एक इजाजत.भाग -६८

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६८


आणि रत्ना? रत्ना नसून ती केवळ चंपा असल्याचे हरघडीला तिचे सिद्ध करणे चालू होते.

“निघू मी? आज एक मोठे कस्टमर येणार आहेत.”


“हो, मला माहिती आहे की. मी तुम्हाला सोडून देते.”


“हो चालेल की. अहो, डॉक्टर साहेब! तुम्हाला भेटून आनंद झाला. आता निघते मी.” ब्लाउजच्या मधोमध अडकवलेला गॉगल डोळ्यावर घालत प्रकाशकडे बघून तिने हात जोडले आणि कारच्या आत जाऊन बसली.


“आज तुम्ही मुद्दाम असं वागलात ना?” कार सुरु करताना मनस्वी जरा घुश्शात दिसत होती.


“असं म्हणजे कसं?”


“हेच, बाबांच्या पुढयात तुमची चंपागिरी दाखवण्याचा सारखा प्रयत्न का सुरु होता?”


“चंपागिरी? मला काही कळले नाही बुवा.” सीटला मागे रेलून बसत ती म्हणाली.


“उगाच वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्यासमोर ‘मी वेश्या आहे, वेश्या आहे’ हे दहादा सांगायची काय गरज होती?”


“अगं पण आहेच की मी वेश्या. त्यात काय खोटं बोलले?” तिच्या ओठांवर मिश्किली.


“बाबांना हर्ट व्हावे म्हणून बोलत होतात ना? चंपाजी तुम्ही कोणी का असेनात;पण त्यांच्यासाठी केवळ त्यांची रत्ना आहात. तुम्हाला अजूनही हे कळले नाहीये का?


जो माणूस तुमच्या एका शब्दासाठी स्वतःचे आयुष्य विसरून एका वेश्येच्या मुलीला एवढं शिकवतो, तिला डॉक्टर व्हायच्या लायकीचा बनवतो. केवळ एक उपकार म्हणून नव्हे तर खरोखर तिच्यावर माया करतो. लेकीसारखा जीव लावतो आणि तुम्ही त्यांनाच दुखावलात? तुमच्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं.”


“मग तुला काय अपेक्षित होतं? तुझ्या बाबाला बघताक्षणी मी त्यांना मिठी मारायला हवी होती? मनू, तुझ्यापेक्षा वीस पावसाळे अधिक पाहिलेत गं मी. तुझ्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज मला आला नसेल असं वाटतं का?”


“माझ्या डोक्यात काय चाललंय?”


“तू का प्रकाशला नि मला एकत्र आणायला निघालीस? आमचे मार्ग वेगळे आहेत गं. दोन विरुद्ध ध्रुवावर आम्ही आहोत. आम्ही एकत्र येणं कधीच शक्य नाही. आमचं आयुष्य बंद पडलेल्या घड्याळासारखं झालंय. ती वेळ केव्हाची तिथेच थांबलीय.”


“चुकताय तुम्ही. बंद घड्याळ देखील दिवसातून दोनदा योग्य वेळ दाखवत असतो. तुम्ही मात्र तुमच्या आयुष्याच्या घड्याळाकडे निट डोळे उघडून कधी पाहिलंच नाही किंवा मुद्दाम कानाडोळा केला त्यामुळे तुम्हाला ती वेळ दिसलीच नाही.” ती कातर स्वरात म्हणाली.


“तुझ्या बाबावर तुझं खूप प्रेम दिसतंय.”


“हो आहेच. कारण प्रेमाच्या बदल्यात केवळ प्रेमच करायचं हे त्यांनी मला शिकवलंय. त्यांना भेटल्यावर त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलला असतात तर काय बिघडलं असतं?”


“बरंच काही बिघडलं असतं. तुझा बाबा माझ्या प्रेमात पडला असता कारण त्याला केवळ प्रेमाच्या बदल्यात प्रेमच देता येतं. त्याचं प्रेम रत्नावर होतं, त्याने चंपावर प्रेम करू नये एवढीच माझी इच्छा होती.” चंपा एक उसासा टाकत उत्तरली.


