एक इजाजत.भाग -६९

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६९


चंपाजी, तुम्ही कितीही नाही म्हटलंत तरी ही मनू तुम्हा दोघांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुमचं तुमच्या प्रकाशवर प्रेम असेल तर माझंही माझ्या बाबांवर प्रेम आहे. कुठले प्रेम वरचढ आहे हे येणारा काळच ठरवेल. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, मी माझे प्रयत्न करेन.

बघूया कोण जिंकतंय ते? ही कोठ्यावरची राणी चंपा की बाबांची लाडकी मनू?’

एका निर्धारासह ओठावर विजयी हास्य घेऊन मनुने कार हॉटेलकडे वळवली.

________

‘आदित्य धनराज!’

या तीन-चार दिवसात मनस्वी या नावाला काहीशी विसरली होती. हॉस्पिटलचे सुरु झालेले बांधकाम, कधी पुणे तर कधी जळगावच्या चकरा आणि त्यातच पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमधून तिला जॉबसाठी आलेली ऑफर! तिथे तिला लाखात पगार मिळणार होता आणि तशीही तिला पैश्यांची गरज होतीच. तेवढेच आपल्या हॉस्पिटलला मदत होईल म्हणून तिने पुण्यातील या प्रपोजलला होकार दिला होता.


“मनू, अगं काही दिवसांनी तू नाशिकला जाणार आहेसच. मग रहा की गं इथेच. आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा मग इथल्या गायनॅककडे प्रॅक्टिस कर.” बापाचे मन लेकीसाठी झुरत होते.


“बाबा, अहो तिथे मला महिन्याकाठी लाख रुपये मिळणार आहेत. वर्षाचा विचार केला तरी दहा बारा लाख सहज जमा होतील आणि ही रक्कम छोटी नाहीये ना? तेवढाच आपल्या नव्या हॉस्पिटलसाठी उपयोगी पडेल.”


तिच्या प्रॅक्टिकली विचारापुढे तो काहीच बोलू शकला नाही. कारण त्याची सेविंग अशी फारशी नव्हतीच. जी होती ती जागा घेण्यात आणि अर्ध्या बांधकामात खर्ची होणार होती. बँकेतून लोन घ्यायला तिचा नकार होता त्यामुळे सध्यातरी तिचा निर्णय तसा योग्य होता.


मात्र मन म्हणत होतं की, मनुड्या थांब की गं इथेच. तुझ्या बाबाजवळ. वयाच्या पन्नाशीत पोहचत आलोय आणि आता एकटेपणा जास्तच जाणवतोय गं.

पण असं म्हणून तिला थांबवणे केवळ अशक्य होते. तिच्या पंखात उंच उडण्याचे सामर्थ्य त्याने स्वतःच तर निर्माण केले होते आणि आता उड्डाण घ्यायला ती सज्ज झाली होती तेव्हा त्यात त्याला मोडता घालायचा नव्हता.


दोन दिवसांनी पुण्याला निघायचं म्हणून बॅग आवरायला घेतलेल्या मनूला तिची ती छोटी पर्स दिसली आणि त्यातील काही वस्तू बाहेर काढत असताना ओघाने तिच्या हाती चंपाने दिलेला चेक लागला.


त्यावर लिहिलेली दोन करोडची रक्कम आणि चंपाने सांगितलेले नाव.. आदित्य धनराज!


‘आदित्य धनराज. असे कसे मी याला विसरले? मुंबई बिझनेस जगतातील खूप मोठा असामी आहे म्हणे, काय तर म्हणे बाबासारखा तिला तो वाटला. माझ्या बाबासारखा दुसरा कोणी कसा असू शकतो? एवढी रक्कम सहजासहजी ट्रान्सफर होत नाही म्हणून त्याने हा आकडा लिहिला असावा हे न समजण्याइतकी मी बुद्धू नाहीये.

काय म्हणत होत्या त्या? मनू, मी तुझ्यापेक्षा वीस पावसाळे अधिक पाहिलेत. असे लाख पावसाळे जास्तीचे पाहिले असतील; पण व्यवहारज्ञान नाहीये म्हणून हा असा चेक त्यांनी त्या आदित्यकडून स्वीकारला.’


