एक इजाजत. भाग-६५

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६५


“नाही बाबा कधीच नाही. तुम्ही जगातील बेस्टेस्ट बाबा आहात आणि बेस्टेस्ट आई सुद्धा! यू आर रिअली रिअली ग्रेट. तुमच्या आयुष्याची कहाणी कितीही वेदनादायी असली तरी माझ्यासाठी ती आशेच्या किरणासारखी आहे. तुमच्या आयुष्यात हा ट्विस्ट नसता तर माझ्या आयुष्यात तुम्ही नसता. तेव्हा चंपाजींचे खूप खूप आभार! आणि तुम्हाला खूप खूप
थँक्स. आय लव्ह यू सोऽऽऽऽ मच!”

त्याच्या गळ्यात हात गुंफत तिने त्याच्या गालाची पापी घेतली. अगदी तशीच.. जशी त्यांच्या पहिल्या भेटीत घेतली होती.

आय लव्ह यू टू मनुड्या! तू नसतीस तर माझं आयुष्य कसं असतं त्याची कल्पनाही करवत नाही गं. जगावं तर लागलं असतंच; पण ते आयुष्य एखाद्या विराण वाळवंटासारखे असते. तू म्हणजे त्या वाळवंटात सापडलेला गोड झरा आहेस, ज्यामुळे माझ्या आयुष्यास जिवंतपणा लाभला. तेव्हा थँक्स टू यू!” तिच्या गालाला गाल लावत तो म्हणाला.


ती किंचितशी हसली. स्वतः कसलं क्रेडिट न घेता प्रत्येक गोष्टीचे श्रेय तिला द्यायची त्याची सवय तिला अंगवळणी पडली होती. लहानपणापासून ती हेच तर बघत आली होती. मात्र तिला त्याचा त्याग, त्याचे असीम प्रेम चांगलेच ठाऊक होते.

त्याने पहिल्यांदा जेव्हा तिला तो तिचा बाबा आहे म्हणून सांगितले होते तेव्हा ती किती आनंदली होती. त्या आनंदात आईची कधी आठवणच आली नाही. दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागलेला वर्षभराचा काळ, त्या वेळी दर महिन्याला भेटायला येणारा तो, येताना खूप सारा खाऊ आणि खेळण्या आणणारा आणि ती मात्र त्याच्या प्रेमळ मिठीसाठी आसूसलेली असायची.


हा तिचा बाबा आहे आणि तरी तिला घेऊन जायला का उशीर लावतो हेच तिला कळायचं नाही. मात्र ती त्याची मुलगी म्हणून त्याच्यासोबत यावी यासाठी त्याला काय काय करावे लागले त्याचे त्यालाच ठाऊक. एकतर एकल पालकत्व, त्यातून पुरुष पालक.. मात्र त्याने सगळ्या कसोट्या पार केल्या आणि वर्षभरात तिचा ताबा घेतला.


ती येणार म्हणून संपूर्ण सजलेला हॉस्पिटल, तिची वाट बघणारा स्टॉफ, ती आत येताच झालेली गुलाब पाकळ्यांची उधळण, प्रकाशने तिचे केलेले औक्षण आणि नंतर तिच्या हातून प्रत्येक पेशन्टला दिली गेलेली भेटवस्तू!


त्याच्या आयुष्यात तिच्या येण्याचा सोहळा इतका सुंदर असणार हे कधी तिच्या गावीही नव्हतं आणि मग दरवर्षी हा पायंडाच पडला. ती इथे आली तो दिवस तिचा वाढदिवस म्हणून दरवर्षी साजरा होवू लागला. किती किती खुश होती ती. तिचे जुने आयुष्य पार विसरून गेली होती.

प्रकाश तिचा बाबा होताच; पण तितक्याच ताकदीने त्याने तिची आईही साकारली होती. तिची शाळा सुरु झाली तेव्हा सकाळी सकाळी कामवाल्या काकू येऊन तिचे आवरून द्यायच्या. मात्र तिच्या वेण्या गुंफणे, छान छान तयार करून देणे हे त्याचेच काम असायचे. एरवी सगळा स्वयंपाक काकू करायच्या मात्र रविवारी या लाडोबाला बाबाच्या हातच्या विविध पदार्थांची मेजवानी हवी असायची.


