एक इजाजत.भाग -६३

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६३

कारमध्ये बसत त्याने एक हुंदका दिला. वाटलं त्याला की असंच भरधाव हिवरेवाडीत निघून जावं आणि अण्णा, गजा अन् दिनकरला इथं घेऊन येऊन त्या दिवशी नेमकं काय घडलं ते जाणून घ्यावं. पण हे होणार नाही हे त्याला ठाऊक होते. शालिमार वस्तीत येऊन बदललेली चंपा भूतकाळाबद्दल काहीही बोलणार नाही हे त्याला कळून चुकले होते.


“सेठ तुमची काय सेवा करू..?”

पांढऱ्या साडीतील तिचे सौंदर्य आणि ते शब्द आठवून त्याला अगदी भडभडून आले. शेवटी डोळे पुसून त्याने कार सुरु केली आणि तो जळगावच्या दिशेने निघाला.


रात्रीचा प्रहर, मनात विचारांचे उठलेले वादळ, त्याच्या बालपणीच्या रत्नाचा निरागस चेहरा आणि आता अनुभवाने बरीच परिपक्व झालेली ती सौंदर्यवती चंपा.. त्याने कारचा वेग आणखी वाढवला.


काय करावे? कुठे जावे? त्याला काही सुचत नव्हते. वेगात पळणारी कार आणि त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमुळे धूसर दिसणारा रस्ता.. अती वेगामुळे कार आता वेडेवाकडे वळण घेत धावायला लागली होती.


कार अनियंत्रित होत आहे हे ध्यानात येताच त्याने डोळे पुसले आणि कार ताब्यात करण्याचा प्रयत्न करू लागला. मनात विचार आला की पळू द्यावी कार वाटेल तिकडे. आपलं प्रेम आपल्या आयुष्यात नाहीच आहे मग जगून काय उपयोग? आपणही आपल्या प्राणाची आहुती द्यावी.


मात्र मन भरकटले असले तरी डोके अजून शाबूत होते. वेगावर आवर घालत त्याने कार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात तो यशस्वी झाला तरी कार एका झाडाला जाऊन भिडली. झाडाला झालेली टक्कर फार जोरात नसल्यामुळे नशिबाने कसले नुकसान झाले नव्हते.

“रत्नाऽऽ”

मोठयाने ओरडून त्याने मनातील आक्रोश बाहेर काढायला सुरुवात केली आणि स्टीअरिंगवर डोके टेकवले. त्याच्या मुखातून मोठ्याने हुंदके बाहेर पडत होते. रडल्याने मन हलके होते म्हणतात, त्याचे मन मात्र अधिकच जड झाले होते.


पाचदहा मिनिटे त्याचा विलाप तसाच सुरु होता. शेवटी कार रस्त्याच्या कडेला घेऊन तो बाहेर आला..आणि त्याने पुन्हा रत्नाचे नाव मोठयाने पुकारले.


“रत्नाऽऽ…

का वागलीस गं माझ्याशी असं? का खेळलीस भावनांशी?” त्याचा आक्रोश हृदय पिळवतून टाकत होता.थांबलेला विलाप परत सुरु झाला.


अचानक आकाशात मेघांनी गर्दी केली आणि टपोऱ्या थेंबाच्या पावसाने अकाली बरसायला सुरुवात झाली. पावसाच्या माऱ्याने प्रकाश नखशिखान्त भिजला होता. चंपाने दिलेल्या वेदनेने आक्रंदलेले त्याचे मन पावसाच्या थंड स्पर्शाने आणखी पेटून उठत होते.


“..रत्ना आता पावसात भिजायला वेडी आहेस का? तुला ठाऊक आहे ना? पाऊस बाधतो मला.”

“मी रे कसली वेडी? वेडा तर तू आहेस. डॉक्टर होतो आहेस ना? तरी पावसाला घाबरतोस?”

अंगावर बरसणाऱ्या जलधाराबरोबर त्याच्या मनात आठवणीच्या जलधाराही वर्षत होत्या. तो डॉक्टर होणार हे सांगायला तिला भेटलेला तो आणि श्रावणातील बरसातीने भिजलेले ते दोघं.. दोघांच्या प्रेमाची ती आठवण कधीतरी विसरण्यासारखी होती का?


