इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ८

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
प्रिशा घरी आली. गाडीवरून उतरून अगदी धावतच तिने आईची गळाभेट घेतली.

वसुधाताई देखील लेकीला आनंदात पाहून सुखावल्या पण हा चमत्कार काही त्यांच्या पचनी पडला नाही.याबाबत तिला नंतरच विचारू असा विचार करत त्यांनीही लेकीला मायेने गोंजरले.

“आज स्वारी भलतीच खुश दिसतेय..” विनयराव

प्रिशा लाजली अन् बेडरूममध्ये निघून गेली.

“ हिला काय झाले आहे अचानक?” विनयराव

“ बरंच आहे ना आपल्यासाठी.इतक्या दिवसांत तिचे मोकळे हसू पाहून खूप बरं वाटतंय.हो ना?” वसुधाताई

“ हो खरंच! हे करायचे, ते करायचे असा टाइमटेबल सतत फॉलो करता करता आपली प्रिशा मनमोकळं हसणं, बोलणं पार विसरून गेली आहे.माझ्या पोरीला देवाने नेहमी असेच आनंदी आणि समाधानी ठेवावे हीच माझी इच्छा आहे.लहानपणापासून परफेक्ट राहण्याचा अट्टाहास मीच तिच्यावर लादला अन् या ओझ्याखाली माझी प्रिशा कायम स्वतःला दाबत आली.” विनयरावांना रडू कोसळले.

“ अहो,तुम्ही एक बाप म्हणून तिला शिस्त लावली अन् परफेक्ट बनवलं.यात तुमचा काहीही दोष नाही.आपली मुलगी समजदार आहे,जबाबदार आहे. तिला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून ती परफेक्ट वागते.तिला एक राजकुमार मिळावा अन् तिचे आयुष्य रंगतदार बनावे,त्याने तिला आयुष्य जगणे शिकवावे अशी माझीही इच्छा आहे.सगळं ठीक होईल.तुम्ही काही काळजी करू नका.गणपती बाप्पा आहेत ना! “ वसुधाताई

“ हो..” विनयराव

“ मग आता झटपट फ्रेश व्हा आणि मला पनीर आणून द्या.मी तिच्या आवडीचा पनीर मसाला आणि मसालेभात बनवते.”वसुधाताई

तेवढ्यात हर्षु आला.
“ मला नाही आवडत ते पनीर.नेहमी ताईच्याच आवडीचं बनवतेस तू आई.”हर्षु

आपल्या बेडरूममधून बाहेर येत प्रिशा म्हणाली,

“ हर्षु, मग मी आज तुझ्या आवडीची बासुंदी बनवली तर चालेल?”

“ अगदी धावेल..”हर्षु

सारे हसू लागले.

खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांची जेवणं उरकली.
किचनमधील कामे आटोपून वसुधाताई प्रिशाच्या बेडरूममध्ये गेल्या.

“ प्रिशा..”वसुधाताई

“ काय गं आई?”प्रिशा

“ काय करतेय?”वसुधाताई

“ पिक्चर बघतेय.”प्रिशा

एरवी यावेळी पुस्तक वाचनात दंग असलेली प्रिशा आज चक्क पिक्चर बघतेय हे पाहून वसुधाताईंना आश्चर्य वाटले.

“आज काय झाले आहे तुला?”वसुधाताई

आईने डायरेक्ट पॉइंट पकडत प्रिशाला बोलण्यास उद्युक्त केले.

“ अम्म..काही नाही.आज नेहमीसारखाच नॉर्मल दिवस होता माझा..” प्रिशा

“प्रिशू मी तुझी आई आहे.खरं खरं सांग बरं..”वसुधाताई

आपली आई म्हणजे आपली बेस्ट फ्रेंड मानणारी प्रिशा वसुधाताईंजवळ आजचा घटनाक्रम सांगून मोकळं व्हावं की नाही या पेचात पडली.

