एक इजाजत.भाग -६२

वाचा चंपा आणि प्रकाशची भेट!
एक इजाजत!
भाग -६२

“रत्ना..”

त्याच्या आवाजातील थरथर तिला स्पष्टपणे जाणवत होती.

“चंपा! मी चंपा आहे. या कोठीवरची राणी. बोला ना सेठ, तुम्हाला कसली सेवा करून हवी आहे?” त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत ती मंद हसत म्हणाली.


“चंपा? नाही.. रत्नाच आहेस तू. तुझे हे डोळे, तुझे हे हास्य.. तू माझी रत्ना असल्याची ग्वाही देतेय. रत्ना, असं काय घडलंय की तुला असे चंपा बनून इथे वावरावे लागत आहे?” तो तिच्याकडे एकटक बघत बोलत होता.


“कोण रत्ना? अहो सेठ, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी कोणी रत्ना नाहीये तर चंपा आहे. तुम्हाला माझ्याकडून सेवा करायची असेल तर तुमचे स्वागत आहे; अन्यथा जाऊ शकता.” ती शांतपणे म्हणाली.


“असा कसा जाऊ? तुझ्यासाठी मी पैसे मोजले आहेत.”


“पैश्यांचा माज मला दाखवू नका सेठ. जितके पैसे मोजले असतील ना त्याच्या दुप्पट देऊन तुम्हाला इथून घालवायची धमक या चंपामध्ये आहे.” ती त्यालां प्रत्युत्तर देत म्हणाली.


“ओह, म्हणजे केवळ पैश्यांसाठी तू हे काम करतेस? तू ती रत्ना नाहीयेस जीने माझ्यासोबतीने आमच्या संसाराची स्वप्न पाहिली होती.


रत्ना तुझ्यासोबत काय घडलंय गं? मला सांग ना. मी तुला मदत करतो. आपण दोघं मिळून मार्ग काढू; पण तू आधी इथून चल. अशा ठिकाणी राहू नकोस गं. मी तुला घ्यायला आलोय.” तिचा हात पकडायला त्याने हात समोर केला, तसे तिने झटक्याने तिचा हात मागे घेतला.


“शीलाआँटीऽऽ घेऊन जा याला. अगं असं कोणालाही माझ्याकडे पाठवायला तुला मी रस्त्यावर पडलेली वाटले का?” ती दाराकडे बघून मोठ्याने गरजली.


“रत्ना, मी तुला कोणीही वाटतोय? अगं चार वर्षात तू मला परकं समजायला लागलीस? तिकडे अख्खं गाव समजतंय की तू कुणा श्रीमंत मुलाबरोबर पळून गेलीस आणि इथे तू असं काम करते आहेस? तुला लाज नाही का वाटत?” तो दुखावून म्हणाला.


“सेठ, लाज विकली तेव्हाच तर मी धंद्याला लागले ना? आणि हो, हे इथे असे येऊन लेक्चर नाही द्यायचे. निघा तुम्ही.”


“मी जायलाच आलोय. तुला सोबत घेऊन जायला आलोय. तू चल ना. इथल्या त्या बाईला हवे तेवढे पैसे मी देईन. रत्ना..”


“प्रकाशऽऽ” त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली.

“तुमच्या पैशांचा काय तो माज हिवरेवाडीत दाखवायचा. ही माझी वस्ती आहे. इथे केवळ माझा हुकूम चालतो. बऱ्या बोलाने जाणार नसशील तर इथल्या पोऱ्यांकडून ओढत घेऊन जावं लागेल.”


“रत्ना?” तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत होता. ती त्याच्याशी असे काही बोलेल. त्याने कल्पनाही केली नव्हती.


“ठीक आहे. जातोय मी. पण लक्षात ठेव, शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रकाश केवळ तुझी वाट बघत असेल हे विसरू नकोस. रत्ना, अगं आपण एकमेकांवर प्रेम केलं होतं, मग तू माझ्याशी असं का वागलीस? मुंबईला यायला निघाली होतीस ना? मग गजा आणि दिनकर दादाला फसवून इथे का आलीस?” त्याने डोळ्यात पाणी आणून विचारले.


“हे बघ, मी तुझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही.”


“रत्ना, माझं प्रेम आहे गं तुझ्यावर. तू कशीही असलीस तरी माझी आहेस. तुला स्वीकारायला मी तयार आहे. सोडून दे ना गं हे सारं. मी मोठा डॉक्टर झालोय गं. माझ्या कमाईत आपण आनंदी राहू.”


“आनंदाच्या प्रत्येकाच्या व्याख्या निराळ्या असतात. मी इथे खूप आनंदी आहे, सुखी आहे तेव्हा तुझ्याबरोबर कुठेच येणार नाही.” ती ठामपणे म्हणाली.


“आणि डॉक्टर साहेब मला स्वीकारण्यापेक्षा आमच्या वस्तीतील एखाद्या मुलीला शिकवा. तिला तुमच्यासारखे डॉक्टर करा. माझ्यावर तुझे खरंच प्रेम असेल तर हे करून दाखव. त्यानंतर मग मला न्यायला ये. मी येईल तुझ्यासोबत.” ती त्याच्याकडे बघून हसत म्हणाली.

तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत होता.


“नाही होणार ना? मला माहिती आहे. अरे इथे येणारे पुरुष आपल्या रंगाची उधळण करून एखादीला आई बनवून जातात तेच स्वतःच लेकरू स्वीकारू शकतं नाही तर तुझ्यासारखे मुलं वेश्येच्या मुलांना का स्वीकारतील रे?