नभातील पावसाबरोबरच त्याच्या डोळ्यातील पाऊस अविरत बरसत होता. दुःख, दुःख आणखी किती दुःख? किती त्या वेदना? जिच्यासाठी इतक्या वर्षापासून तळमळणाऱ्या त्याच्या जीवाला आजही वेदनाच मिळाली होती.. कदाचित आयुष्यभराची!


पावसाचे कोसळणे थांबायचे नाव घेत नव्हते. प्रकाशच्या अंगात थंडीने हूडहुडी भरायला लागली होती. पाऊस आणि आसवांनी धुवून निघालेल्या चेहऱ्यावरून त्याने एकदा हात फिरवला आणि कारमध्ये बसून तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला.


“सर, तुम्ही पूर्ण भिजले आहात. असे कसे इतके ओले झालात?” हॉस्पिटलच्या आवारात पोहचताच वॉचमनकाकांनी कारचे दार उघडत त्याच्या अवतारकडे बघून विचारले.


“मी ओके आहे. फक्त एक कडक कॉफी वर पाठवायला सांगा.” जास्त काही न बोलता तो तडक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या त्याच्या घरी जायला निघाला.


“गुड इव्हनिंग सर..” त्याला बघताच रिसेप्शनवर असलेली नर्स उठून उभी झाली. तो मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला.


नेहमी हसतमुखाने वावरणारे डॉक्टर ग्रीट करूनही काहीच रिस्पॉन्स न देता निघून गेले हे बघून तिला आश्चर्य वाटले.


“निशा सरांनी कडक कॉफी मागवली आहे. ती घेऊन जा.” वॉचमन काका तिथे येत म्हणाले.


“हो पण त्यांना काही झालंय का? एरवी पावसाचा फोबिया असलेले सर इतके चिंब कसे झालेत?”


“अगं म्हणूनच कॉफी आणि काही गोळी बिळी असेल तर घेऊन जा आणि साहेबांना जास्त प्रश्न करू नकोस.”त्यांनी तिला तंबी दिली.

नाही हो, मी त्यांना कसं विचारू? काळजी वाटली म्हणून तुम्हाला प्रश्न केला. लगेच कॉफी घेऊन जातेय.” हॉस्पिटल कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात जात ती म्हणाली.


घरी आलेल्या प्रकाशने बाथरूममध्ये जाऊन गरम गरम पाणी अंगावर घेतले आणि कपडे बदलून तो बाहेर आला. हॉल मध्ये टेबलवर कॉफी आणि सर्दीची गोळी बघून त्याला किंचित हसू आले.


आपल्या स्टॉफवर थोडी माया लावताच बदल्यात तेही आपल्याला माया लावतात. मग मी तर रत्नावर इतकं प्रेम केलं होतं तरी तिने प्रेमाच्या बदल्यात हे दुःख का दिले?

हृदयातील वेदना परत डोळ्यातून वाहू लागली. कॉफी न पिताच त्याने नुसती गोळी घेतली आणि अंगावर पांघरून घेऊन तो बेडवर पडला.


मिटल्या डोळ्यासमोर त्याची प्रेयसी असलेली निरागस रत्ना आणि ओठांना लाल लाली लावलेली, केसांच्या बटेशी चाळा करणारी कोठ्यावरची चंपा दोघीही कितीतरी वेळा येत होत्या. शेवटी दिवा मालवून, डोळे गच्च मिटून तो तसाच हुंदके देत झोपी गेला.

_______

“गुडमॉर्निंग सायेब!”

सकाळी आलेल्या कामवाल्या काकूच्या आवाजाने त्याची झोप चावळलीखरी पण तो तसाच पडून होता.


“हे काय सायेब? आज काय तुमच्या त्या योगा की काय त्याला सुट्टी काय? मस्त निवांत झोपून आहात ते?” ती एकटीच बडबड करत कामाला लागली.


