जाउबाई-3

अगं अगं आई

हळूहळू केतकीच्याही लक्षात येऊ लागलं..की आम्ही दोघे कुठे जायचं आहे म्हटलो की जाउबाई मुद्दाम खोडी काढत. एके दिवशी केतकीने सकाळी सकाळी जाउबाईंना सांगितलं,

"ताई संध्याकाळी आम्ही यांच्या मित्राच्या लग्नाला जातोय.."

ताई होकार देत, पण संध्याकाळ झाली आणि केदार आला की त्याच्यासमोर मुद्दाम काहीतरी काम काढत,

"आई गं, कधीचा पाय दुखतोय माझा..डॉक्टर कडे जावं म्हटलं तर सवड मिळत नाही.."

"वहिनी काय झालं? चल लगेच जाऊन येऊ.."

तेवढ्यात केतकी म्हणाली,

"पण आज तर आपल्याला लग्नाला जायचं आहे ना?"- केतकी

"अरे देवा, माझ्या लक्षातच नव्हतं...सॉरी हा, जाऊन या तुम्ही.."- जाउबाई

"असं कसं वहिनी? तू मला आधी का नाही सांगितलंस? आता मी काही ऐकणार नाही.. लगेच तयारी कर आणि चल.."- केदार

"तू काही ऐकणार नाहीस, बरं चल.."

एक एकदा नव्हे अनेकदा झालं. केतकीला कुणाला सांगायचीही हिम्मत नव्हती. पण सासरेबुवांच्या मात्र ही गोष्ट समजू लागलेली. त्यांनी एक दोन वेळा केतकीला सांगितलं,

"बाळा मला कळतंय सगळं, पण आता घराचा आधार तीच आहे त्यामुळे तिला दुखावलं तर सगळं घर कोसळेल.."

सासऱ्यांचं म्हणणं केतकीला पटलं..सगळे दिवस सारखे नसतात या म्हणीवर विश्वास ठेवून ती राहू लागली.

एके दिवशी घरी जाउबाईंच्या आई घरी आल्या राहायला. चांगला आठ दिवस मुक्काम होता त्यांचा. जाउबाईंच्या आई केतकीला चांगल्या वाटायच्या. कारण एकमेव त्याच होत्या ज्या जाउबाईंना सूनवु शकत होत्या. हे काम त्यांच्या सासूबाईंना कधी जमायचं नाही.

आईला येऊन चार दिवस झाले, आई जाउबाईंचे सगळे वागणे निरखत होत्या. त्यांना बऱ्याच गोष्टी खटकायच्या, आणि त्या लगेच तिथल्या तिथे जाउबाईंना सरळ करायच्या. त्यामुळे जाउबाईंना आपली आई कधी एकदाची जाते असं झालं.



🎭 Series Post

View all