इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ९

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
भाग ९

समीर बराच वेळ प्रिशाची वाट पाहत बसला पण ती आली नाही.तिच्या डिपार्टमेंटमध्ये येरझाऱ्या घालता घालता शेवटी त्याच्या लेक्चरची वेळ झाली अन् तो निघून गेला.नेमकं प्रिशाला देखील आज बॅक टू बॅक लेक्चर आणि प्रॅक्टिकल होते.सारे संपल्यावर ती आपल्या जागेवर,आपल्या टेबलवर जरा वेळ स्थिरावली.कन्टीन्यू उभे राहिल्याने तिचे पाय खूप दुखत होते आणि प्रचंड थकवा जाणवत होता.

तेवढ्यात समीर तिथे आला.तो तिच्या समोर बसला.

“ काय झाले आहे मॅडम?”समीर

प्रिशा आधीच वैतागलेली असताना समीर तिच्याकडे आला आणि असा प्रश्न विचारू लागला.त्यामुळे ती प्रचंड चिडली.तरीही तिने उत्तर देण्याचे टाळत मान दुसरीकडे फिरवली.

समीर त्या दिशेने खुर्ची वळून बसला.आता दोघे एकदम समोरासमोर होते,अगदी जवळ होते.दोघांचीही नजरानजर झाली.

वैभवी मॅडम नेमक्या मीटिंगला गेल्याने प्रिशाच्या टेबलसमोर तसेच स्टाफरूममध्ये कोणीही नव्हते.

दोघेही एकमेकांना न्याहाळत बसले.दोघांच्याही मनात प्रीतीची फुलपाखरे बागडू लागली.आपण कुठे बसलेलो आहोत हे दोघेही क्षणभर विसरले आणि एकमेकांच्या नयनरम्य प्रेमरोगात न्हाऊ लागले.दोघेही मान पुढे करत एकमेकांजवळ जाऊ लागले.त्यांच्यात आता फार कमी अंतर उरले होते.काहीतरी अनामिक ओढ त्यांना जवळ येण्यास प्रवृत्त करत होती.खरं तर ही ओढ म्हणजे
लव्ह ॲट फर्स्ट साईटचा परिणाम होता.तेवढ्यात पुढच्या तासाची बेल वाजली.दोघेही भानावर आले.

“ हे बघ प्रिशा,काय झाले आहे हे सांगशील की अशीच मला टाळत राहशील?”समीर

“ कुठे काय झालंय समीर? तुला लेक्चर वगैरे नाही का? का सतत माझ्या मागे मागे इथे येतोयेस तू?”प्रिशा

“ मला आज एकच लेक्चर होते आणि ते घेऊनच मी इकडे आलो आहे.तुला माहित आहे ना मला तुझ्याकडून सॉफ्टवेअर शिकायचे आहे म्हणून!म्हणून तुझ्याकडे येतोय मी.त्याशिवाय आपल्यात आता काय घडलं हे तुला आणि मला चांगलंच कळतंय आणि ते दोघांनाही सुखावत आहे,आनंद देत आहे.” समीर

“ उगाच काहीही बोलू नकोस.तुला जे शिकायचे आहे ते माझ्याकडून शिकून घे आणि निघून जा. मला सारखं सारखं भेटायला येऊ नकोस.”प्रिशा.

“ खरं सांग प्रिशा,तुला ही मला भेटावसं वाटत नाही?” समीर

प्रिशाला लवकर उत्तर देता येईना.ती बेचैन झाली आणि गोंधळली.

“ मी सांगतो.तुलाही माझ्याबद्दल तेच फिलिंग आहे जे मला तुझ्याबद्दल आहे.म्हणूनच तू मला आज आरेकारे केलंस.लक्षात ठेव!तू जेवढं माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करशील तेवढा तुला त्रास होईल.” समीर

अचानक तिकडून राणा सर आले.

“ मिस प्रिशा..”राणा सर

“येस सर?” प्रिशा दचकून उभी राहिली.

