“म्हणजे अण्णा म्हणाले ते तुम्हालाही पटलं होतं?”


“नाही कधीच नाही. माझा तेव्हाही रत्नावर विश्वास होता आणि आताही आहे; पण त्यावेळी दुसरा पर्यायच उरला नव्हता गं.” खांद्यावरचा तिचा हात घट्ट पकडत तो म्हणाला.


“माझ्या परीने जमेल तसे, जमेल तिथे तिला शोधायचा प्रयत्न केला. मात्र ती जणू गायब झाली होती आणि नंतर तब्बल दोन वर्षाने तिचे एक पत्र आले.”


“पत्र?”


“हम्म. तिने तिच्या घरच्यांसाठी लिहिले होते. त्यात ती ठीक असल्याचे लिहिले होते. कुठेतरी काम करत असल्याचे सांगितले होते आणि त्यांच्यासाठी थोडे पैसेही पाठवले होते.


वच्छीमावशीने ते पत्र गौरीकडून कितीदा वाचून घेतले असेल.मला कळल्यावर माझीही बरेचदा पारायणं झालीत. ते पत्र नाशिकहून होते. रत्ना नाशिकला आहे हे स्पष्ट होते. मात्र नेमकी कुठे त्याचा काहीच उल्लेख नव्हता.”


“ओह!”


“वेड्यासारखा तिला शोधायला निघालो गं मी. अख्खे नाशिक पालथे घातले. ती मात्र कुठेच गवसली नाही. ज्या नाशिकमध्ये मी शिकत होतो ; माझी रत्ना तिथेच होती. एकाच शहरात राहूनदेखील आम्ही एकमेकांना साधं दिसूही नये हे केवढं मोठं दुर्भाग्य!”


“पण मग रत्नाची चंपा कशी झाली? चंपा झालेल्या तिला तुम्ही भेटलात देखील. हे कसे?”


“नशीब! नशीब मला तिच्याजवळ पुन्हा घेऊन गेले. जेव्हा भेटली तेव्हा ती पूर्णतः बदललेली होती. माझी रत्ना उरलीच नव्हती.” तो हताशवाणे म्हणाला.


“रत्ना हिवरेवाडीतून गेल्याला साडेचार वर्ष झाली होती. तिच्याशिवाय एकेक क्षण युगासारखा वाटायचा. काळ हे प्रत्येक जखमवरचे औषध असतो असं म्हणतात. हे खरे आहे; मात्र जर जखम अगदी खोलवर रुतून बसली असेल तर ती जखम भरायला काळाचीही कसोटीच लागत असते.


माझ्याही बाबतीत तेच झाले. ती आयुष्यात नाहीये हे मानायला मन मान्य नसले तरी तेच सत्य होते. आयुष्य पुढे सरकत होतेच. मात्र त्यात कसली उमेद नव्हती.


माझं एमबीबीएस कंप्लिट झाले, इथे प्रॅक्टिसदेखील सुरु केली. मी हिवरेवाडीत दवाखाना थाटावा अशी आबासह सर्वांची इच्छा होती. मात्र रत्नाशिवाय त्या गावात पाय टाकणे मला जमणार नव्हते. लग्नासाठी घरच्यांनी कंबर कसली मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. हळूहळू इथे माझा जम बसू लागला आणि मी हिवरेवाडीला कायमचा रामराम ठोकला.


रोजचे आयुष्य पुढे ढकलणं चालू होतं. दिवस पेशंट्सच्या गराड्यात कसातरी निघून जायचा. रात्र मात्र रत्नाच्या आठवणीत तळमळत असायची. ती कुठे असेल, तिच्याशी काही वाईट तर घडले नसेल ना असा विचार मनात यायचा. मात्र ती तिच्या घरच्यांना महिन्याचे पैसे पाठवते म्हणजे ती सुखरूप आहे याची खात्रीही पटायची.


खंत एवढीच होती की तिने माझ्यासाठी कधी चार ओळीदेखील खरडल्या नव्हत्या. माझ्याशी आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवणारी रत्ना मला विसरून गेल्याचे शल्य मात्र कायम टोचत होते. ती मला विसरू शकते हे मला मान्यच नव्हते.


अशातच एकदा मुंबईला माझ्या कलीगच्या लग्नानिमित्त जाणं झालं. मला जायचं नव्हतंच पण त्याच्या आग्रहाखातर मी तिथे गेलो आणि..


“आणि काय? तिथे तुम्हाला रत्ना भेटली?” मनस्वीची उत्सुकता शिगेला पोहचली होती.


“हम्म. काहीसं असंच झालं.”


“ओ माय गॉड! ती लग्नात आली होती?” तिने तोंडावर हात ठेवला.


“नाही गं.”


“मग?”


“मुंबईहून निघायला उशीर होणार होता म्हणून माझ्या मित्रांनी त्या रात्री मुंबईलाच थांबायचे ठरले होते. कॉलेजनंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो. मी देखील रात्रीच्या प्रवासात उगाच रिस्क नको म्हणून थांबलो.

खूप दिवसांनी भेटल्यामुळे मग रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरु होत्या. झोपताना माझ्या जॅकेट मधून पाकीट खाली पडले आणि ते उचलताना त्यातील रत्नाचा फोटो मित्राच्या हाती लागला..
मुंबईच्या हॉटेलमधील ती रात्र प्रकाशच्या नजरेसमोर स्पष्ट होवू लागली.

रवी, राघव आणि प्रकाश! कॉलेजमध्ये असताना रूममेट्स आणि आता आपापल्या आयुष्यात व्यस्त असलेले तीन जीव तब्बल चार वर्षांनी एकत्र आले होते.