तिचा अभ्यास, तिच्या परीक्षा, तिचे आजारपण आणि मग आलेली तिची किशोरावस्था.. दरवेळी तो तिच्यासाठी आईच्या भूमिकेत उपलब्ध असायचा.


घरचे हॉस्पिटल, पेशंटचे किस्से ऐकून आपणही डॉक्टर व्हावे हे नकळत तिच्या मनावर बिंबले होतेच; पण तिच्या सोळाव्या वाढदिवशी तो तिला मुद्दाम नाशिकच्या आश्रमात घेऊन गेला. तिथल्या छोट्या मोठ्या मुलांना भेटवलं आणि मुद्दामच तिला शालिमार गल्लीतून फिरवून आणत डॉक्टर झाल्यावर इथल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी झोकून द्यायची तयारी ठेवायला सांगितली.


डॉक्टर व्हायचं असेल तर या वस्तीतील स्त्रियांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्यच जणू त्याने तिच्याकडून पाठ करवून घेतले होते आणि त्याचवेळी तिच्या जन्माचे रहस्यही तिला कळले होते.


“बाबा, मी या वस्तीत काम करणाऱ्या स्त्रीची मुलगी आहे?” तिथून बाहेर पडताना डोळ्यात पाणी आणून तिने विचारले तेव्हा त्याच्या हृदयात कालवाकालव झाली होती.


त्याला वाटलं म्हणावं, की तू फक्त माझी मुलगी आहेस. तुझे आईबाबा दोन्हीही मीच! दुसरं कुणीच नाही. पण तिचं सत्य तिला कधी ना कधी कळलंच असतं. तेव्हा तिच्या मनावर होणाऱ्या आघातापेक्षा त्याने तिला स्वतःहून सांगितलेले अधिक परिणामकारक ठरले असते.


“बाबा..”

“हो मनू तू म्हणतेस हे खरं आहे; पण बाळा हा व्यवसाय करणारी स्त्री वाईट असते असं नव्हे ना गं? कुठली स्त्री स्वतःहून अशा कामात स्वतःला झोकून देईल?” तिला पटवून देताना त्याच्यासमोर चंपाचा चेहरा होता. ती या व्यवासायात का आली हे त्याला कधीच कळले नव्हते.


“बाबा, तुम्ही माझे बायलॉजिकल फादर आहात का?”

ती असा प्रश्न कधी विचारेल हा विचार त्याला कधीच आला नव्हता. तिच्या अनपेक्षित प्रश्नाने त्याची पार भंबेरी उडाली.


“सांगा ना बाबा, मी तुमचीच मुलगी आहे ना?”


“मनुड्या, बाप म्हणून सिद्ध व्हायला तो बायलॉजिकल फादर असणे गरजेचे असते का गं? माझ्या प्रेमावर तुला विश्वास नाहीये?”


“नाही, असा विचार कधी मनात शिवणारही नाही. पण माझ्या जन्मदात्या आईवडिलांना मी नकोशी होते म्हणून त्यांनी मला अनाथाश्रमात टाकले हा विचार करून रडू येतंय एवढंच.

बाबा, माझा खरा बाप कोण हे माझ्या त्या सो कॉल्ड आईला तरी ठाऊक असेल का हो?” तिच्या डोळ्यातील प्रश्नाला त्याच्याकडे कसलेच उत्तर नव्हते.


“मनू, तू माझी मुलगी आहेस. डॉक्टर प्रकाश हिवरेपाटलांची मुलगी आहेस, ही तुझी ओळख तुला पुरेशी नाही का? आणि ही ओळख पुरेशी नसेल तर प्रचंड मेहनत करून इतकी मोठी डॉक्टर हो की डॉक्टर मनस्वी एवढीच तुझी ओळख साऱ्या जगाला पुरेशी असेल. डॉक्टर मनस्वीचा मी बाप आहे असे मला अभिमानाने मिरवता येईल.” त्याने तिला मिठीत घेत म्हटले तसा तिचा बांध फुटला.


“नको बाबा, मला तुमची मुलगी म्हणून जगाने ओळखावे, एवढंच पुरेसं आहे.” ती रडत रडत म्हणाली.


“अरे वा! आणि माझं काय? मला माझ्या लेकीचा बाप म्हणून मिरवताना किती अभिमान वाटेल तुला कुठे ठाऊक आहे?” तिच्या पाठीवर हलके थोपटत तो म्हणाला.


“खरंच मला झेपेल हे? इथल्या वस्तीत मी काम करू शकेल?” तिने डोळे पुसत विचारले.