“ माझी एक अर्जंट मीटिंग शेड्युल झाल्यामुळे तुम्ही माझे आताचे प्रॅक्टिकल घ्या.हे प्रॅक्टिकल जरा अवघड आहे कारण त्यासाठी थ्री फेज सप्लाय व्यवस्थित चालू करावा लागतो आणि नंतर ट्रान्सफॉर्मर ऑपरेशनचा डेमो द्यावा लागतो.प्लीज चेक द कनेक्शन्स अँड देन प्रोसीड. बी केअरफुल.” राणा सर

“ ओके सर.” प्रिशा

राणा सर निघून गेले.

प्रिशा प्रॅक्टिकल घ्यायला निघाली.

“ मी जे बोललो आणि आपल्यात आज जे काही झाले त्याचा नीट विचार कर आणि मग मला सांग.तुझ्या उत्तराची मी वाट पाहीन.” समीर

प्रिशा काहीही न बोलता थेट प्रॅक्टिकल रूममध्ये पोहोचली.समीर मात्र तिच्या अशा वागण्याने त्रस्त झालेला होता आणि तिथेच बाहेर उभा होता.

अडकित्यात अडकलेली प्रिशा समीरच्या प्रेमात पडली होती पण काल रात्री तिला आलेल्या फोनवरील व्यक्तीचे बोल तिला समीरविषयी साशंक बनवत होते.ते बोल होते,

“ कोण आहे हा समीर? हे बघ कोणावरही विश्वास ठेऊ नकोस.तू बेस्ट टीचर आहेस आणि पुढील वर्षी देखील तुला हा अवॉर्ड मिळवायचा आहे.तुझ्यावर अनेकांची ईर्ष्या तयार झालेली आहे.त्यामुळे कोणीही तुला फसवून,आपल्या जाळ्यात अडकवून हा अवॉर्ड मिळवण्यासाठी कोणीही प्रयत्न करेल.काय सांगावं असाच प्रयत्न हा समीर देखील करत असावा.त्यामुळे याच्यापासून चार हात लांब रहा.त्याच्याशी काहीही बोलू नकोस मग बघ तो आपोआप तुझा पिच्छा सोडेल.”

अवघड असतानाही तिने अत्यंत फोकस्ड राहून प्रॅक्टिकल सुरू केले.ट्रान्सफॉर्मर ऑपरेशनचा डेमो देखील छान पार पडला.आता सर्व विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिकल करून पाहू लागले.कोण्या एका खोडसाळ विद्यार्थ्याने ट्रान्सफॉर्मर ऑपरेशनच्या वायरिंगचा घोळ केला आणि त्यातून अचानक धूर येऊ लागला.

दुसऱ्या ग्रुपला स्पेसिफिकेशन सांगण्यात दंग असलेल्या प्रिशाला गडबड वाटली आणि तिने आतूनच बाहेर उभ्या असलेल्या संतोष काकांना (डिपार्टमेंटचे मदतनीस)म्हंटले,

“ काका थ्री फेज सप्लाय बंद करा लवकर. बी क्विक..”
प्रिशा

संतोष काका फोनवर बोलण्यात दंग असल्याने त्यांना तिचा आवाज ऐकू आला नाही.समीरला गडबड वाटली म्हणून तो प्रॅक्टिकल रूममध्ये डोकावला तर त्याला धूर दिसला.त्याने क्षणाचाही विलंब न करता थ्री फेज सप्लाय बंद केला आणि पुढील अनर्थ टळला.

प्रिशाने आधी त्या ट्रान्सफॉर्मरची ऑपरेशन वायरिंग ठीक केली.सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.सर्व मुले समीरला थँक्यू म्हणू लागली.प्रिशा देखील समीरला थँक्यू म्हणाली. समीरला जरा हायसे वाटले आणि तो निघून गेला.

प्रेमाच्या आणि बेस्ट टीचर पॉलिटिक्सच्या गुंत्यात अडकुन प्रिशा, समीरशी असलेला प्रेमबंध तोडेल का?नाही तर हे बंध आणखी घट्ट कसे करेल?कसे सामोरे जाईल ती या सर्व भावनिक कांगोऱ्यांना? तिला फोन करून समीरविषयी फितवणारी व्यक्ती नक्की आहे तरी कोण?सांगू शकाल? ह्मम.. करा प्रयत्न अन् सांगा मला कमेंटमधून..

प्लिज स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह ऑफ समीर अँड प्रिशा..

भाग ९ समाप्त..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all