एक इजाजत.भाग -६१

होईल का चंपा आणि प्रकाशची भेट?
एक इजाजत!
भाग -६१

”पण मला तर या डॉक्टर मॅडमचं नावच माहित नाही. काय नाव बरं तुमचं?”


“तुम्हाला माझं नाव कसं माहित असणार? मी तर सांगितलेच नव्हते ना?” ती खुदकन हसत म्हणाली.


“हो की गं. आता तरी सांग.”


“माझं नाव आहे.. मनू!”

त्याच्या मानेभोवती तिच्या चिमुकल्या हाताचा विळखा आणखी घट्ट झाला होता.


“मनू?”


“हम्म.” ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली.


“आणि काय गं? तू अशी एकट्याने कुठे फिरतेस? आईबाबा कुठे आहेत? तुझा पत्ता सांग बघू. मी तुला घरी सोडून देतो.” तो म्हणाला.


“मला घर नाहीये.” ती खाली नजर करून स्फून्दू लागली.


“अगं असं कसं? आणि आईबाबा? ते कुठे आहेत?”


“मला आईबाबा पण नाहीत.”

तिचे हे उत्तर त्याला अनपेक्षित होते. आईवडील नाही, घर नाही म्हणजे ही मुलगी राहते तरी कुठे?


“मागच्या गल्लीत एक अनाथाश्रम आहे तिथली ही मुलगी आहे.” दवाखान्यातील नर्सने माहिती पुरवली.


“तुला ठाऊक आहे?” त्याचा तिला प्रश्न.


“हो, एकदोनदा तिथल्या मॅडमसोबत ही हॉस्पिटलमध्ये आली होती. म्हणून माहिती आहे.”


“अच्छा! मनू, चल मी तुला तिथे सोडून देतो.”


“नाही आमच्या मावशी म्हणतात की अनोळखी लोकांसोबत कुठे जायचं नाही.” त्याच्याच कडेवर बसून ती त्याला सांगत होती.


“अगं पण मी अनोळखी कुठे आहे? आपण मघापासून सोबत आहोत की नाही? चल तुला मी सोडून देतो आणि काय गं? अशी अंधाराची इकडे रस्त्यावर कशी आलीस?”


“मी खेळायला आले होते.” तिची निरागस कबुली.


तिच्याशी गप्पा मारत तो तिला घेऊन आश्रमात आला. तसेही aashrbफार लांब नव्हते. तिथे थोडी औपचारिक बोलणे झाल्यावर त्याला कळले की या अनाथाश्रमातील मुलं जास्तकरून रेड लाईट एरियातील महिलांची आहेत. आपली मुलं निट राहावी म्हणून तिथल्या बायका देणगीही देतात फक्त त्या मुलांची आई वेश्या आहे हे मुलांना कळू नये एवढीच त्यांची इच्छा असते.


‘कोवळ्या जीवांच्या नशिबी हे कसलं जिणं?’ त्याला ऐकूनच फार वाईट वाटले.


“मनू, जा बाळा आणि यापुढे असं रस्त्यावर खेळायला जायचे नाही हं. काळजी घे.” तिला कडेवरून खाली ठेवत तो म्हणाला आणि तिच्या हाती एक चॉकलेट दिले.

ती चॉकलेट घेऊन आनंदाने उड्या मारत जात असताना मध्येच थांबली आणि मग धावत येऊन पुन्हा प्रकाशपुढे उभी राहिली.


“काय गं?” त्याने हसून विचारले.


“काही नाही. थोडं खाली वाका ना. तुम्ही केवढे उंच आहात.” एका हाताने इशारा करत ती म्हणाली.


तिचा रोख न उमजून कपाळावर आठी आणत तो जरासा खाली वाकला आणि तोच टाचा वर करून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले.


“थँक यू डॉक्टर काका. तुम्ही फार छान आहात.” त्याची पापी घेऊन ती झटक्याने पळत गेली.


ती निघून गेली, तो मात्र स्तिमित होऊन तिच्या पळत जाणाऱ्या छबीकडे मन भरून पाहत होता. इवलाश्या ओठांचा तो गोड स्पर्श, टपोऱ्या डोळ्यातून झळकणारी निरागस छटा आणि नकळत्या वयात आलेले पोरकेपण.. तिच्या विचाराने त्याचे हृदय विदिर्ण झाले.


“सर, तुमचे खूप खूप धन्यवाद! ही मनू खूप खोडकर आहे. बाहेर कधी निघून गेली, आम्हाला समजले नाही. पण तुम्ही तिला सुखरूप पोहचवलंत त्याबद्दल आभार.” तिथल्या ताई हात जोडून म्हणाल्या.


“अहो, असे हात जोडू नका. एक माणूस म्हणून मी माझं कर्तव्य केलं, एवढंच. तुम्ही तुमची जबाबदारी निट पाळा. येतो मी.” तो तिथून निघून गेला.


निघताना मनू कुठे दिसते का हे बघायला त्याच्या पायाबरोबर मनही तिथे रेंगाळले होते; पण ती मात्र कुठेच दिसली नाही.

‘एवढ्याश्या वेळात ही कसली ओढ?’

त्यालाच प्रश्न पडला, उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हते. दवाखान्यातून आश्रमात येताना त्याच्या मानेभोवती गुंडाळलेला तिचा हात, थँक यू’ म्हणताना हक्काने तिने त्याच्या गालावर दिलेली पापी.. त्याच्या हृदयात एक वेगळीच भावना उमटून गेली.


आश्रमातून बाहेर पडल्यावर सायंकाळ सरून अंधार पडत आला होता. त्याला शालिमार गल्लीची ओढ लागली होती. त्याची ती ओढ त्या गल्लीची होती की चंपाची.. की रत्नाची?