‘बाबांना समीरबद्दल कळलं तर ते खूप चिडतील आणि त्यांच्या मनातील आपली इमेज कायमची खराब होईल.’ असा विचार प्रिशाच्या मनात डोकावला.

“प्रिशा..कुठे हरवलीस?”वसुधाताई

“ आई,माझ्या क्लासमध्ये ते गैरकृत्य घडल्याने मी खूप डीप्रेस झाले होते.आज ना आमच्या कॉलेजमध्ये मेडीटेशन आणि माईंड पॉवर यावर व्याख्यान होते.मी ते अटेन केले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला,शिवाय ती मुलंही आज मला सॉरी म्हंटली.”प्रिशा

“ चला,देव पावला.तरी मी तुला सांगत होते यात तुझी चूक नाही,टेन्शन घेऊ नकोस म्हणून..” वसुधाताई

“ आई,प्लीज तो विषय नको आता..” प्रिशा

“ बरं बाळा,काही लागलं तर हाक मार.मी जागीच आहे.” वसुधाताई

“ मी घेईन काही लागलं तर.तू जा,झोप आता.तूही थकतेस ना दिवसभर!”प्रिशा

“ बरं.चालेल.गुड नाईट बेटा.” वसुधाताई

“ गुड नाईट आई..”प्रिशा

वसुधाताई निघून गेल्या.

प्रिशा पुन्हा विचारांत हरवली.
‘ काय जादू केली त्या समीरने माझ्यावर? मी तर आज त्याचंच ऐकत होते.त्याचे माझ्यासोबत असणे मला सुखावह का वाटत होते?हे प्रेम तर नाही ना? या प्रेमाचा माझ्या परफेक्शनमध्ये अडथळा आला तर?तसा समीर वाईट नाहीच मुळी.हा,त्याच्या काही इम्पर्फेक्ट गोष्टी मला खटकल्या पण इट्स ओके. नो वन इज परफेक्ट लाईक मी पण तरीही मला तो खरंच आवडला..’

तेवढ्यात तिचा फोन वाजला.तिने उचलला.

____________________________

दुसऱ्या दिवशी प्रिशा कॉलेजला पोहोचली.आपल्या टेबलजवळ जाताच तिला एक सुंदर बुके तिथे दिसला.ती सुखावली पण तिने आपल्या चेहऱ्यावर तसे काहीही दाखवले नाही.समीर तिथे बाहेरच गुपचुप उभा होता पण तिला मात्र तो दिसला नव्हता.तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तो तिला चोरून बघत होता.

तिने तो बुके काहीच विशेष नाही असे भासवून बाजूला केला आणि टेबलवर बसली.समीर तिथे आला.

“ हाय. प्रिशा मॅडम.”समीर

प्रिशाने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले.ती उभी राहिली अन् आपले डस्टर आणि चॉक घेऊन लेक्चरला निघाली.

“ मॅडम,मॅडम..” समीर
प्रिशा त्याच्याशी काहीही न बोलता निघून गेली.

समीरला वाईट वाटले.तो विचारात पडला,

‘कालपर्यंत माझ्याशी इतकी छान वागणारी ही मुलगी आज एकदम एवढी बेदरकार कशी झाली? बोलणे तर दूरच तिने माझ्याकडे पाहिले देखील नाही पण मी पण कच्चा खिलाडी नाही.माझे काय चुकले हे तिला मी विचारणारच!कदाचित मी तिच्याइतका बेस्ट नाही.जाऊ दे मनात मांडे खाण्यापेक्षा तिला डायरेक्ट विचारलेले बरे.’

एका रात्रीत काय झाले प्रिशाला? ती समीरशी अशी का वागतेय? तिच्या वागण्याचा आणि रात्री तिला जो फोन आला होता त्याचा काही संबंध आहे का? हा ट्विस्ट जाणण्यासाठी उत्सुक आहात? हम्म..उत्सुकता अशीच शिगेला पोहचू द्या.या प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढील भागात..त्यासाठी स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

भाग ८ समाप्त

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all