“का नाही झेपणार? तू प्रयत्न तर कर. तुझा बाप कायम तुझ्या पाठीशी उभा असेल.” तो म्हणाला तसे तिचे ओठावर स्मित आले.


“तुम्ही सोबत असलात तर मला जगही जिंकता येईल. फक्त एक मागणे आहे, ते पुरे कराल?” आशेने त्याच्याकडे पाहत तिने विचारले.


“मागून तर बघ.”


“पुढच्या जन्मीही तुम्हीच माझे बाबा असाल? खरेखुरे वाले बाबा? म्हणजे बायॉलॉजिकल फादर?”


“त्यासाठी, मला पुढच्या जन्मात रत्नाशी लग्न करावे लागेल.” तो हसत हसत बोलून गेला.


“रत्ना? ह्या कोण?” सोळा वर्षांच्या तिच्या आयुष्यात तिने हा शब्द पहिल्यांदा ऐकला होता.


“पुढच्या जन्मातील तुझी होणारी आई!” तो हसत म्हणाला खरा; पण त्या मागची दुःखाची झालर तिच्या नजरेतून सुटली नव्हती.


“आणि या जन्मातील?”


“माझी प्रेयसी!”


“बाबा..”


“आता पुढे काही विचारू नकोस. लहान आहेस. थोडी मोठी झालीस की मीच तुला सांगेन.” तिला पुढे न काही बोलू न देता त्याने त्या विषयाला पूर्णविराम दिले.


त्यावेळी तो विषय तसाच राहिला. नंतर कधी बोलण्यात आलंच तर ती त्याचे बालपणाचे प्रेम होते एवढे तिला कळले होते. तिची एमबीबीएसची डिग्री हाती आली तेव्हा आनंदाच्या भरात तिने पुन्हा रत्नाचा विषय काढला आणि त्यावेळी तिला कळलं होतं की रत्ना ही शालिमार वस्तीतील शीलाआँटीच्या कोठ्यावरची एक वेश्या आहे..

जिचे नाव होते चंपा!


ते ऐकून मनूला केवढातरी धक्का बसला होता. ती तिथे कशी आली, का आली हे प्रकाशकडून कळले नव्हते. पुढे काही विचारायची तिची हिंमतच झाली नव्हती आणि मग डीजीओ करताना पुण्यातून नाशिकला चकरा घालून तिने बऱ्यापैकी माहिती मिळवली.


चंपा म्हणजे शीला आँटीच्या कोठीवरची शान! सौंदर्याची खाण, जणू अप्सराच. तिच्यासाठी मोठमोठ्या श्रीमंतांची बुकिंग असते हे तिला बाहेरून कळले होते. प्रत्यक्षात भेटीचा योग कधी आला नव्हता.


असेल ती सौंदर्याची धनी, पण प्रकाशला तिने का सोडून जावं? हे तिला कळले नव्हते आणि त्यामुळे तिला तिचा थोडा राग ही निर्माण झाला होता.पण जेव्हा कळले की ती राहत असलेल्या अनाथाश्रमासारख्या इतर आश्रमांना, एनजिओ, शाळा, हॉस्पिटल्सना ती भरघोस देणग्या देत असते तेव्हा तिच्या प्रतीचा राग मावळून आदर वाढला होता.


चिखलात उमललेल्या कमळासारखीच ती तिला वाटली. स्वतःच वेगळेपण जपणारी! आणि म्हणूनच तिने नाशिकातील त्या वस्तीसाठी हॉस्पिटल बांधण्याचा विचार करताना पहिली विट तिच्या हातून रचण्याची योजना आखली. एवढंच नव्हे तर स्वतःची पहिली कमाई सुद्धा तिच्याच चरणी अर्पण केली होती.


..आणि आज तिला त्या चंपाबद्दल बरेच काही कळले होते. तिचा बाणेदारपणा, तिची आणि प्रकाशची उमलण्यापूर्वीच कोमेजलेली प्रेमकहाणी आणि प्रकाशच्या मनात इतक्या वर्षापासून साचलेले दुख!


आज तिला चंपापेक्षा तिचा बाबा कणभर सरस वाटला. तिच्यावरच्या प्रेमापोटी तो किती एकटा होता याची जाणीव झाली आणि त्याच्यासाठी डोळ्यात अश्रू दाटले.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

_______

🎭 Series Post

View all