“ही कॉपी केव्हाची जी? अशी गार गार कॉपी पितात होय? त्या कॅन्टीनच्या कॉपीला माझ्या हातची चव तरी असणार आहे का?” कप उचलून स्वयंपाकघरात जात तिने पाचच मिनिटात तिची नेहमीची प्रकाशला आवडणारी कॉफी घेऊन आली.


“सायेब, तुमची कॉपी. साहेब..?”

तिने कॉपी म्हटल्यावर नेहमी तिचा उच्चार दुरुस्त करणारा तो एक अवाक्षरही बोलला नाही हे बघून तिने काळजीने त्याला हात लावून बघितला आणि तेवढ्याच तत्पतेने हात मागे खेचला.


त्याचे अंग तव्यासारखे तापले होते आणि तापाच्या ग्लानीत त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. तिने घाबरून हॉस्पिटलमध्ये फोन करून नर्सला बोलावून घेतले. तिथल्या सिनिअर नर्सने त्याला तापाचे इंजेक्शन देऊन नेहमीच्या व्हिसीटींग डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार इतर ट्रीटमेंट सुरु केली.


“रत्ना.. तू चंपा नाहीयेस. मनू.. माझी मनू..”

“रत्ना.. मनू..”

तो अस्पष्ट असे काहीतरी बरळत होता. त्याच्या हॉस्पिटलचा अख्खा स्टॉप त्याची डोळे उघडायची वाट बघत होते. कामवाल्या काकू तर सारखा डोळ्याला पदर लावत होत्या.

तासाभराने ताप उतरला तसे त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. भोवताली काय चाललेय त्याला काहीच कळत नव्हते. हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये स्वतःला झोपलेले बघून आणि अर्ख्खा स्टॉफ स्वतःजवळ उभे बघून तो उठून बसला.


“काय चाललंय? तुम्ही सगळे इथे काय करताय? आणि मुख्य म्हणजे मी इथे काय करतोय? सिस्टर, क्विक हे हाताला लावलेले वॅसोफिक्स काढून टाका.” तो उठून बसत म्हणाला.

“सर, तापाने तुम्ही नुसते फणफणून होतात. त्यामुळे आपल्या व्हिसीटिंग डॉक्टरांना बोलावून ट्रीटमेंट सुरु केलीये. आता ते सांगणार तेव्हाच आम्ही वॅसोफिक्स काढू.” नर्स.


“मी ठीक आहे. काहीच झालेलं नाहीये. काल पावसात भिजलो म्हणून ताप आला असेल.”


“होय हो सायेब, पण पावसात भिजायचं कशाला? तुम्हाला पाऊस बाधतो हे ठाऊक आहे ना? तरीही असं वागलात? आमच्या सगळ्यांच्या जीवाला किती घोर लागला होता म्हणून सांगू?” कामवाल्या काकूंनी पुन्हा डोळ्याला पदर लावला.


“आता मी ठीक आहे, प्लीज रडू नका.” हाताचे सलाईन स्वतःच काढत तो जरा मोठ्या स्वरात म्हणाला.


“सर, तुम्ही काय करताय?”


“काही नाही, तुम्ही करायची कामं करतोय. अरे माझेच हॉस्पिटल नि तुम्ही माझा आदेश पाळत नाहीत. कॉटन स्वॅब आणि स्टीकिंग द्या जरा.”


त्याचा वाढलेला आवाज ऐकून नर्सने पटकन त्याच्या म्हणण्यानुसार हाताची सुई काढून टाकली आणि रक्त येऊ नये म्हणून कापसाच्या बोळा लावून त्यावर पट्टी चिकटवली. त्याबरोबर तो बेडवरून उठून परत वर जायला निघाला.

कारची चावी घेऊन बाहेर जायला निघताच काकू वर आल्या

“सायेब, किमान खाऊन तर घ्या.”


“नाही, मला भूक नाहीय.”


“काय झालं साहेब? आता माझ्या हातचं अन्न गोड लागेना झालंय हो?”


“काकू तसं काही नाहीये.”


“तसंच आहे. तुम्ही कोणाचं ऐकून नाही राहिले, माझ्या हातचं खाऊन नाही राहिले. काही तरास आहे का?” तिने एवढे मायेने विचारताच प्रकाशचा चेहरा उतरला.

पुढील भाग लवकरच.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all