एकटीने बडबड करत ती तिचे काम करत होती. मनात मात्र चंपा आणि प्रकाशचे विचार घोंगावत होते. त्या दोघांसाठी काय करता येईल या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हते आणि त्यात दोघात तिसरा सारख्याप्रमाणे आदित्य धनराजची एन्ट्री झाली होती.


‘कोण आहे हा आदित्य? की त्या चंपाजींनी त्याचे इतके गुणगान गावे? माझ्या बाबासारखा कसा असेल बरं तो? बाबा ‘बाबा’ आहेत. डॉक्टर प्रकाश हिवरे पाटील. केसात एकदोन रुपेरी बटा दिसायला लागल्या असल्या तरी आजही तितकेच हॅन्डसम आहेत. त्यांची बरोबरी कुणीच करू शकणार नाही.


तो आदित्य बिझनेसमन आहे म्हणे, म्हणजे नक्कीच कुणीतरी थेरडा असेल. थेरडा? आणि तरीही तो चंपाजींना आवडला?

छ्याँ! अशा म्हाताऱ्यांना तर मी भीक घालायची नाही.’


‘छ्याँ!’ शब्द तिने इतक्या जोरात उच्चारला की सायंकाळच्या कामाला आलेल्या काकू तिच्या खोलीसमोर थबकल्या.


“मनुताई? काय झालं?”


“कुठे काय? काही नाही? छ्याँ.” तिचा पुन्हा तोच शब्द.


“सर्दी वगैरे झाली काय? कॉफी-चहा काही आणू काय?”


“काही नको. अजिबात काही नको. माझ्या बाबांसारखं कुणी नाही कळलं ना तुम्हाला? जा निघा आता आणि इकडे फिरकूही नका.”

दार ओढून घेत ती फसकन म्हणाली तसे बंद दाराकडे अजबपणे बघत काकू किचनकडे निघून गेल्या. मात्र त्यांना मनूचे वागणे जरा विचित्र वाटत होते.


“..तुझा विश्वास बसत नसेल तर तुमचा गुगल का काय तिथे सर्च करून बघ. तिथे तुला त्याच्याबददल सारंच कळून जाईल.”

चंपाचे त्या दिवशीचे शब्द तिला आठवले आणि तिने मोबाईल घेऊन तिथेच बेडवरच्या बॅगेवर फतकल मांडली.


‘आदित्य धनराज..’

तिची बोटे मोबाईलच्या की पॅड वरून भरभर फिरत होती. दुसऱ्याच सेकंदात त्या नावाच्या काही व्यक्तींची माहिती गुगल वर दिसू लागली.

‘आदित्य धनराज द ग्रेट बीझनेसमन मुंबई..’

त्या लिंकवर क्लिक करून तिथली माहिती आणि त्याचे फोटो ती पाहू लागली. तिला वाटणारा एखादा थेरडा किंवा मध्यमवयीन पुरुषाचा एकही फोटो तिथे नव्हता.


जवळपास सहा फूट उंचीचा निमगोरा, डोळ्यात भरेल असे व्यक्तीमत्व असलेल्या तरुणाचे फोटो बघून आश्चर्यचकित होण्याची पाळी तिच्यावर आली.

‘वडिलांनी अचानक बिझनेसमधून पाय काढून घेतला
म्हणून त्याजागी हा आदित्य उभा राहिला आणि अवघ्या दोन वर्षाच्या काळात त्याने त्याचे स्वतःचे नाव सिद्ध केले.’

‘मुंबई उद्योग जगतातील चमकता सितारा.. आदित्य धनराज!’

‘अल्पवधित नावारूपास येणारा तरुण उद्योजक.. आदित्य धनराज!’

.. एक ना दोन, त्याच्या नावापुढे अनेक स्टोरीज होत्या. त्या साऱ्यावरून हा व्यक्ती एक यशस्वी उद्योजक आहे हे सिद्ध करायला पुरेश्या होत्या.


