इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ६

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
समीर थोडासा गोंधळला. प्रिशाशी कसे बोलावे या विचारात असताना त्याची पाऊले नकळत तिच्या टेबलपाशी जाऊन पोहोचली.

स्टाफ रुममध्ये प्रत्येक दोन प्रोफेसर्सच्या टेबलमध्ये पडदा लावलेला होता.त्याने पडदा ओढून घेतला आणि प्रिशासमोर जाऊन उभा राहिला.

प्रिशाच्या टेबलला नक्षीदार ,सुबक अशी झालर लावलेली होती.टेबलवर सुंदर असे रेशमी कापड टाकलेले होते.बाजूलाच कपाटात बरीच पुस्तके एकदम छान रचलेली होती.कुठेही गबाळ,पसारा नव्हता.पेन,पुस्तके,फाईल्स सर्व काही नीट रचून, सॉर्टिंग करून ठेवलेलं होतं, प्रत्येकावर नावं टाकून ठेवलेली होती.कोणीही यावं अन् तिच्याकडे येऊन ताजतवानं होऊन जावं असा तिचा बैठकीचा टेबल होता.

" राणा सरांचं चुकलंच!" समीर

इतका वेळ खाली मान घालून बसलेली प्रिशा, डोळे पुसत ,भावनाविवश होऊन म्हणाली,

" नाही.त्यांची काहीच चूक नाही.मी परफेक्ट टीचर असूनही माझ्याकडून दिरंगाई होतेय, चुका होतायेत." प्रिशा

" अहो,तुम्ही तुमच्या जागी एकदम परफेक्ट आहात.फक्त एका घटनेने तुमचे व्यक्तिमत्व हादरले,तुमचा आत्मविश्वास डळमळला म्हणून तुमच्याकडून चुका घडत आहेत अन् तुम्हाला त्रास होतोय." समीर

मनातले डायरेक्ट समीरशी बोललेली प्रिशा डोळे पुसत म्हणाली,
"खरंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे?"

" हो.तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊन नका."समीर

" मग काय करू?" प्रिशा

" मला टर्मवर्क तयार करण्यासाठीचे सॉफ्टवेअर शिकवा.ही सगळी चिंता सोडा,झाली गोष्ट विसरून जा. क्योंकी बडे बडे शहरो में, कॉलेजो में,ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं सँनुरीटा!"समीर

" हा,हा,हा..." प्रिशा खळखळून हसू लागली.

समीर देखील हसू लागला.इतका वेळ स्ट्रेसमध्ये असलेली प्रिशा समीरच्या एका जोकने हसली म्हणून समीरला जरा हायसे वाटले.दोघेही पुन्हा एकदा हसू लागले.

वैभवी मॅडम अचंबित झाल्या. समीर आणि प्रिशाचे बोलणे त्या चोरून ऐकत होत्या.दोघांचे खळखळून हसणे ऐकून त्यांच्या पोटात दुखत होते.
' हा कोण हिचा सेवियर?हा का हिला मदत करतोय? गुपचुप आपले आपले काम करून जायचे सोडून उगाचच नसत्या उचापत्या का करतोय हा ? शिट! माझ्या मनाला हिला असे पाहून किती समाधान मिळत होते पण हा आला अन् माझ्या आनंदावर विरजण पडले.',असे विचार वैभवी मॅडमच्या मनात सैरभैर धावत होते.

" बापरे! हुश्श..किती हसले मी! विशेष म्हणजे इतक्या स्ट्रेसमध्ये असताना मला हसवणारे तुम्ही कोण आहात? एरवी मला असे कधीही कोणीही हसवलेले नाही किंवा मला हसू देखील आलेले नाही.तुम्ही कोण?"प्रिशा

" मी प्रोफेसर समीर.केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट.मलाही माफ करा तुम्ही. तुमची परवानगी न घेता मी इथे आलो अन् हे सारे बोललो." समीर

" तसे काही नाही. इट्स ओके." प्रिशा

" आता तुम्ही ठीक आहात?"समीर

" हो." आपले डोळे हलकेसे पुसत प्रिशा म्हणाली.

" तुम्ही केव्हापासून उभेच आहात.बसा ना!"प्रिशा

समीर तिच्यासमोर खुर्चीत बसला.