“ही कोण रे?” रवीच्या हातात फोटो लागताच त्याने प्रकाशला विचारले.


“असू दे रे.” त्याच्या हातून फोटो काढून घेत प्रकाश म्हणाला.


“एक मिनिट, यार प्रकाश कॉलेजमध्ये असताना जिच्याबद्दल आम्हाला सांगायचास ती तर ही नव्हे?”


“हो तीच ही.” तो बळेच हसून उत्तरला.


“ए, मला बघू दे. जिच्याबद्दल ऐकून ऐकून आम्ही रात्री जागवल्या आहेत ती तुझी प्रेयसी नेमकी कशी होती ते मलाही बघायचे आहे.” राघवने तो फोटो स्वतःकडे घेतला.


"अजून तरी तुमची भेट झाली की नाही?” रवीचा प्रश्न आणि त्यावर प्रकाशने नकारार्थी मान डोलावली.


“माझं ऐक. तिचा ध्यास सोड यार तू. एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर. वयात येताना प्रत्येकजण प्रेमात पडतो. त्या प्रत्येकाचं प्रेम यशस्वी होते असे नाही ना? उगाच तिच्यात अडकून स्वतःच्या आयुष्याची वाताहात का करून घेतोस?” रवी त्याला समजावत होता.


“रवी, तुला नाही कळणार. जाऊ दे, सोड रे. हा विषय नको. राघव तो फोटो दे बघू.”


“एक मिनिट प्रकाश, हा खरंच तुझ्या गर्लफ्रेंडचा फोटो आहे?” राघव अजूनही बारकाईने फोटो बघत होता.


“गर्लफ्रेंड नव्हे रे, एक्स गर्लफ्रेंड.” रवी हसून म्हणाला.


“प्रेयसी आहे ती माझी. तिच्यावर हसण्यासारखं काही नाही.” प्रकाश जरासा चिडला होता तसे रवीने सॉरी म्हणत कान पकडले.


“अरे, मी हिला पाहिलंय.” राघव म्हणाला तसे सेकंदभर शांतता पसरली.


“काय? कुठे पाहिलंस? आणि केव्हा?” क्षणार्धात प्रकाशच्या प्रश्नांचा मारा सुरु झाला.


“हिचं नाव काय म्हणालास?” राघवचा प्रश्न.


“रत्ना. पण कुठे भेटली ही तुला?” अधीरतेने तो विचारत होता.


“रत्ना? उहूं.. मी जीला भेटलो ती रत्ना नव्हती; पण ती मात्र हीच होती. त्याने पुन्हा फोटोवर नजर रोखली.

“यस, आठवलं. चंपा.. चंपा होती ती.”


“व्हॉट रबीश? तू दुसऱ्या कुणाबद्दल बोलत असशील
ही रत्ना आहे.”


“माय डिअर फ्रेंड, तू राघवला पहिल्यांदा भेटतो आहेस का? अरे एकदा पाहिलेला सुंदर चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. ही मुलगी तीच आहे. चंपा. हां, चेहरा काहीसा बदललाय पण डोळे..? डोळे हेच. काळेभोर, लांबसडक पापण्या, गोरापान चेहरा..! एकदम आरस्पानी सौंदर्य!” तो वर्णन करत म्हणाला.


“रत्ना अशीच होती, खूप सुंदर.”


“तू रत्ना म्हण, मी चंपा म्हणेन. काय फरक पडतो? आहे तर ती एकच ना?”


बरं, पण ती कुठे भेटली ते तरी सांग ना? प्रकाशने विचारताच त्याचा चेहरा खर्रकन उतरला.


“ते आठवत नाही.” तो नजर झुकवत उत्तरला.


₹राघव, एकदा वाचलेली पुस्तके, एकदा भेटलेली माणसं आणि एकदा पाहिलेली ठिकाणं तू सहसा विसरत नाहीस हे मला ठाऊक आहे. तुला ती कुठे भेटली हे सांग. तुला माझी शपथ!”


“नाशिकला.” त्याने शपथ टाकताच राघवने सांगून टाकले.


“नाशिक? म्हणजे ती नक्कीच रत्ना आहे. राघव प्लीज मला सांग की तुम्ही कुठे भेटलात? तिने खरंच कुणाशी लग्न केलंय का? मला सोडून ती का गेली याचं उत्तर हवंय रे मला. मला तिला भेटायचंय. हवं तर शेवटचं. प्लीज मला तिचा ऍड्रेस दे ना.” तो तळमळीने बोलत होता.

“नाही, नको.”


“तुला कळत कसं नाहीये, मला तिला भेटणं खूप गरजेचं आहे.” प्रकाश.


“आणि तुला कसं कळत नाहिये की मी नाही म्हणतोय त्या मागे काहीतरी कारण आहे. अरे, ती अशा ठिकाणी राहते जिथे तू जाऊ शकत नाहीस.”


“का? अशा कुठल्या महालात ती राहते?”


“महालात नव्हे, नाशिकमधील शालिमार गल्लीत ती राहते. एका कोठीवर. एक वेश्या म्हणून काम करते.” तो अडखळत बोलत असतानाच त्याच्या गालावर प्रकाशची पाचही बोटे उमटली.

‘सपाऽऽक!’


“राघव, तोंड सांभाळून बोल. तू जिच्याबद्दल बोलतो आहेस ती माझी प्रेयसी आहे. प्रकाशने त्याची कॉलर पकडली. बोलताना त्याच्या आवाजाला कंप फुटला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all