एक इजाजत. भाग -६

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली एक प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६०


“महालात नव्हे, नाशिकमधील शालिमार गल्लीत ती राहते. एका कोठीवर. एक वेश्या म्हणून काम करते.” तो अडखळत बोलत असतानाच त्याच्या गालावर प्रकाशची पाचही बोटे उमटली.

‘सपाऽऽक!’


“राघव, तोंड सांभाळून बोल. तू जिच्याबद्दल बोलतो आहेस ती माझी प्रेयसी आहे.” प्रकाशने त्याची कॉलर पकडली. बोलताना त्याच्या आवाजाला कंप फुटला होता.


“तुझी हीच प्रतिक्रिया असेल हे मला ठाऊक होतं. म्हणूनच मी सांगायचं टाळत होतो. भावनेच्या आहारी जाऊन तू मित्रावर हात उगरलास. रवी आवर रे याला.” प्रकाशच्या हातून कॉलर सोसवून घेत राघव बाजूला होत म्हणाला.


“प्रकाश, तुझं काय चाललंय? मान्य आहे की तुझे रत्नावर खूप प्रेम आहे; पण राघव काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे.”


“आय एम सॉरी राघव, मला माफ कर. मी..” प्रकाश राघवसमोर हात जोडून उभा होता. पुढे बोलायला त्याचा कंठ फुटेना.


“इट्स ओके! तुझी रिऍक्शन स्वाभाविक होती रे. तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर कदाचित तोही असेच वागला असता; पण मी खरंच तिला कोठ्यावर पाहिले आहे.” तो म्हणाला.


“तुम्ही दोघं आधी बसून घ्या.” कोठ्याचे नाव घेताच प्रकाश चिडेल हे गृहीत धरून रवी दोघांना बसवत म्हणाला.


“राघव, आता तू सविस्तर सांग आणि प्रकाश, तो बोलत असताना तू गप्पपणे ऐकून घे. नंतर जे बोलायचं ते बोल. “दोघांनाही दम देत रवीने राघवला इशारा केला.


“दोन महिन्यापूर्वी मी नाशिकला माझ्या मित्राकडे आलो होतो.” राघव सांगू लागला.


“तो माझा बालमित्र. तसा एरवी अगदी सभ्य; पण हातात जरा पैसा खुळखुळत असला की अंगात जरासा रंगेलपणा संचारतो.त्यादिवशी त्याच्याकडे पैसे आले होते, मला म्हणाला की चल तुला जन्नतची सैर करवून आणतो. मीही मजा म्हणून त्याच्यासोबत गेलो.


कॉलेजची साडेपाच वर्ष नाशिकला काढली आपण.पण आपल्याला हे शालिमार गल्लीच काही ठाऊक नव्हतं आणि हा मित्र पाच सहा महिन्यात इथे बिल्डर म्हणून कामाला लागला नि मला जन्नत दाखवायला घेऊन गेला. “ राघव हसत म्हणाला.


“नेमके कुठे?”


“शिलाबाईची कोठी असं काहीसं नाव होतं. जाताना मी उत्साही होतो मात्र तिथेगेल्यावर मला कसेतरी व्हायला लागले. त्या नटलेल्या मुली, स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी सूरु असलेले त्यांचे चाळे.. अशा स्वर्गपेक्षा आपण नरकात सडलेले बरे म्हणून मी तिथून काढता पाय घेत होतो तर पठ्याने मला जबरदस्तीने आत खेचले.


तिथे बऱ्याच सुंदर सुंदर मुली होत्या. खिशाला परवडेल अशा मुली बघायच्या नी त्यांच्यासोबत जायचं असं सांगून तो एका मुलीला घेऊन आत गेलासुद्धा. मी तिथेच घुटमळत होतो. बाहेर पडायची वाट शोधत होतो. तोच एक लावण्यवती माझ्या बाजूने गेली.


शुभ्र साडीतील ते दुधाळ सौंदर्य, काळेभोर डोळे आणि लाल ओठावरील मोहित करणारे हास्य..! मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तोच तिथली ती शिलाबाई माझ्या समोर येऊन उभी राहिली.


“ऐसा टुकूर टुकूर क्या देख रहा रे? चंपा हैं वो! इस कोठी की राणी! तुझे नहीं परवडेगी।” ती म्हणाली तसे मी नजर दुसरीकडे केली पण शपथेवर सांगतो ते डोळे मी कधीच विसरू शकणार नाही. प्रकाश तू दाखवलेल्या फोटोतील मुलीचे डोळे हुबेहूब तसेच होते.

मी तर तिथून निघून आलो; पण नंतर मित्राला त्या चंपाचे रहस्य विचारले. तेव्हा तो म्हणाला की ती तिथली स्पेशल वेश्या आहे. सामान्य माणसाच्या आवक्याबाहेरची.


बस्स! मला एवढंच माहिती आहे. त्यानंतर मी कधीच तिथे गेलो नाही.” राघव गप्प झाला.


“मला तिथला पत्ता हवाय. नेमकी कुठे आहे ही शालिमार गल्ली?” राघव गप्प होताच प्रकाशने त्याला शांतपणे विचारले.


“प्रकाश मला वाटतं तू तिथे जाऊ नयेस. म्हणजे होवू शकतो की राघवचा गैरसमज झाला असेल. निव्वळ डोळ्यावरून ती तीच आहे कशावरून?” रवी त्याला म्हणाला.


“हां, होवू शकतं. कदाचित ती ती नसेलही.” राघव.


“आणि कदाचित असेलही. कुणास ठाऊक ती तिथे त्रासात असेल, माझी वाट बघत असेल.” प्रकाशच्या मनात नुसती तगमग निर्माण झाली होती.


“मित्रा, ती तुझी रत्ना आहे की नाही माहित नाहीत. मात्र ती त्रासात आहे असे मला वाटले नाही. उलट ती तिथे पूर्णपणे रुळल्यासारखी, एकदम प्रोफेशनल अशी वावरत होती. सगळ्यात कॉन्फिडन्ट आणि स्मार्ट!”

.“मग तर मला भेटायलाच हवे. जर ती कुणी वेगळी असेल तर गोष्ट निराळी; पण जर ती रत्ना असेल तर माझ्या आयुष्याशी खेळल्याबद्दल तिला स्पष्टीकरण द्यावेच लागेल.” तो भिंतीवर मूठ आपटत म्हणाला.


“ठीक आहे. तुला वाटते तर एकदा जाऊन यायला हरकत नाहीय. मात्र आता शांतपणे झोपा. सकाळी काय ते शांत डोक्याने विचार करून निर्णय घे. ठीक आहे ना?” रवी समजूतदारपणे म्हणाला.


झोपायला म्हणून तिघे आपापल्या बेडवर पडले पण कोणालाच झोप येईना. तो फोटो बघायला नको होता असे रवीला वाटत होते, तर फोटो बघून आपण हिला ओळखतो हे सांगायला नको होते असे राघवला वाटत होते.


आणि प्रकाश?


तो तर नुसता पाण्यावाचून माशाप्रमाणे तडफडत होता. ती चंपा म्हणजे रत्ना नसावी असे मनातल्या मनात किती वेळा देवाला आवळून झाले असेल.

‘अन् जर ती रत्नाच असेल तर?’

त्या प्रश्नाने शरीराला असंख्य इंगळ्या डसाव्यात तशा त्याला वेदना होत होत्या.

दुसऱ्या दिवशी तिघेही मित्र आपापल्या वाटेने निघाले. तसे दोघांनीही त्याला सोबत येऊ दे म्हणून विनवणी केली होती ;पण आता हे सत्य त्याला स्वतःलाच समजून घ्यायचे होते त्यामुळे त्याने त्यांना नम्रपणे नकार दिला.


“नाशिक.. शालिमार गल्ली.. तिथली जन्नत अनुभवायची असेल तर रात्रीहून दुसरी कुठली चांगली वेळ नाही!”

तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेताना वेटरला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराने प्रकाशची पार खिन्नता झाली. चंपाला भेटायचं म्हणजे रात्र होईपर्यंत थांबावे लागणार होते. तसे सायंकाळ होत आली होतीच; मात्र त्यापुढील सरणारे तास त्याला युगाप्रमाने भासत होते.