नाजूक तरीही बोलके डोळे,चेहऱ्यावरील अवयवांची सुबक ठेवण, गव्हाळ रंग,काळेभोर मुलायम केस,चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या केसांच्या दोन लटा,दोन भुवयांच्या मधोमध असणारी सुबक टिकली,गळ्यात एक नाजूक गोल्डन चेन,अंगावर सुंदर असा मखमली पंजाबी ड्रेस ,हातात नाजूक बांगड्या असे प्रिशाचे गोड रुपडे अगदी जवळून पाहून समीर क्लीनबोल्ड झाला.

" पण तुम्ही म्हणता तसं माझा आत्मविश्वास खचला आहे हे मला जाणवते आहे.त्यामुळेच माझ्याकडून चुका होत आहेत.त्यात माझ्याकडे सारेच शंकेने बघत आहेत त्यामुळे देखील मला भीती वाटतेय."प्रिशा

" अहो कसली भीती? ती मुलं पिऊन आली अन् वर्गात बसली.याचा तुमच्याशी काय संबंध? नाही आलं तेव्हा तुमच्या लक्षात, म्हणजे तुम्ही सर्वस्वी दोषी आहात असे मुळीच नाही.मला सांगा आपले प्रिन्सिपल पाटील सर तुम्हाला याबद्दल नंतर काही बोलले?" समीर

" नाही पण त्यावेळी त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले होते." प्रिशा

" अहो त्यावेळी ते रागात होते. आता राणा सर देखील तुम्हाला रागावले.का? कारण तुम्ही आजवर तुमचं बेस्ट देत आल्या आहात.त्यातील एक चूक तुमचं परफेक्शन नष्ट करू शकत नाही हे राणा सरांना समजत नाही." समीर

" ओह! तुम्ही किती निर्भिड अन् परखड बोलता हो!खरंच खूप खूप धन्यवाद मला असं सगळं व्यवस्थित समजून सांगण्यासाठी.खरं तर माझी आई देखील मला हेच सांगत होती तरीही मला ते खरे वाटत नव्हते."प्रिशा

" कारण आपण बाहेरच्या व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवतो.पण हे बघा मी बाहेरचा व्यक्ती असूनही सौ टका खरे बोललो आहे."समीर

प्रिशा छान हसली.तिच्या स्मितहास्याच्या धबधब्यात चिंब न्हावून निघावं अन् तिची सारी दुःखं नाहीशी करावी असे समीरला मनोमन वाटत होते.

" अरे!या सगळ्यात तुम्ही जे काम माझ्याकडे शिकण्यासाठी आला आहात ते राहिलंच नाही का?"प्रिशा

" ते काम तर होईलच हो पण काम शिकवणाऱ्या मॅडम हसऱ्या हव्या की नको?"समीर

प्रिशा चक्क लाजली अन् गोड हसली.

तेवढ्यात मोबाईल वाजला.

" हा बोल आई.."प्रिशा

" काय गं ठीक आहेस ना?"वसुधाताई

" एकदम ठणठणीत आहे." प्रिशा

वसुधाताई मनोमन प्रार्थना करतच होत्या.

आपली प्रिशा खूप भावनिक मुलगी आहे,त्यामुळे झाल्या प्रकाराचा दोष स्वतःला देत ती रडतच असेल असे त्यांना वाटले होते.त्यामुळे त्यांनी प्रिशाला फोन केला होता.तिचे बोलणे ऐकून त्यांचे आईचे काळीज सुखावले होते.हा चमत्कार नक्की कोणी केला याबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते.तरीही याबद्दल न विचारता त्या म्हणाल्या,

" बरं.करते नंतर."अन् त्यांनी फोन ठेवला.

समीर प्रिशाला तिचे व्यक्तिमत्व आणखी खुलवण्यासाठी नक्कीच मदत करेल.हो ना? पण मग वैभवी मॅडम अन् तिकडे महेश सर यांचे ऑफिस पॉलिटिक्स समीर आणि प्रिशा झेलू शकतील? कशी फुलेल दोघांची प्रेमकहाणी? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..


भाग ६ समाप्त

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे






🎭 Series Post

View all