अर्ध्या एक तासापासून गुगल फिरून झाल्यावर तिनेही हे मान्य केले होते, मात्र तरीही हा तरुण उद्योजक चंपाला दोन करोड का ऑफर करत होता?हे तिला कळत नव्हते.


‘चंपाजींनी सांगितलेला आदित्य हा आहे? इतका तरुण? फार फार तर माझ्यापेक्षा चारपाच वर्षांनी मोठा असलेला आणि हा एवढा श्रीमंत आणि यशस्वी पुरुष चंपाजीकडे गेला होता? कशाला? पण त्या तर म्हणाल्या होत्या की हे वाईट कामाचे पैसे नाहीयेत. सर्व पुरष एकसारखे नसतात. मग कसा आहे हा?’


“..तुझ्या बाबासारखा. निर्मळ मन असलेला!” चंपाच्या शब्दात तला तिचे उत्तर आठवले.


“बाबासारखा निर्मळ? म्हणजे नेमके कसा?”

आदीचे एकेक फोटो झूम करुन करून ती पाहत होती. त्याच्या डोळ्यातील भाव, चेहऱ्यावरचे हसू.. तिलाही तो आता काहीसा प्रकाशसारखा भासू लागला होता.


‘सारखे तेच तेच विचार करून मला असे वाटू लागले असावे. हा कोण कुठला आदित्य, हा का बाबासारखा असेल?’ मोबाईल बाजूला ठेवून ती डोके गच्च पकडून बसली.


“मनुताईऽऽ तुम्ही ठीक आहात ना?” दारावरच्या थापेने आणि काकूंच्या दबक्या आवाजाने जागेवरून उठत तिने दार उघडले.


“मनुताई..”


“काकू, मला कॉफीची नितांत आवश्यकता आहे हो. प्लीज एक कप कॉफी मिळेल?”


“हो. लगेच आणते की. पण तुम्ही ठीक आहात ना?” तिला न्याहाळत तिने विचारले.


“मला काय झालंय? मी ठीकच आहे. जा तुम्ही कॉफी घेऊन या. ती पण अगदी कडक. नाहीतर माझं डोकं फुटेल.” तिचे ते उत्तर ऐकून कामवाल्या काकू धावतच पळाल्या आणि दोनच मिनिटात तिच्यासाठी कॉफी घेऊन आल्या.


“काकू, सॉरी हो. मी तुमच्यावर उगाच ओरडले.” कॉफीचा एक घोट घेताच तिचे फुटणारे डोके जागेवर आले.


“उगाच काय? काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही अशा वागायच्या नाहीत.” ती शांत झाल्याचे बघून त्या म्हणाल्या.

“मनुताई..”


“हं?”


“डोकं चेपून देऊ काय?”


“हो चालेल. फुटता फुटता वाचले बघा.” कॉफीचा आस्वाद घेत तिने डोळे मिटून घेतले. काकूंची बोटे केसातून फिरताच तिला आणखी रिलॅक्स वाटू लागले होते.


“मनुताई..”


“हम्म.”

“रागावणार नसाल तर एक विचारू?”


“मी का रागावू? विचारा की बिनधास्त.”


“काही पोराबिराची भानगड आहे का?”

“हो.” तिचे डोळे मिटून उत्तर.

“हो? कोण आहे तो?”

“आदित्य धनराज.”

“आदित्य धनराज?”

“हम्म. तुम्ही ओळखता त्याला?”

“नाय बा!”

“मी ही ओळखत नाही. मुंबईचा खूप मोठा उद्योजक आहे म्हणे.”

“कोण म्हणे?”

“गुगलबाबा.”

“हे कोणते बाबा?”

“आहेत. एक खूप मोठे ज्ञानी बाबा आहेत. सगळ्या जगाची कुंडली त्यांच्याजवळ असते.” तिचे उत्तर ऐकून काकू चाट पडल्या आणि उभ्या उभ्याच त्यांनी गुगलबाबांना हात जोडले.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all