“म्हणून तुमची ही चंपागिरी सूरू होती? हा भडक मेकअप, ही लाल लाल लिपस्टिक, खोल गळ्याचा ब्लाऊज आणि त्याला मध्ये खोचलेले गॉगल? तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुमच्या सात्विक रूपाच्या प्रेमात पडले होते मी. आज मात्र तुम्ही माझी पार निराशा केलीत हो.”


“माझ्या रूपाच्या प्रेमात पडली होतीस? अगं अजून बच्ची आहेस तू. प्रेम काय असतं हे तुला इतक्यात नाही कळणार.” ती खिन्न हसत म्हणाली.


“नसेल कळत; पण एवढं मात्र नक्कीच कळतंय की जी उत्कटता तुमच्या प्रेमात आहे तेवढीच उत्कटता बाबांच्या प्रेमात सुद्धा आहे. न केलेल्या गुन्ह्याची सजा त्यांना देऊ नका, प्लीज.” ती विनवणीच्या सुरात म्हणाली.


“मनू, तुझं खूप कौतुक वाटतंय गं. म्हणजे अशा वस्तीत हॉस्पिटल सुरु करण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते.” चंपा विषय बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


“माझे बाबा माझी खूप मोठी स्ट्रेन्थ आहेत. ते सोबत असल्यावर मला कसलीच काळजी नाहीये.” मनूची गाडी परत बाबावर आली.


“हे हॉस्पिटल सुरु व्हायला आणखी किती वेळ लागेल?”


“किमान दोन वर्ष तरी. कारण माझा प्लॅन मोठा आहे आणि जवळ तेवढा पैसा नाहीये. मात्र दोन वर्षात सेवा द्यायला हॉस्पिटल आणि स्टॉफ दोन्ही सज्ज असतील. बाबांची मदत होते आहे म्हणून दोन वर्षात सगळं रेडी होईल. नाहीतर आणखी वेळ लागला असता.” तिचे परत बाबापुराण.


“बाबाशिवाय तुझं कुठलंच वाक्य पूर्ण होतं नाही का गं?”


“अहं, ते शक्यच नाही. मी तर त्यांना नेहमी म्हणते की पुढल्या जन्मात ते माझे खरेखूरे, रक्ताचे नाते असलेले बाबा व्हावेत.”


“मग? त्याचं उत्तर होच असेल ना?”


“हम्म. ते म्हणतात की त्यांची रत्ना त्यांची बायको म्हणून लाभली तर नक्कीच मी त्यांची स्वतःची लेक असेल, त्यांची मनू.” तिच्या डोळ्यांचा वेध घेत ती म्हणाली.

चंपाने मात्र हळूच नजर खिडकीबाहेर फिरवत तिच्याकडे पहायचे टाळले. काही क्षण कारमध्ये निरव शांतता पसरली होती. दोघीही एकमेकांशी काहीच बोलल्या नाहीत.


“हॉस्पिटलच्या बांधकामाला अंदाजे किती खर्च येईल?” मनस्वीने कोठीसमोर कार थांबवताच चंपाने प्रश्न केला.


“भरपूर.” मनूचे उत्तर.


“हे तुला द्यायचे म्हणून कधीपासून मनात होते; पण हिंमत झाली नाही. मात्र आता वाटतंय की हॉस्पिटल दोन वर्षांऐवजी वर्षभरात सुरु होत असेल तर हे द्यायला काय हरकत आहे?” बॅगेतून आदीने दिलेला चेक काढून तिच्या हाती ठेवत ती म्हणाली.


“ओह, प्लीज नको. मी हे नाही घेऊ शकत.”


“का एक वेश्या देतेय म्हणून?”


“ओह! स्टॉप इट चंपाजी. माझ्या बोलण्याचा तो हेतू नव्हता. हे तुमचे पैसे आहेत. मुख्य म्हणजे कोणीतरी तुम्हाला इथून घेऊन जाण्याच्या बदल्यात देऊ केले आहेत. मग मी कसे घेऊ?”


“ही चंपा तुला अशी पैश्यांनी विकली जाणाऱ्यातील वाटली होय?”


“नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं.”


