एक इजाजत.भाग -६४

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६४

“काय झालं साहेब? आता माझ्या हातचं अन्न गोड लागेना झालंय होय?”


“काकू तसं काही नाहीये.”


“तसंच आहे. तुम्ही कोणाचं ऐकून नाही राहिले, माझ्या हातचं खाऊन नाही राहिले. काही तरास आहे का?” तिने एवढे मायेने विचारताच प्रकाशचा चेहरा उतरला.


“सायेब, तुमची आम्हा सगळ्यांना काळजी वाटत आहे हो. काय झालंय? तुम्ही कोणीतरी वेगळेच वाटून राहिलाय. आमचं काही चुकलं का? या दवाखान्यातील काम करणाऱ्या प्रत्येकावर तुम्ही जीव लावलाय. तुमच्यामुळे आमचे आयुष्य जागेवर बसले आहे. माझं तर काही शिक्षणही नाही तरी तुम्ही मलाही कामावर ठेवून घेतलं. आमची सुखदुःख तुमची झाली मात्र तुमचा त्रास आम्हाला कधी कळलाच नाही.” डोळे पुसत ती म्हणाली.


“काकू, तुम्ही सारख्या रडू नका बरं. काय खायला केलेय ते घेऊन या.” माघारी वळत तो खुर्चीवर जाऊन बसला तशी तिची कळी खुलली.

खुशीतच स्वयंपाक घरात जाऊन तिने पाच मिनिटात गरमागरम पोह्यांची प्लेट आणली. तो मात्र पुन्हा विचारात गुंतला होता.


“सायेब, काय अडचण आहे ते ठाऊक नाही पण मनात खूप मोठा गुंता निर्माण झालाय हे दिसतंय. कसला गुंता झालाय?” त्याच्याजवळ उभी राहत ती.


“काकू, तुम्हाला मन वाचता येतं? त्याने भरल्या डोळ्याने विचारले.


“नाही; पण चेहरा पाहून ओळखता तर येतं ना? शाळा शिकले नाही पण दुनियादारीने लै शिकवलं बघा.”


“काकू..”


“तुमच्या मनात काय चाललंय ते ठाऊक नाही पण अनुभवातून एक सांगू काय? जिथे सगळं संपलं असं वाटतं ना तिथेच आपल्याला नवा मार्ग गवसतो बघा.”


“आता सगळेच मार्ग संपलेत हो. एकही उरला नाही.” तो हतबलतेने म्हणाला.


“असं नसतंय. जे घडलं ते पुन्हा आठवून बघा. तिथेच तुम्हाला काही धागा सापडेल. एकदा ऐका तरी या अडाणीचं.” ती म्हणाली तसे त्याने डोळे मिटून घेतले.


“..सेठ तुमची काय सेवा करू?”

डंख मारल्यासारखे चंपाचे ते विखारी शब्द त्याला आठवले आणि त्याचे मन पुन्हा शीलाआंटीच्या कोठीवर जाऊन पोहचले.


चंपा म्हणून वावरणारी रत्ना, त्याच्यासोबत येण्यास दिलेला नकार.. सारं सारं पुन्हा पुन्हा डोळ्यासमोरून फिरत होते.


“..आणि डॉक्टर साहेब मला स्वीकारण्यापेक्षा आमच्या वस्तीतील एखाद्या मुलीला शिकवा. तिला तुमच्यासारखे डॉक्टर करा. माझ्यावर तुझे खरंच प्रेम असेल तर हे करून दाखव. त्यानंतर मग मला न्यायला ये. मी येईल तुझ्यासोबत.” तिथून निघताना तिचे शेवटचे हेच तर शब्द कानावर पडले होते.


इतका वेळ वावटळीसारखे फिरणारे त्याचे मन एकदम काहीतरी हाती लागल्यासारखे एका ठिकाणी स्तब्ध झाले. इतकावेळ निसटू पाहणारा धागा.. तो इथेच सापडणार होता का?


“सायेब, ही मनू कोण आहे जी? तुम्ही तापात तिचे नाव घेत होतात.” त्याच्यासाठी पाणी घेऊन येत काकूने आठवून विचारले.


“मनू? यस मनूच! माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन!” तो एकदम आनंदाने म्हणाला.


“सायेब?”

