इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १६

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
भाग १६

‘ काय यार, हा आमच्या प्रेमाबद्दल कमिट करणार होता अन् तेवढ्यात त्याला सिस्टरने बोलावले.जाऊ दे काही हरकत नाही.समीरने एक मोठे सत्कर्म आपल्या हातून आज घडवून आणले हे जास्त महत्वाचे आहे.प्रेमाच्या आणाभाका काय नंतर देखील घेता येतील,कारण मला माहित आहे ही इज माइन अँड डीप्ली इन लव्ह विथ मी..त्या दिवशी जेव्हा त्या चहा शॉपमध्ये याने कपातील चहा बशीत घेवून पिला ना तेव्हा मला त्याची खूप किळस आली.खूप राग देखील आला.अजिबात टेबल मॅनर्स नाहीत म्हणून कीव देखील आली.त्याच्या अशाच दोन तीन गोष्टी मला खटकल्या आणि मला समीर म्हणजे अगदी इम्परफेक्शनचा कळस वाटला होता.हळूहळू त्याचा स्वभाव मला समजत गेला आणि मी त्याची कधी झाले कळलंच नाही पण तरीही तो इतका सहज आणि मी इतकी तारतम्य बाळगणारी! स्वीकारेल का तो मला? त्याला खरंच आमच्या प्रेमाच्या नात्याविषयी बोलायचे होते की अजून काही वेगळे सांगायचे होते?’ समीरचा फोन ठेवल्यावर प्रिशा या विचारांत नकळत हरवली.

तिकडे समीरने त्या मुलाच्या मामांना फोन करून कळवले. हॉस्पिटलच्या बिलात मुलाच्या गरिबीमुळे सूट मिळवण्यात समीर यशस्वी झाला आणि त्या मुलाची यशस्वीपणे सुट्टी होऊन तो घरी गेला. समीरने त्याच्या मनातील माणुसकीचे दर्शन दाखवल्याने हॉस्पिटल मधील स्टाफ देखील त्याच्यावर खुश होता.तो आनंदाने घरी निघाला. मनापासून केलेले सत्कर्म माणसाला परफेक्ट बनवते,मग तो कसाही असला तरीही.हे त्याला पक्के ठाऊक होते.घरी पोहोचताच सुलभाताई ( समीरची आई) घाबरून म्हणाल्या,

“ काय रे? लवकर कसा काय आलास तू घरी?”

“ आज माझ्या विद्यार्थ्याचा अपघात झाला म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.” समीर

“ ह्म.. मग त्याला व्यवस्थित करून घरी सुट्टी देईपर्यंत महाराज हॉस्पिटलमध्ये थांबले असतील आणि मग आले आता घरी. बरोबर?”सूजयराव( समीरचे बाबा) उपहासाने बोलले.

“ अहो,असे काय आडवे बोलताय तुम्ही त्याला?चांगलं सत्कार्य करून आलाय तो.बाळा तू त्यांच्याकडे नको लक्ष देऊस. तू जेवला नसशील.मी तुला जेवायला वाढते.आज पनीरची भाजी केली आहे.”सुलभाताई

“ ये ss.. पनीरची भाजी?आई मग मला त्याच्या सोबत..” समीर

“ माहित आहे. गरमागरम फुलके.आणते लगेच.तू फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बस.” सुलभाताई

“ मी खालीच बसतो.” समीर

“ बरं बाबा,बस खाली.बस्कर टाकून बस राजा.”सुलभाताई

“ हम्म्म.. पनीरची भाजी,फुलके.करा, मजा करा.मग कॉलेजला गेलाच नसशील?”सूजयराव

“ नाही.सुट्टी टाकली.त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेणं जास्त गरजेचं होतं त्यामुळे..” समीर

“बास..समजलं. माणुसकीचा झेंडा मिरवताना पैसाही महत्वाचा असतो.त्याला कधीही डावलायचे नसते.नाहीतर येडे बनवून पेढे खाणारे डोक्यावर तुरी देऊन पळून जातील.”सूजयराव


“ बाबा,अहो एकच दिवस मी सुटी घेतली. त्यातही तुम्ही मला एवढं सूनावणार आहात का?मलाही कळतं कधी काय करायचे ते! तुमच्यासारखे पैसे कमवून बसलेले हजारों आहेत बाहेर पण खरी ओळख माणसाला त्याच्या सत्कर्मातून मिळते.त्यातून एक आनंद,समाधान मिळतं.” समीर रागाच्या आवेगातच बोलला.

सुलभाताई किचनमधुन धावतच आल्या.
“ समीर तू चल बरं आत. ताट वाढलंय तुझं.”

आवडीचे जेवण असूनही जराशा नाखुशीनेच समीरने ते उरकले.

“ अजून काही घेतोस बाळा?” सुलभाताई

“ नको.छान झाली होती भाजी.” ताट घेऊन उठत आणि बेसिनमध्ये हात धुत समीर म्हणाला.


समीर बेडरूममध्ये गेल्यावर सुलभाताई सूजयरावांवर चांगल्याच भडकल्या.

“ काय गरज होती पोराला टोचून बोलण्याची?निदान त्याला नीट जेऊ तरी द्यायचे!आपलंच पोरगं आहे म्हणून त्याच्याशी सुसंवाद साधू शकत नाही का तुम्ही? सतत आपले खोचक बोलणे करायचे अन् त्याला नाराज करायचं.अहो,अजूनही बदला स्वतःला. समीर आता लहान नाही प्रत्येक गोष्ट सांगायला.त्याचे निर्णय तो घेऊ शकतो.उगाचच आपले मत मांडून त्याला यापुढे नाखूष केले तर मी आहे आणि तुम्ही आहे..”सुलभाताई

सूजयराव आता चांगलेच वरमले. घरातील सर्वेसर्वा असणाऱ्या खुद्द गृहमंत्री नाराज झाल्या तर आपली काही खैर नाही असे वाटून ते शांत बसले पण तरीही समीरने जे काही आज केले त्यावर ते बिलकुल खुश नव्हते.

समीरदेखील आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत वडिलांच्या बोलण्याचा गहन विचार करू लागला.

‘खरंच बाबा म्हणतात तसा मी वेडा किंवा भोळा आहे का? मला लोक मूर्ख बनवून पळून जाऊ शकतील? माझ्या मनात प्रिशाच्या प्रेमाचा मोर बेधुंद नाच करत निखळ आनंदात वाहवतोय अन् अशात तिने मला नाकारले तर? तसंही ती किती परफेक्ट वागते आणि मी हा असा इम्परफेक्ट.खरंच तिचे माझ्यावर प्रेम आहे ? की तीही बाबांसारखी माझ्या प्रत्येक कामाला,मला पडताळून पाहते?बापरे! हा विचार नुसता माझ्या मनात आलाय तरीही मला किती भयंकर वेदना होत आहेत.ते काही नाही.हा जर नुसताच पोरकट खेळ असेल तर हे सारे इथेच थांबायला हवे.’ समीर

आता उद्या काय बोलेल समीर प्रिशाला? या दोघांच्या मनातील इंपरफेक्शन आणि परफेक्शनचे द्वंद त्यांच्या लव्ह बाँडला फुलवतील की अजूनही असेच टांगत ठेवतील? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

भाग १६ समाप्त..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all