व्यथा लावणी कलाकारांची

व्यथा
कुणी ठेवली गावामध्ये लावण्याची बारी
चाळ बांधुनी मदन मंजिरी उभी राहिली दारी
वखवखलेल्या नजरा बघता मान घालुनी खाली
व्यथित मनाने अंगणातुनी फिरली ती माघारी

जाता येता भलते सलते किती बोलती डोळे
उनाड गप्पा उगाच गहजब हेच फुकटचे चाळे
ऐकून गरळ अती विषारी बिथरेल जरी स्वारी
माझ्यावरती उगा रुसतील सांब सदाशिव भोळे

नको वाटते जरी बांधणे आता पायी चाळ
परी रडवतो घाव घालतो पुढे ठेपला काळ
पोटी भाकर चार जणांच्या कशीबशी मग पडते
चाळ बांधुनी पाय थिरकती तेव्हा भागते वेळ

कशी कहाणी असे लिहीली लोककलेच्या माथी
गावोगावी फरपट होते दमडी येते हाती
उघड्यावरती संसार तरी झोप सुखाची असते
लोककलेची आस मनाला परी न मिळते ख्याती

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज