एक इजाजत.भाग ६६

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६६


..आणि आज तिला त्या चंपाबद्दल बरेच काही कळले होते. तिचा बाणेदारपणा, तिची आणि प्रकाशची उमलण्यापूर्वीच कोमेजलेली प्रेमकहाणी आणि प्रकाशच्या मनात इतक्या वर्षापासून साचलेले दुख!


आज तिला चंपापेक्षा तिचा बाबा कणभर सरस वाटला. तिच्यावरच्या प्रेमापोटी तो किती एकटा होता याची जाणीव झाली आणि त्याच्यासाठी डोळ्यात अश्रू दाटले.


“मनस्वी.. प्रकाशने कधी लग्न नाही का गं केलं?”


डोळ्यात दाटलेल्या अश्रूत तिला काल भेटलेल्या चंपाची आकृती दिसू लागली आणि त्याबरोबर तिने विचारलेला प्रश्न देखील.

प्रश्न साधाच होता, प्रकाशने लग्न केलं की नाही हे जाणून घेणारा. मात्र त्या स्वरातील आर्तता आणि हृदयातील खळबळ याक्षणी तिला अधिक जाणवत होती. प्रेम तर होतंच, पण ते दिसू न देण्याचा तिच्या डोळ्यांनी चालवलेला आटापिटा मनस्वीच्या नजरेने अचूक टिपला होता.


एवढं प्रेम होतं तरीही सारं सोडून त्याच्यापाशी यायला एकरूप होण्यास इजाजत न देणाऱ्या चंपाच्या मनाच्या मोठेपणाचे पारडे आता प्रकाशपेक्षा जड वाटू लागले.

‘कोणाचं प्रेम अधिक श्रेष्ठ? प्रकाश की रत्नाचे?’ तिच्या मनात नुसता गोंधळ माजला. दोघेही तिला एकापेक्षा वरचढ वाटत होते.


‘प्रेम प्रेम असतं. त्याला असं कुठं मोजता येतं? जितकं तीव्र बाबाचं प्रेम तितकीच खोली रत्नाच्याही प्रेमाची होती. म्हणून तर आजही दोघे एकमेकांसाठी तितक्याच उत्कटतेने झुरत आहेत.’ तिच्या दुसऱ्या मनाने लगेचे तिचा गोंधळ दूर केला.


“मनू, आज तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. जा आता. शांतपणे झोपायला जा.” तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत प्रकाश तिला म्हणाला.


“आणि तुम्ही? तुम्हाला झोप लागेल?”


“मीही प्रयत्न करतो की.” त्याने चेहऱ्यावर उगाचच हसण्याचे भाव आणले.


“ते काही नाही. तुम्ही झोपेपर्यंत मी इथेच थांबते. माझ्या हातची केसांना छानपैकी चंपी आणि एक अंगाई गीत. तुम्हाला गाढ झोप कशी येत नाही ती बघाच.”


त्याच्याजवळून उठून तिने तेलाची बाटली हाती घेतली आणि तो नको म्हणतानाही त्याच्या केसात बोटे घालून हलके हलके मसाज करू लागली.


“बरं वाटतंय ना?”


“हम्म. लहान असताना मी तुला तेल लावून दिले की तूही माझ्या केसांना तेल लावायचा हट्ट करायचीस ते आठवलं.” तो हसून म्हणाला.


“गुड! अशाच सुंदर सुंदर आठवणी जाग्या करा. खूप मस्त झोप येईल.” त्याला थोपटत ती म्हणाली.


“तू अंगाई गाणार होतीस ना?” डोळे मिटून त्याचा प्रश्न. तिच्या स्पर्शात त्याला आज आई आठवत होती.


“हो. गातेय की. मलाही येतं हं अंगाई गायला. तुम्ही गायचे ना? तशीच.” ती गाणे आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली आणि पुढच्याच क्षणी तिला गाणे आठवले.


लहान असताना बाबाच्या तोंडून कित्येकदा ऐकलेले आणि मोठी झाल्यावर स्वतः गुणगुणायला शिकलेले आणि.. आता कालच चंपाच्या खोलीतील ध्वनीफितीवर सुरु असेलेले.. एक इजाजत!


“आ आऽऽ आऽऽ
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं
होऽऽ सावन के कुछ भिगे भिगे दिन रखें हैं
और मेरे खत मे लिपटी रात पडी है,
वो रात बुझा दो मेरा वो सामान लौटा दो..!”


तिचा स्वर आर्त झाला होता. डोळ्यातून थेंब गालावर आले होते. लहानपणी बाबा तिला झोपवताना हे गाणं गायचा तेव्हा त्यातील ओढ तिला कळायची नाही; पण गाणं मात्र खूप आवडायचं आणि आता तिला कळू लागले होते हे गाणे तर खास त्याच्यासाठीच रचलेले आहे. प्रेमाच्या हळव्या भावना पुरुषांनाही असतात की. ते दाखवून देत नाही एवढंच.


त्याचं आणि त्याच्या तिचं.. रत्नाचं, दोघांचही प्रेम सारखंच! त्या दोघांना एक व्हायला आता खरच कोणाच्या इजाजतीची आवश्यकता नको. त्यांना आता एक व्हायलाच हवे. प्रकाशच्या केसातून हात फिरवत ती विचार करत होती.


‘कसे ते ठाऊक नाही, पण मी तुम्हा दोघांनाही एकत्र आणेन. बाबा आय प्रॉमिस यू.’ गाढ झोपी गेलेल्या प्रकाशकडे एकटक पाहत तिने डोळे पुसले आणि दिवा मालवून ती हळूच त्याच्या खोलीबाहेर गेली.


