इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १३

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची प्रेमकहाणी
भाग १३

आजी आणि प्रिशा,दोघीही बराच वेळ रूममध्ये एकमेकींशी न बोलता विचार करत बसल्या होत्या.रात्र खूप झाली होती तरीही दोघींना झोप येत नव्हती.दोघीही एकमेकींना दुखावल्याच्या भावनेने वैफल्यग्रस्त झाल्या होत्या.

तिकडे वसुधाताईदेखील जाग्याच होत्या.आज आपण सासूबाईंना जास्तच बोललो या विचाराने त्यांनाही झोप येत नव्हती.विनयरावदेखील आज झालेल्या प्रकाराबद्दल अस्वस्थ झाले होते.बराच उशिरा दोघांचाही डोळा लागला.वसुधाताईंनी सासूबाईंची माफी मागायचे ठरवले.

सकाळी सासूबाईंना बेडवरच कडक चहाची सवय होती. वसुधाताई प्रिशाच्या रूममध्ये डोकावल्या.तिथे सासूबाई नव्हत्या.त्या गॅलरीत एकट्याच बसून समोरच्या झाडाला एकटक पाहत बसल्या होत्या.

वसुधाताईंनी त्यांच्यापुढे चहाचा ट्रे ठेवला.खरं तर अशावेळी चहाची सासूबाईंना म्हणजे आजींना खूप गरज होती तरीही त्यांनी आपली मान दुसरीकडे वळवली.

“ आई,चहावर राग नका ना काढू प्लीज!”वसुधाताई

वसुधाताईंचे म्हणणे पटल्याने त्यांनी चहाचा कप उचलला आणि पुन्हा दुसरीकडे तोंड फिरवले.

“ सासूबाई सॉरी.मी तुम्हाला काल खूप काही बोलले.खरंच चुकलं माझं!”वसुधाताई सासूबाईंपुढे स्वतःचे दोन्ही कान धरत म्हणाल्या.

सासूबाईंना खूप हसू आले.
“ हा,हा,हा,हा…”

वसुधाताई क्षणभर भांबवल्या.नक्की काय झाले हे त्यांना कळेना..

“वसुधा,अगं लहान मुलांसारखी काय कान पकडुन माफी मागतेस?” सासूबाई

“ आ.. मग काय करू? कोंबडा करू का? की गाढव बनू? ते तुम्ही प्रिशाला लहानपणी गणित चुकले की हीच शिक्षा करायचात ना!”वसुधाताई

“ह..ह..ह..अगं बेटा काल तुझं काहीही चुकलं नाही.तू काल जे जे बोललीस ना, ते एका आईच्या मनातले बोल होते.त्यामुळे माझे आणि प्रिशाचे कान उघडले.तू म्हणाली तसं आता मी प्रिशाच्या आयुष्यात अजिबात लुडबुड करणार नाही. तिला तिचे निर्णय आता स्वतः घेता यायला हवेत आणि काही समजत नसेल तर तू आहेसच की तिला योग्य सल्ला द्यायला.”सासूबाई

“ सासूबाई,तुम्हीही तिच्या आजी आहात.तुमचाही तिच्यावर हक्क आहे.” वसुधाताई

“ होता पण आता ती एक सुजाण नागरिक बनली आहे. अगं तिचं वय आता २५ वर्षे इतकं आहे. चला आता मी अंघोळ उरकते आणि लवकरच निघते.” आजी

“ सासूबाई,कालच तर आलात.असा राग डोक्यात घालून घेऊ नका. प्लीज २- ३ दिवस थांबा.” वसुधाताई

प्रिशा बेडवर उठून दोघींचे बोलणे ऐकत होती.ती गॅलरीत आली अन् वसुधाताईंना बिलगली.

“ आई,आजीला सांग ना जाऊ नको म्हणून.ती म्हणाली तसं मी आता स्वतःचे कुठलेही निर्णय घेण्यास सक्षम आहे.तुम्ही दोघीही माझ्या खऱ्या
मार्गदर्शक आहात.”प्रिशा

“ अगं प्रिशा माझीही इच्छा आहे सासूबाईंनी राहावं म्हणून..आता तूच सांग त्यांना.. ” वसुधाताई

“ वसुधा,प्रिशा खरंच जाऊ द्या गं मला.” आजी

वसुधाताईंनी प्रिशाकडे पाहिले.प्रिशादेखील नाराज झाली.

