इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २०

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची प्रेमकहाणी
खरं तर कॉलेज सुटल्यावर,त्या विद्यानिकेतन बागेत जाऊन समीरला भेटावे असे प्रिशाला बिलकुल वाटत नव्हते.नेहमीप्रमाणे बाबांची वाट पाहत ती कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभी होती.

‘शेवटी सगळे पुरुष सारखेच असतात,एखादी बाई दिसली की तिच्याशी लघळपघळ करायचा,जवळीक साधायची आणि मग ती झाली की दुसरी शोधायची.हा समीर तर १०० % असाच असणार.बरं याची हिंमत तर बघा,माझ्या भावनांशी खेळण्यासाठी पुन्हा मला बोलवतोय. सच अ शेमफुल इम्परफेक्ट प्रोफेसर.’
संध्याकाळचे ५.३० वाजले होते तरीही एकीकडे उन्हाचा पारा वाढलेला होता आणि दुसरीकडे समीरच्या विचारांनी प्रिशाचे बीपी वाढलेले होते.

थोड्या वेळातच विनयराव आले.प्रिशा वडिलांच्या गाडीवर बसली.तेवढ्यात समीर आपली बाईक घेऊन निघाला. प्रिशाकडे बघत,आपण भेटूया,ओके असे इशाऱ्याने खुणावत तो सुसाट वेगाने गेलासुद्धा.
‘ काय माणूस आहे यार हा!’ कपाळावर आठ्यांचे जाळे पसरवत,प्रिशा गालातल्या गालात बोलली.

“ काही म्हणालीस प्रिशा?”विनयराव

“ आ..नाही बाबा,काही नाही.”प्रिशा

‘ आता तर मी याला भेटून चांगलाच धडा शिकवणार!’ प्रिशाने मनोमन निर्धार केला.

घरी पोहोचताच प्रिशा फ्रेश झाली. चहा वगैरे उरकून ती बाहेर निघाली.

“ प्रिशा,कुठे चालली आहेस बाळा?”वसुधाताई

“ आई,आज ना जरा जास्त काम होतं. म्हणून फ्रेश होण्यासाठी जरा गार्डनमध्ये जाऊन येते.”प्रिशा

“ कुठल्या गार्डनमध्ये?” वसुधाताई

“ विद्यानिकेतन..”प्रिशा

“अगं मग हर्षुला सोबत घेऊन जा ना! त्याचेही तिथे खेळणे होईल..”विनयराव

“ अमम्.. नको बाबा.म्हणजे माझे जुने फ्रेंड्स येणार आहेत तिथे. त्यांच्यात हर्षु उगाच बोअर होईल.”
प्रिशा

“ अगं पण प्रिशा..” वसुधाताई

“ आई, प्लिज! मला उशीर होतोय.मी पायीच जाईन.जवळच तर आहे.बाय!” प्रिशा

मी निघाले आहे, असा मेसेज तिने समीरला केला.

आपण घरच्यांशी खोटं बोलतोय अन् तेही इतक्या आत्मविश्वासाने?प्रिशाचा स्वतःवरच विश्वास बसेना!
ते म्हणतात ना,’एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’.प्रिशाच्या बाबतीत हे अगदी खरं होत चाललं होतं.

‘ का धावतोय आपण त्या समीरमागे? त्याने खरंच काही जादू केली आहे का आपल्यावर? का सारखं सारखं त्याला बघण्याची, भेटण्याची इच्छा होते माझी? त्याने मला आज इतके दुखावले तरीही त्याच्या एका मेसेजवर मी त्याला का भेटायला चालले आहे?’ हा समीरच्या प्रेमाचा फिव्हर आहे की त्याच्याबद्दल उचंबळून आलेला राग? प्रिशाला कळेचना.