सायंकाळी येऊन गेललेल्या पावसानंतर आता रात्रीचा वातावरणात गारवा पसरला होता. गॅलरीत उभे राहून ती बाहेरचा परिसर न्याहळत होती. मोठं हॉस्पिटल, सगळया सुखसोई.. हे सारे वैभव प्रकाशने तिला बहाल केले असले तरी त्यासाठी अप्रत्यक्षपणे चंपा जबाबदार आहे याची जाणीव तिला झाली होती.


तिचे मन नकळत चंपाकडे ओढल्या जात होते.


‘चंपाजी.. तुम्ही नेमक्या कश्या आहात ते अजूनही मला पूर्णपणे उमगले नाहीये. पण कश्याही का असेनात, आम्हाला तुम्ही हव्या आहात. बाबांची पूर्वीची प्रेयसी म्हणून आणि मला माझ्या उर्वरित आयुष्यातील आई म्हणून.’ एक दीर्घ श्वास घेऊन ती बेडवर निजली.


‘देवा काहीतरी चमत्कार कर आणि या दोन प्रेमवेडयांना एकत्र आणायला मला मदत कर.’ झोपण्यापूर्वी तिने देवाला प्रार्थना केली आणि डोळे मिटून घेतले.

_______

“मनू, उगाच हट्ट करू नकोस. तुला वाटतं का की ती येईल?”


हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आजपासून सुरुवात होणार होती आणि त्याची पहिली विट तिला चंपाच्या हाताने रचायची होती. कालच प्रकाश आणि ती दोघे नाशिकला पोहचले होते. तसे गेल्या आठ दिवसापासून तिची पार तारेवरची कसरत सुरु होती आणि आज फायनली बांधकाम सुरु होणार होते. त्याचीच तयारी म्हणून ती चंपाला घ्यायला जाणार होती तर प्रकाशने तिला प्रश्न केला.

“हो मी त्यांना प्रॉपर निमंत्रण देवून आले होते तेव्हा येतीलच की.”


“पण मी असताना ती खरंच येईल? त्यापेक्षा तू तिला घेऊन जा. मी दुरूनच तिला बघेन.” तो हळवेपणे म्हणाला.


“नो वे, तुम्ही माझे बाबा आहात आणि तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होवूच शकणार नाही.”


“मनू अगं..”


“ते मला काहीच माहिती नाही. तुम्ही पुढे निघत आहात आणि मी त्यांना घेऊन थोड्याच वेळात पोहचतेय. हवं तर हा माझा हट्ट समजा किंवा माझा आदेश! कळलं ना?” त्याला दम देत ती हॉटेलच्या खोलीबाहेर आली तो मात्र तसाच विचार करत उभा होता.


“बाबा, जस्ट चिल. काही होणार नाही. मी आहे ना? मी सांभाळून घेईल. तुमचा तुमच्या लेकीवर विश्वास आहे ना?” बाहेर जायला निघालेली ती परत त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली.

“मनू?”

“तुमची अवस्था मला कळतेय. बट डोन्ट वरी. माझ्यावर एकदा विश्वास तर ठेवून बघा.” त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्त करत ती म्हणाली.


तिच्या प्रेमळ स्पर्शाने त्याच्या ओठावर स्मित पसरले. मान हलवून त्याने तिला दुजोरा दिला. तो निवळलाय हे बघून ती निश्चिन्तपणे बाहेर पडली.

________


“चंपाजींना भेटायचंय. त्यांना काही तासासाठी बाहेर घेऊन जायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला हवे तेवढे पैसेही घेऊन आलेय. मी वर जाऊ ना?” हातातील बॅग उघडी करून त्यातील पैसे शीलाआंटीला दाखवत मनस्वी चंपाच्या खोलीत जायला परवानगी मागत होती.


ती बोलत होती आणि शीलाआँटी..? ती फक्त तिच्या ओठांची हालचाल टिपत होती. तिच्या तजेलदार चेहऱ्याचे, टपोऱ्या डोळ्यांचे निरीक्षण करत होती. ते बघत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि डोळ्यात आसवांची गर्दी साठत होती.

“आंटीजी.. पैसा!”

मनस्वी पुन्हा म्हणाली तसे शीलाआँटीने पापण्यांची उघडझाप करत बाहेर येणाऱ्या अश्रुंना रोखले.


“ना रे, मैं तुझसे पैसा कैसे ले सकती हूं?” हळवे होत शीला आँटी तिच्याकडे एकटक पाहत म्हणाली.


“पण तुमच्या कोठीचा हा नियम आहे ना? आणि चंपाजी तर पैश्यांशिवाय कोणाला भेटत नाही हे तुम्हीच तर मला सांगितलं होतं.” तिच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला.


“पैंसों की बात गैरों के लिए, तू तो हमारी अपनी हैं।” तिच्या गालाला स्पर्श करत शिलाआँटी उत्तरली. ती मात्र तिच्याकडे काही न उमजल्यागत पाहत होती.


“तू हमारी मनू हैं ना? चंपाने बताया था मुझे। बडी डॉक्टर बन गयी हो तुम। यह सुनकर हम कितना खुश हुए क्या बताऊं?” शेवटी अश्रू गालावर ओघळलेच.


“तुमची मनू? म्हणजे तुम्ही मला ओळखता?”


“हो, म्हणजे तशी ओळख पटली; पण ती ओळख नको आता. तू मोठी मॅडम आहेस, तुझ्या घरी खुश आहेस हे खूप चांगले आहे. तुला चंपाला भेटायचे आहे ना? जा भेटून घे आणि जिथे न्यायचे तिथे घेऊन जा.”


“आणि परत घेऊन नाही आले तर?”

काय असेल यावर शीलाआँटीचे उत्तर? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे *

🎭 Series Post

View all