तू जा आणि मला विसरून तुझे आयुष्य सुरु कर.” ती त्याच्याकडे पाठ फिरवून उभी राहिली.


ती त्याच्यासोबत येणार नाही हे स्पष्ट होते; मात्र त्याच्या प्रेमाला ठुकरावत ती इथे का आली या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला मिळाले नाही आणि ती ते देणार नाही हे ही त्याला कळून चुकले होते.

तो भरल्या डोळ्यांनी तिच्या झगमगत्या खोलीतून बाहेर पडला. दाराजवळ शीलाआँटी उभी होती. कदाचित त्या दोघांचे संभाषण तिने ऐकले असावे.


“चंपा वह कोण था रे?” आत येत पाठमोरी असलेल्या तिला शीलाआंटीने विचारले.


“प्रकाश!” ती तिच्याकडे वळून उत्तरली.


प्रकाशसमोर रोखून धरलेले अश्रू त्याला पाठमोरे होताच बरसले होते आणि परिणामी तिचे काळेभोर डोळे लाल झाले होते.


“प्यार करता हैं तुझसे?”


“खूप जास्त! बालपणापासूनचं आमचं प्रेम. वेडा, म्हणत होता तुला घ्यायला आलोय. हे जग सोडून दे आपण नव्याने सुरुवात करू.” डोळे पुसून ती हसत म्हणाली.


“तो पगली, जाना चाहिये था। ऐसा प्यार करनेवाला सच्चा आशिक सबको नहीं मिलता!”


“शीलाआँटी, अब ये कोठीही मेरा परिवार हैं; हे सारं सोडून मी कशी जाऊ शकते? अनाथाश्रमातील आपली मुलं, त्यांच्या शाळा, दवाखाने या सगळ्यांना देणग्या देण्याचे काम मी हाती घेतलेय. ते इथे राहूनच तर मी पूर्ण करू शकेन ना?


शिवाय परत गेले तर माझ्या इथे येण्याचे सर्व रहस्य बाहेर येतील. प्रकाश आणि त्याच्या वडिलांत मला दुरावा निर्माण नाही गं करायचा. आईवडिलांशी दुरावून मी जगतेच आहे; किमान त्याच्या वाटेला तरी ते दु:ख नको यायला.”


“तू एक सयानी, तो वह दस सयाना! तुझ्याशी पाच मिनिटं भेटायचे म्हणून पैश्यांच्या बदल्यात ही दोन तोळ्यांची अंगठी त्याने मला दिली, तेव्हाच वाटलं की काहीतरी गडबड आहे. घे, तुझ्याजवळच ठेवून घे. तुमच्या प्रेमाची निशाणी आहे ही.” तिच्या हातात प्रकाशची अंगठी ठेवत शीलाआँटी निघून गेली.


चंपाने ती अंगठी हातात घेतली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक मोठा थेंब त्यावर पडला.


‘प्रकाश! का रे एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी अशा ठिकाणी बघूनसुद्धा तुझं प्रेम तसुभरही कमी झालं नाही. मी तुझ्या प्रेमाच्या पात्र नाहीय रे. हे असं शरीर.. ज्याला तू हात लावायला निघाला होतास, माझ्या स्पर्शाने तूही कलंकित झाला असतास रे वेड्या, म्हणून तुला मी हात लावू दिला नाही.


माझ्या वागण्याचा तुला राग आला असेल ना? मला माफ कर.. नाही नकोच माफ करू. माझ्यावर रागावूनच रहा. तेव्हाच तू मला विसरू शकशील.’ ओंजळीने चेहरा झाकून घेत ती हुंदके देऊन रडायला लागली.

_________


डोळ्यातील अश्रू पुसत प्रकाश कोठीबाहेर पडला. इथे पाऊल टाकताना त्याने देवाला कितीदा बजावलं होतं की ती चंपा म्हणजे रत्ना नाहीये हेच घडू दे; पण देव मनुष्याच्या मर्जीने कुठे चाल खेळतो? त्याला जे हवे तेच तो घडवून आणतो. रत्ना आणि त्याची ही भेट देवानेच योजली असेल तर ती कशी टळणार होती?


‘रत्ना! किती बदललीस गं तू? कधी कुणाशी मान वर करून न बोलणारी तू आज एका कोठीवरची राणी म्हणून मिरवते आहेस. तू ती हिवरेवाडीतील निरागस रत्ना नाहीसच. तू तर या कोठीवरची चंपा आहेस. पण मग तरी तुझ्या फितूर डोळ्यात माझी रत्ना का डोकावत होती?’


कारमध्ये बसत त्याने एक हुंदका दिला. वाटलं त्याला की असंच भरधाव हिवरेवाडीत निघून जावं आणि अण्णा, गजा अन् दिनकरला इथं घेऊन येऊन त्या दिवशी नेमकं काय घडलं ते जाणून घ्यावं. पण हे होणार नाही हे त्याला ठाऊक होते. शालिमार वस्तीत येऊन बदललेली चंपा भूतकाळाबद्दल काहीही बोलणार नाही हे त्याला कळून चुकले होते.


“सेठ तुमची काय सेवा करू..?”

पांढऱ्या साडीतील तिचे सौंदर्य आणि ते शब्द आठवून त्याला अगदी भडभडून आले. शेवटी डोळे पुसून त्याने कार सुरु केली आणि तो जळगावच्या दिशेने निघाला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all