विचार करता करता विद्यानिकेतन गार्डन आलंसुद्धा.घड्याळात आता ६.१५ वाजलेले होते.बऱ्यापैकी उजेड होता.तिथे कोपऱ्यात म्हणजे अगदी झाडाझुडुपांमध्ये आधीच काही कपल्स बोलत बसलेले होते.आपल्याला इथे कोणी ओळखीचं बघू नये म्हणून प्रिशाने,समीरला तिथेच बोलवायचे ठरवले.

समीर आला.त्याने इकडेतिकडे पाहिलं.नेमकी दोघांची नजरानजर झाली आणि तो तिच्यापाशी गेला.

“ तुला कसं कळलं की मी इथेच या कॉर्नरला असेल म्हणून?”प्रिशा

“ मी तुला आता ओळखू लागलो आहे प्रिशा.त्यामुळे..” समीर

आल्या आल्याच अशी रोमँटिक सुरुवात करून समीरने पहिल्याच बॉलला षटकार मारला.आधीच सभोवतालच्या वातावरणाचा प्रिशावर परिणाम झाला होता.कोणीतरी आपल्याला असे नव्याने ओळखू लागले आहे,आपले मानत आहे, ही भावनाच तिच्या हृदयाचे चुंबन घेऊन गेली होती.तरीही आपला राग आठवत हाताची घडी घालत ,समीरच्या बरोबर समोर आणि आणखी जवळ चालत जात प्रिशा म्हणाली,

“ कोण होती ती? अन् तू तिला असा का पकडुन होतास?”प्रिशा

तेवढ्यात गार्डनमधील ग्रासमध्ये एका छोट्याशा झुडपात पाय अडकून प्रिशा समीरच्या अंगावर कोसळली.समीरने तिला अलगद झेलले.

आता दोघेही एकमेकांकडे पाहत,एकमेकांच्या सहवासात हरवले होते. समीरच्या बाहुपाशात प्रिशा जणू काही एक वेगळेच स्वर्गसुख अनुभवत होती.समीरचा पुरुषी सुवास,पिळदार शरीराची ठेवण प्रिशाला घायाळ करून गेली.प्रिशाचा मखमली स्पर्श,तिच्या डीओचा हलकासा तरीही सुंदर सुगंध समीरला हवाहवासा वाटत होता. दोघेही एकमेकांना आज खूप जवळून पाहत होते.अंधार पडत चालला होता.

तेवढ्यात गार्डन मधील लाईट गेली.प्रिशा दचकली आणि थेट समीरच्या कुशीत शिरली. समीरने देखील आपली मिठी घट्ट करत तिला आपल्या छातीशी धरले.
पहिल्या वहिल्या प्रेमाचा हा सुखद स्पर्श दोघांनाही हवाहवासा वाटत होता.

तेवढ्यात लाईट आली आणि प्रिशा ताडकन बाजूला झाली.

“शीट! का आली ही लाईट?”समीर

“ मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तू अजून?”
प्रिशा

“ तू जशी आता अडखळून पडलीस ना तशीच ती वनिता मॅडम पडली आणि मग मी त्यांना सावरलं. त्या बायोटेक डिपार्टमेंट मधल्या प्रोफेसर आहेत.तुला विश्वास नसेल तर कॉम्प्युटर लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तू चेक करू शकतेस. बाय द वे,मी त्यांना असे झेलले तर तुला एवढे का वाईट वाटते आहे?” समीर

“ म्हणजे? मी तुझ्यावर खरं खूरं प्रेम…”बोलता बोलता प्रिशा मध्येच थांबली.

प्रिशाने आपले नाते खरंच मान्य केले का? समीर,एक दिलखुलास जगणारा बुलंद पक्षी आणि प्रिशा,एक परफेक्ट प्रोफेसर,सारे काही तोलून मापून करणारी शिस्तबद्ध लेडी.बरं या दोघांत लव्ह झाले तरीही त्यांचा बाँड कायम टिकेल? मध्येच त्या वनिता मॅडमची समीर सोबत असे वागण्याची काय भानगड होती?जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू धिस क्लासिक लव्हस्टोरी..

भाग २० समाप्त..

क्रमशः..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all