.“थँक यू काकू. तुमच्यामुळे मला माझा मार्ग सापडलाय.” कारची चावी घेऊन बाहेर जायला उठत तो म्हणाला.


“अहो सायेब?,हे खाऊन तर घ्या.”


“आता खरंच नको. माझे काम झाले की मी बाहेरच खाऊन घेईन. येतो मी.” तिचे पुढचे काही न ऐकताच लिफ्ट मधून तो खालीदेखील आला.

‘मनू..!’

नुसत्या तिच्या आठवणीनेच त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटले होते.

बँडेज करताना डोळे मिटून रडणारी, विश्वासाने त्याच्या गळ्यात हात गुंफणारी मनू आठवली आणि तो हसला जरासा.

“डॉक्टर काका.. थँक यू!”


त्याच्या हातून चॉकलेट घेतल्यानंतर त्याच्या गालावर गोड पापी देणारी ती.. तिच्याशिवाय काही नातं असल्याशिवायच का त्याच्याशी ती एवढी जुळली होती?


खरंतर मनू नाव ऐकताच त्याच्या हृदयात काहीतरी चमकले होते. तिची इवलीशी मिठी, तिची गोड गोड पापी.. त्याच्या हृदयात एक वेगळीच भावना दाटून आली होती. ती भावना म्हणजे पितृत्वाची भावना होती हे त्याला आता जाणवले होते.


कार चालवताना त्याला आता हलके हलके वाटू लागले. कालपासून जे जडत्व आले होते, डोक्याचा जो भुगा झाला होता ते सगळं नाहीसं झालं होतं. एक गोड, टपोऱ्या डोळ्याच्या चारपाच वर्षांच्या छकुलीच्या आठवणीने त्याचा सगळा त्राण नाहीसा झाला होता.


जळगाव ते नाशिक हे पाच -साडेपाच तासाचे अंतर त्याने कसे पार केले त्याचे त्यालाच माहित. मनात नुसती हुरहूर दाटली होती. डोक्यात आलेले विचार अमलात तर आणायचे होते; पण जिच्याबद्दल हे विचार होते तिला ते रुचेल का प्रश्नच होता.


‘का रुचणार नाही? ती मला आवडली तसा मीही तिला आवडलो होतो की. माझ्या मिठीत किती सुरक्षित होती ती!’ विचार करतच त्याची कार अनाथाश्रमापुढे येऊन उभी राहिली.


“अरे, डॉक्टरसाहेब तुम्ही? तुम्ही तर कालच येऊन गेला होतात?” तिथल्या ताईने त्याला ओळखून विचारले.


“हो. गेलो होतो खरा. पण पाय पुन्हा मला इकडे खेचून घेऊन आले.” तो हसत उत्तरला.


“म्हणजे?”


“डॉक्टर काका?” तेवढ्यात मनूची हाक त्याच्या कानावर पडली.

आश्रमातील सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली होती आणि तिथेच जात असताना मनूला प्रकाश दिसला होता.

“मनूऽऽ” त्याने तिला प्रेमाने उचलून घेतले.


“कशी आहेस बाळा?” तिचे मुके घेत त्याने विचारले.


“हे बघा डॉक्टर, आश्रमातील कार्यालयीन कामकाजाचा वेळ संपलाय. तेव्हा तुम्ही नंतर उद्या येऊ शकता.” तिथली ताई नम्रपणे म्हणाली.


“हो, मला यायला उशीर झाला खरा. पण मनूला सोबत घेऊन जायला मी आलो आहे. “


“म्हणजे?”


“मी मनूला दत्तक घेतोय.”


“सर, असं मनात आले नि मुल दत्तक घेतले एवढं सोप्प नसते ते. त्याची कायदेशीररित्या पूर्ण प्रोसेस असते.”


“मी त्या गोष्टीला तयार आहे.”


“ही प्रोसेस जरा वेळखाऊ असते. किमान सहा महिने किंवा वर्षभर तरी तुम्हाला वाट पहावी लागू शकते.”


“आयुष्याची इतकी वर्ष वाट बघण्यात गेलीच की. आता आणखी एक वर्ष. मात्र मला मनूच हवी.” ती म्हणाला.


“तुम्ही मला घ्यायला आलात?” मनूच्या टपोऱ्या डोळ्यात नवाच प्रश्न तयार होता.