आजीने तयारी केली आणि बॅग घेऊन त्या हॉलमध्ये आल्या.विनयराव तिथे काही कागदपत्रे चाळत बसले होते.आजीला पाहताच ते उभे राहिले.

“ हे काय? निघालीस? कालचे प्रकरण एवढे मनावर घेतलेस?” विनयराव

“ अरे कॉलेजमध्ये जरा काम आलंय अर्जंट.काल इथे आल्यावर मला मेसेज आला.म्हणून निघतेय.” आजी

“ आई,काल जे झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो.” विनयराव

“ अरे, कालचं प्रकरण तर आम्ही विसरलो पण..आमचं पॅच-अप पण झालं..”आजी वसुधाताई आणि प्रिशाकडे पाहत म्हणाल्या.

“ हो? खरंच? काय होता पण विषय?मला तर काहीच माहीत नाही.” हर्षु मोबाईलवर गेम खेळत असताना मध्येच म्हणाला.

सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला.साऱ्यांचेच हसू फुलले आणि घरात आनंदाचे वातावरण तयार झाले.

“ आई,मी तुला सोडतो.” विनयराव

“ नको रे.आता तुझी ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे.तू आणि प्रिशा पटापट आवरून आपापले उद्योग बघा.मी जाते बरोबर.”असे बोलून आजी निघून गेल्या.सारेच थोडेसे नाराज झालेले होते.

प्रिशा आवरण्यासाठी रूममध्ये निघून गेली.तेवढ्यात प्रिशाला एक फोन आला.त्यावर समीर कॉलिंग असे येत होते.नेमके वसुधाताईंनी ते पाहिले.फोन सायलेंटवर होता त्यामुळे प्रिशाला आवाज ऐकू आला नाही.

प्रिशा तयार होऊन बाहेर आली.
“ प्रिशा, तुला फोन येत होता कोणाचातरी.”

प्रिशाने फोन चेक केला. रिसेंन्ट कॉल्समध्ये समीरचे नाव होते.तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले अन् ते नेमके वसुधाताईंनी हेरले.

‘ ह्मम्.. मामला प्यार-व्यारचा तर नाही ना?’ वसुधाताई मनातल्या मनात पुटपुटल्या अन् विचार करू लागल्या..
तेवढ्यात गॅलरीतील खिडकीत कबुतरांची जोडगोळी आली.

“ आई,बघ ना किती सुंदर जोडगोळी आहे.एकमेकांसोबत किती छान दिसताय.अगदी लव्हबर्ड्स, मेड फॉर इच अदर..” प्रिशा

“अच्छा,हे! ते तर रोजच येतात पण तुझं आजच लक्ष गेलं त्यांच्याकडे!काहीतरी भानगड आहे नक्कीच!”वसुधाताई

“ आ,म्हणजे? ताई तू प्रे…”हर्षु

“ हर्षु,तुला कोणते चॉकलेट आणायचे रे बाळा?”हर्षुचे बोलणे मध्येच तोडत प्रिशा म्हणाली.

“मला सिल्क डेरी मिल्क कॅडबरी पाहिजे.” हर्षु

“ ओके.डन!”प्रिशा

वसुधाताईंनी प्रिशाचा हा खेळ ओळखला.

“ नाश्ता केलास का प्रिशा? नाहीतर करून घे माझ्यासोबत पटकन!”विनयराव

“ हो.बोलता बोलता मी नाश्ता उरकला.आई ,तू आणि. हर्षु जा,नाश्ता करा बाबांसोबत..”

सारे काही झाल्यावर प्रिशा आणि विनयराव आपापल्या कामासाठी निघाले.का कुणास ठाऊक? प्रिशाला आज खूपच हलके हलके,ताजेतवाने वाटत होते.हा आजी आणि वसुधाताईंच्या रात्रीच्या चर्चेचा परिणाम होता? की त्या कबुतरांच्या जोडगोळीचे अनपेक्षित दर्शन? तुम्हाला काय वाटतं? कळवा कमेंट्समधून..

प्रिशा आणि समीरचा हा प्रेमाचा लपंडाव आधी कोण आणि कधी जिंकणार?जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

भाग १३ समाप्त..
क्रमशः..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे



🎭 Series Post

View all