इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १२

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची प्रेमकहाणी
भाग १२

आजीला प्रिशाची दया आली.प्रिशाजवळ जाऊन त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

“ हे बघ बेटा, माझं खोचक बोलणं तुला पटलं नसेल तर मला माफ कर पण मी हे सारं तुझ्या भल्यासाठी सांगत आहे.” आजी

“ नाही आजी.तू जे सांगते आहेस ते माझ्या भल्यासाठी सांगतेस हे पटलं आहे मला.खरं सांगू का तुला? तो समीर माझ्या आयुष्यात आला आणि माझा करियर वरील फोकस हटला.” प्रिशा

“ अगं प्रिशा,हे प्रेम वगैरे करायला अख्खं आयुष्य पडलंय. समीरविषयी जेव्हा तू मला त्या दिवशी फोनवर सांगितलं तेव्हा मी तुला हेच सांगितलं होतं.खरं सांगू? मीही अशाच काही चुका केल्या आणि त्यामुळेच या वयातही प्रिन्सिपल होण्याची ताकद असताना एक थातुरमातुर प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.मीही प्रेम, संसार,मुलं यांच्यात खूप अडकत गेले आणि कॅपॅबिलिटीज असताना प्रिन्सिपल पदाच्या ग्लॅमर, रिस्पेक्ट पासून आपसूकच दूर होत गेले. कॉलेजमधील प्रोफेसर लोकांचे पॉलिटिक्स देखील मला कधी हॅण्डल करता आले नाही.का? कारण कोणी ना कोणी माझ्यापेक्षा वरचढ होऊन एखादं काम माझ्यापेक्षा छान करून दाखवायचं.हा त्यात वशिलेबाजीचा हात असायचाच म्हणा पण जाऊ दे सोड! यातील आणखी काही कळीच्या गोष्टी खोलवर सांगून मला तुला घाबरवायचे नाही.हे सारे तुझ्या सोबत घडू नये म्हणून तर तुला अगदी लहानपणापासून मी परफेक्शन,टाईम मॅनेजमेंट यांचे धडे देत आले आहे.”आजी

प्रिशाच्या मनात आजीविषयी प्रचंड कळवळा दाटून आला.

खोलीबाहेर प्रिशाचे आणि आजीचे बोलणे ऐकत असलेल्या वसुधाताई अचानक टाळी वाजवत खोलीत आल्या आणि म्हणाल्या,
“वाह,सासूबाई वाह!”

“ वसुधा? हा काय प्रकार आहे?”आजी

“ हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा.नाही का?” वसुधाताई

“ आई,अग् आजी मला समजून सांगत होती.” प्रिशा

“ बाळा,आजवर मी समजत होते की तुझ्या बाबांनी हा परफेक्शनचा बडेजाव तुझ्यावर लादला आहे.याबाबत तर कित्येकदा मी त्यांच्याशी भांडले देखील कारण माझ्या मुलीने या परफेक्शनच्या नादात स्वतःचे जीवन एन्जॉय करायला विसरू नये असे मला वाटायचे.म्हणून तुला मी स्वयंपाकात मदत मागायचे,माझ्यासोबत पाहूण्यांकडे न्यायचे,तुला सिनेमा बघायला न्यायचे, मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ द्यायचे पण तरीही तू काही तुझा हा अट्टाहास सोडत नव्हतीस.आता मला याचे खरे कारण समजते आहे.तुला परफेक्ट बनवून त्याचा ससेमिरा सासूबाईंना आम्हाला सर्वांना धाकात ठेवून मिरवायचा होता.” वसुधाताई

“ वसुधा,काय बोलतेय तू हे?”आजी

“ बास! सासूबाई बास! मला माझी मुलगी एक नॉर्मल मुलगी म्हणून पाहायची आहे.तुम्हाला माहितीये या परफेक्शनच्या अट्टाहासापायी तिला तिच्या हातून एकही चूक झालेली आवडत नाही.आपण माणूस आहोत,रोबोट नाही हे तिला समजतच नाही.तिच्या जीवनात,दिनचर्येत काहीही चुकीचे घडले तरीही तिला खूप त्रास होतो. यात तिचा आत्मविश्वास हरवतो आणि ती पूर्णपणे कोलमडून पडते.कोणाचेही आयुष्य परफेक्ट असूच शकत नाही.त्यात संकटं येणार, आनंद तसेच दुःख देखील येणार हे तुम्ही तिला शिकवायला हवे होते.आज तुमच्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे.”
वसुधाताई