अहं..ही ओढ ती चंपा म्हणजे रत्ना नाहीये हे सिद्ध करण्याची होती अन् त्यासाठीच त्याची पावले झपाट्याने तिकडे वळली होती.


“किसको मिलना हैं?” कोठीच्या आत पाय ठेवताच शीलाआँटीच्या प्रश्नाने तो हडबडला.


“अरे, मतलब कौनसी लडकी चाहिये? बोहनी का टाईम हैं, किसके साथ वक्त गुजरना पसंद करोगे?” तो काही बोलू पाहत होता त्यापूर्वीच शीलाआंटीने तोंडात विडा कोंबत विचारले.


“मैं.. वो..”


“नए हो क्या? पहलीबार आए हो?” तिचा त्याला सहज करण्याचा प्रयत्न.


“हां, म्हणजे.. तसं नाही..”


“चिंता ना करो साब, पहली बार होगा तो भी हमारी लडकीयाँ तुमको सब सिखा देगी।” तिथल्या झुल्यावर रेलत ती म्हणाली.


“जी आप गलत समझ रही हैं। वो चंपा.. मुझे चंपा से मिलना था।” तो हिंमत करून म्हणाला. तिथे उभ्या असलेल्या मुली त्याच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याला ते कसेतरी होत होते.


“चंपा?”

त्याच्या तोंडून चंपाचे नाव ऐकताच ती खळखळून हसायला लागली.


“चंपा का और एक दिवाना आ गया!” तिचे हसणे थांबत नव्हते.


“प्लीज हसू नका. मला खरंच तिला भेटायचं आहे.” तो गंभीर होत म्हणाला तसे शीलाआँटीनेही तिचा चेहरा गंभीर केला.

“रोकडा लाये हो?’


“जी?”

.“रोकडा..” तिने बोटांची ऍक्शन करत पुन्हा विचारले.


“चंपा कौन हैं, तुम जानते हो? इस कोठे की शान हैं वो। उसे सिर्फ देखने के भी पैसे लगते हैं और तुम तो मिलना चाहते हो। साब जी, माल देखने के लिए पहले माल जरुरी होता हैं!”

त्याने खिशात हात टाकला आणि दुसऱ्याच क्षणी तो हात डोक्यावर मारून घेतला. त्याचं पाकीट कारमध्ये होती आणि कार रेस्टॉरंटच्या पार्किंगला.


“पैसे नसेल तर निघ इथून. चंपा अशी खाली पिली कोणालाही भेटत नसते.”


“शीलाआँटी,माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत पण.. पण ही अंगठी घ्या ना.” हाताच्या अंगठ्यातील जाडजूड सोन्याची अंगठी काढून तिच्या हातात ठेवत तो म्हणाला.


“या अंगठीची किंमत कमीतकमी वीसपंचवीस हजार तरी असेल. पाच मिनिटाच्या भेटीसाठी एवढी रक्कम पुरेशी आहे ना?”


मेरेकु येडी समझता हैं तू?” त्याच्या अनपेक्षित वागण्याने उठून उभी राहत ती म्हणाली.


“प्लीज, फक्त पाच मिनिटं. अंगठी अस्सल सोन्याची आहे.” तो म्हणाला.

त्याच्या चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव बघून शीलाआँटीने अंगठी ताब्यात घेतली आणि वरच्या पायरीकडे इशारा केला.

रेशमा, इसको चंपा के खोली तक छोडके आजा।”


त्याच्यासोबत तिने तिथल्या एकीला वर धाडले. जाता जाता रेशमा मुद्दाम त्याला हात लावत होती तसे त्याने आपले अंग आकसून घेतले.


“ए, चिकणे तुझी जवानी काय चंपासाठीच राखून ठेवली आहेस होय?” ती मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली. तो मात्र गप्पपणे तिच्यासोबत चालत होता.


“ही चंपाची खोली. दारावर तीनदा टकटक करायचं. जर ती म्हणाली आत ये तर आत जा नाहीतर मग परत खाली यायचं. मी तुझ्यासाठी तैयारच आहे. कळलं का?” त्याला डोळा मारत ती हसतच खाली गेली.


चंपाच्या खोलीसमोर प्रकाश उभा होता. पायात जणू त्राण उरले नव्हते. गोळे दाटून ते जड झाले होते. तरी हृदयावर दगड ठेवून मोठ्या हिमतीने त्याने दार वाजवले.

टक
टक
टक…

“आत या. दार उघडेच आहे.” आतून एक मधुर आवाज कानावर आला आणि त्याच्या हृदयाची कपंने वाढीला लागली.

‘रत्ना? आवाज तर तसाच येतोय? ही खरचं रत्ना आहे का? पण चेहरा कुठे पाहिलाय?’ मनाला आवरत त्याने आत पाऊल टाकले.


ती अजूनही पाठमोरी उभी होती. शुभ्र साडी ल्यालेली, मोकळ्या केसात मोगऱ्याची उधळण केलेली. त्याच्या सुगंधाने खोली भरून गेली होती. पायातील साखळ्यांची छुणछुण सावरत ती त्याच्याकडे वळली.


“बोला सेठ, काय सेवा करु?”

गालावर आलेली बट नाजूक हाताने हलकेच कानामागे टाकत तिच्या लालचुटुक ओठांची मोहक हालचाल झाली

आणि तिच्या चेहऱ्यावर नजर खिळताच प्रकाशच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळून वाहू लागले.

“रत्ना..”

त्याच्या आवाजातील थरथर तिला स्पष्टपणे जाणवत होती.

“चंपा! मी चंपा आहे. या कोठीवरची राणी. बोला ना सेठ, तुम्हाला कसली सेवा करून हवी आहे?” त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत ती मंद हसत म्हणाली.

पुढील भाग लवकरच.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all