“हो. तू येशील ना? “


“कुठे?”


“आपल्या घरी.”

“घरी? माझ्या घरी?” तिचे डोळे आणखी मोठे झाले.


“हो. माझ्यासोबत तुझ्या घरी यायला तुला आवडेल ना?” तिच्या नाकाला नाक घासत त्याने विचारले.


“होऽऽ खूप खूप आवडेल.” तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नव्हता.


“मनू, आता प्रार्थनेला जा बघू. तुला त्यांच्यासोबत इतक्यात जाता येणार नाहीये.” ताईंनी असं म्हणताच ती प्रकाशच्या कडेवरून खाली आली.


“बाय डॉक्टर काका.” त्याला निरोप देत ती जाऊ लागली.

“मनूऽऽ”

“डॉक्टर काका नव्हे गं, तू मला बाबा म्हणायचंस.” तिला थांबवत तो म्हणाला.


“बाबाऽऽ? तुम्ही माझे बाबा आहात? मग कालच का नाही सांगितलंत? मला तुमची खूप आठवण येत होती.” त्याच्या कमरेला विळखा घालत ती म्हणाली.


“मला पण तुझी खूप आठवण आली. जा आता. मी लवकरच तुला घ्यायला येईल.” तिला परत एकदा मिठीत घेऊन तिच्या गालावर ओठ टेकवत तो म्हणाला.

तिही बाबा भेटल्याच्या आनंदात उडया मारत निघून गेली.

_________


“बाबा..”

इतकावेळ शांतपणे ऐकत असलेल्या मनस्वीचा हुंदका बाहेर पडला.


“म्हणजे माझ्या इथे येण्याला तुमची रत्नाच कारणीभूत आहे तर. त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही.” तिचा स्वर कापरा झाला होता.


“वेडू, ती तर केवळ निमित्त होती गं. आपलं नातं विधात्याने आधीच लिहून ठेवले असावे, म्हणून तर रत्ना भेटण्यापूर्वी आपली भेट झाली होती. त्या पाहिल्याच भेटीत तुझ्याबद्दल मनात आपलेपणा वाटायला लागला होता आणि मीच नाही तर तुदेखील माझ्याकडे खेचली गेली होतीस.” तिच्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला.


“मला स्वीकारण्यापूर्वी मी चंपाची नव्हे, दुसऱ्याच कोणाची तरी मुलगी आहे हे तुम्हाला ठाऊक होते?”


“तिची लेक असतीस तर तिच्या रूपाची सावली तुझ्यावर असती की. पण खरं सांगू? रूपाची सावली नसली तरी तिच्या प्रेमाची सावली तुझ्यावर होती. तुझ्या मनू नावातच ते आलं होतं गं आणि मुळात तिची मुलगी म्हणून तुला मी इथे आणलं नव्हतं. तू मला माझी लेक वाटलीस. मला तुझे आईबाबा दोन्ही व्हायचे होते.


तुला दत्तक घ्यायचे म्हणून अर्ज केल्यावर वर्षभराने तुला मी घरी आणले. त्या एका वर्षात आपला बॉण्ड किती घट्ट झाला होता. मी तुला भेटायला यायचो तेव्हा किती आतूर असायचीस तू? तुझा बाबा होता होता आई कधी झालो मला कळलंच नाही. मनू, तुला आईपण देण्यात मी कुठे कमी पडलो का गं?"


“नाही बाबा कधीच नाही. तुम्ही जगातील बेस्टेस्ट बाबा आहात आणि बेस्टेस्ट आई सुद्धा! यू आर रिअली रिअली ग्रेट. तुमच्या आयुष्याची कहाणी कितीही वेदनादायी असली तरी माझ्यासाठी ती आशेच्या किरणासारखी आहे. तुमच्या आयुष्यात हा ट्विस्ट नसता तर माझ्या आयुष्यात तुम्ही नसता. तेव्हा चंपाजींचे खूप खूप आभार! आणि तुम्हाला खूप खूप
थँक्स. आय लव्ह यू सोऽऽऽऽ मच!”

त्याच्या गळ्यात हात गुंफत तिने त्याच्या गालाची पापी घेतली. अगदी तशीच.. जशी त्यांच्या पहिल्या भेटीत घेतली होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all