प्रिशाच्या खोलीतील गडबड गोंधळ ऐकून विनयराव तिथे आले आणि त्यांनी वसुधाताईंची शेवटची काही वाक्ये ऐकली.त्यांनी वसुधाताईंवर जोरदार हात उगारत म्हंटले,”वसुधा..काय बोलतेय तू हे?”

“ तुम्ही जे ऐकलं ना तेच बोलले आहे मी.बास! आता इथून पुढे माझ्या मुलीचे करियर आणि लग्नासंबंधीचे निर्णय मी घेणार किंवा ती स्वतः घेईल.तिला याबाबत कोणीही काहीही सांगून भरकटवू नये हे लक्षात ठेवा.नाहीतर गाठ माझ्याशी आहे.” वसुधाताई आजीकडे रागाचा कटाक्ष टाकत बोलल्या आणि खोलीबाहेर निघून गेल्या.

आवाजाने झोपेतून उठत हर्षु डोळे चोळत त्याच्या खोलीबाहेर आला आणि म्हणाला,
“ आई,काय चालू आहे गं तुमचं? ही काही वेळ आहे का भांडायची?”

“ हर्षु,काही झालं नाहीये.तू झोप.आता तुला कसलाच आवाज नाही येणार.जा बाळा.”वसुधाताई

वसुधाताई मनोमन विचारांत गुंतल्या,
‘ माझा हर्षु,किती निरागस मुलगा आहे.तो स्वतःवर कसलेही बर्डन घेत नाही.ना परीक्षेचे ना कोणी बोलल्याचे!हेच तर खरं आयुष्य जगणं आहे हे माझ्या प्रिशाला मात्र समजत नाही.’

तेवढ्यात विनयराव तिथे आले.

“ वसुधा,तू आज आईला खुप दुखावलं आहेस.” विनयराव

“ अहो,त्यांनी माझ्या प्रिशाला दर उन्हाळ्याच्या तसेच दिवाळीच्या सुटीत हे जे शिकवले ना त्याने माझ्या पोरीला रोबोट बनवून टाकले आहे हे तुम्हाला कसे समजत नाही? ओह,शेवटी आई ना ती तुमची! तुम्ही तिचीच पाच ओढणार..” वसुधाताई

“ वसुधा..” विनयराव

“ ओरडू नका माझ्यावर. मला पूर्ण खात्री आहे की मी चुकीचे काहीच बोललेली नाही आणि तुम्हाला देखील याबाबत कल्पना आहे.त्यामुळे जरा पोरीचा विचार करा आणि मग बोला.”वसुधाताई

एव्हाना विनयराव देखील सारे काही समजून गेले होते पण ते आपल्या आईला काहीही बोलण्यास असमर्थ होते. प्रिशा मात्र आज झालेल्या या प्रसंगामुळे हादरून गेली होती.खरंच आई म्हणते तसे मला आजीने वागवले की आजी म्हणते तसे मी परफेक्टच वागायला हवे? आईचे म्हणणे बरोबर आहे की आजीचे म्हणणे बरोबर आहे?प्रिशा विचार करू लागली.

तुम्हाला काय वाटतं? कोण बरोबर आजी की वसुधाताई?सारासार विचार करून प्रिशा आता काय करेल? आयुष्य जगण्याचा खरा सार कशात आहे हे प्रत्येकाला खूप उशिरा समजते.नाही का? प्रिशाला हे कळेल का?समीर आणि प्रिशाचा लव्ह बाँड कधी तयार होणार?

जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू इंपरफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

भाग १२ समाप्त.

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे..

🎭 Series Post

View all