“मनू, ऐक माझं. हे पैसे कुठल्याही वाईट कामातून मिळालेले नाहीयेत गं. त्यामुळे तू ते निसंकोचपणे घेऊ शकतेस.”


“असं कसं कुणीही दिलेली रक्कम मी घेऊ? आणि तिही एवढी मोठी?”


“कुणीही दिलेली नाहीये. मुंबईचा मोठा बिझनेसमन आहे. आदित्य धनराज. त्याने देऊ केलेत. मी हे काम सोडावे म्हणून.” ती खोल श्वास घेत म्हणाली.


“आदित्य धनराज?”


“हम्म. तुला खोटं वाटत असेल तर तुमचं ते गुगल की काय म्हणतात त्यावरून त्याची माहिती काढू शकतेस. समाजात काही चांगली माणसं असतात असं तुला वाटतं ना? तशा माणसांपैकी तो एक आहे. तुझ्या बाबासारखा. निर्मळ मन असलेला.” हे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कडा का पाणवल्या तिलाही कळलं नाही.


मनस्वीच्या मनात तो चेक घ्यावा असे अजिबात नव्हते; पण चंपाने आदित्यची तुलना प्रकाशशी केली आणि नकळत तिने तो चेक आपल्या पर्समध्ये ठेवला.


“चंपाजी, ह्या करिता थँक्स.” आभार मानत ती म्हणाली.


“खरं तर या आभाराची मी हकदार आहे की नाही मला ठाऊक नाही; पण ही रक्कम या वस्तीतील महिलांच्या आरोग्याच्या कामी आली तर मला नक्कीच आनंद होईल.” चंपा स्मित करत म्हणाली.

“बरं निघते मी.”


“हो, तुमचा तो श्रीमंत कस्टमर वाट बघत असेल हो ना?” कारमधून बाहेर पाय ठेवणाऱ्या चंपाकडे बघून मनस्वी मुद्दाम म्हणाली.

उत्तरादाखल चंपा केवळ मंद हसली.

“चंपाजी, तुमची वाट पाहणारं असं कुणीच नाहीये ना? बाबापासून दूर पळायला म्हणून तुम्ही मघाशी हे बोललात ना?”

मनुच्या अशा विचारण्याने चंपाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

“मनू, मनकवडी आहेस गं तू. तुला दुसऱ्यांच्या मनातील अचूक कळतं. मात्र एक सांगू? प्रकाश आणि रत्नाचं एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी त्यांना एक करण्याचे स्वप्न बघू नकोस. हे स्वप्न मृगजळा समान आहे गं. फसवं!

जेवढं सत्यात उतरवायचा प्रयत्न करशील तेवढी त्यात फसत जाशील. या मृगजळामागे लागून स्वतःचे आयुष्य वाया घालवू नकोस. निघते मी.” मागे वळून न पाहता चंपा झपझप पावलं टाकत ती निघून गेली.

ती गेली मात्र मनस्वी तशीच स्तब्ध बसून होती.


‘नेमकं यांच्या मनात काय आहे? कसलं मृगजळ आणि कसली फसवणूक? साधं सरळ, शुद्ध प्रेम आहे यांचं. मग बाबा एक्सेप्ट करायला तयार असताना यांचं मन का परवानगी नाकारतेय? कसलं सत्य अजून समोर यायचं बाकी आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचं प्रेम नकोय. कोण सांगेल? कुठून कळेल? बाबांना असं रोज रोज त्यांच्या रत्नाच्या आठवणीत झुरताना मी नाही बघू शकत.

चंपाजी, तुम्ही कितीही नाही म्हटलंत तरी ही मनू तुम्हा दोघांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुमचं तुमच्या प्रकाशवर प्रेम असेल तर माझंही माझ्या बाबांवर प्रेम आहे. कुठले प्रेम वरचढ आहे हे येणारा काळच ठरवेल. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, मी माझे प्रयत्न करेन.

बघूया कोण जिंकतंय ते? ही कोठ्यावरची राणी चंपा की बाबांची लाडकी मनू?’

एका निर्धारासह ओठावर विजयी हास्य घेऊन मनुने कार हॉटेलकडे वळवली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all