वेळ घालवावा म्हणून तो रेस्टॉरंटच्या बाहेर पडला. कार होती तरी त्याला उगाच पायी फेरफटका मारावा वाटले. तेवढाच वेळ निघून जाईल ही वेडी समज.


आपल्याच तंद्रित जात असताना तो त्याच्या जुन्या आठवणीत हरवला होता. नाशिक शहर.. याच शहरात त्याचे डॉक्टरकीचे स्वप्न पुरे झाले होते. कधीकाळी अभ्यासाला रात्र रात्र पुरत नव्हत्या आणि आज याच शहरात तो एका वेश्येला भेटायला म्हणून रात्र होण्याची पळपळ वाट बघत होता.


“ए पोरीऽऽ जीव स्वस्त झालाय का तुझा?”

रस्त्याच्या कडेने आलेल्या आवाजाच्या गलक्याने प्रकाश विचारातून बाहेर पडत त्या दिशेने पाहू लागला. रस्त्याच्या त्या बाजूला थोडी गर्दी जमा झाली होती. काय झालेय ते बघायला तोदेखील त्या गर्दीत सामिल झाला.


एक छोटी मुलगी भेदरलेल्या नजरेने इकडेतिकडे पाहत रडत होती आणि तिच्या बाजूला बघ्यांची नुसती गर्दी जमा झाली होती. तो गर्दी बाजूला सारत तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तिच्या हाताला थोडं लागले होते आणि त्यातून रक्तही येत होते.

“बाळा, तुला लागलंय. त्रास होतोय का गं?”
त्याने प्रेमाने विचारताच तिला आणखी रडायला आले.


“तुला तर मलमपट्टी करायला लागेल, चल आपण समोरच्या दवाखान्यात जाऊया.” तिच्याजवळ कुणीही येत नव्हते त्यावरून सध्याच्या घडीला ती एकटीच आहे हे त्याच्या लक्षात आले. होते.


“नाही, मला भीती वाटते.” तिने भोकाड पसरायला सुरुवात करताच त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.


“काही होणार नाही. मी आहे ना? मी तुझ्या सोबत असेन.” ती नाही म्हणत असतानाच त्याने तिला कडेवर उचलून घेत थोड्याच अंतरावर असलेल्या एका छोट्या क्लिनिकमध्ये तिला घेऊन गेला.


दवाखाना छोटा असला तरी तो दवाखानाच होता त्यामुळे ती छोटी पोर आणखी रडायला लागली. तिथल्या डॉक्टरांना प्रकाशने आपली ओळख सांगून स्वतःच तिची जखम स्वच्छ करून त्यावर पट्टी बांधून दिली. ते करता करता तो तिच्याशी गप्पा मारत होता आणि त्यामुळे तिच्या त्रासाकडे तिचे लक्षच गेले नाही.


“बघ, तुझी पट्टी करून झाली देखील. तुला काही त्रास झाला नाही ना?”


“अजिबात नाही. तुम्ही तर खूप मोठे जादूगर आहात.” ती तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखत म्हणाली.


“जादूगर नाही गं. मी तर डॉक्टर आहे.”


“तुम्ही खरोखरीचे डॉक्टर आहात? तिचा प्रश्न.


“हो तर.” तिला उचलून घेत तो हसत उत्तरला.


मी मोठी झाली की मी पण तुमच्यासारखीच डॉक्टर होईन.” त्याच्या गळ्यात सहजतेने एका हाताने विळखा घालत ती म्हणाली.


“ओहो, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर?” त्याने तिच्या नाकाला चिमटीत पकडत म्हटले.


”पण मला तर या डॉक्टर मॅडमचं नावच माहित नाही. काय नाव बरं तुमचं?”


“तुम्हाला माझं नाव कसं माहित असणार? मी तर सांगितलेच नव्हते ना?” ती खुदकन हसत म्हणाली.


“हो की गं. आता तरी सांग.”


“माझं नाव आहे.. मनू!”

त्याच्या मानेभोवती तिच्या चिमुकल्या हाताचा विळखा आणखी घट्ट झाला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all