जाउबाई-5 अंतिम

आई जोरात, जाउबाई कोमात

आईने जेव्हा जाउबाईंकडून फोन घेतला आणि त्या केदारशी बोलल्या, त्यानंतर कट करायचं त्या विसरल्या, आणि केदारने सगळं बोलणं ऐकलं..

त्याच्या वहिनीबद्दलचा आदर एका क्षणात भस्म झाला. ज्या वहिनीला आपण आपली सख्खी बहीण मानली, जिला आपण डोक्यावर घेऊन नाचलो..तिने असं वागावं??

केतकीला निरोप द्यायला तो तिच्याजवळ गेला..

"अहो कशाला घरच्यांना त्रास देताय? मी ठीक आहे, आणि आजूबाजूला इतक्या सिस्टर्स आहेत...काही लागलं तर सांगेन मी त्यांना... तुमची मिटिंग आहे...तुम्ही जा बरं लवकर...आणि वहिनींना म्हणा माझी काळजी करू नका... त्या बिचाऱ्या डबा बनवत असतील माझ्यासाठी.. त्यांना सांगा जास्त दमू नका, दिला नाहीत तरी चालेल, मला अजिबात भूक नाही.."

केदारच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनीसाठी केतकीला- स्वतःच्या बायकोला दुय्यम स्थान देत आलो,

स्वतःच्या बायकोचा विचार सोडून वहिनीला पुढेपुढे करत राहिलो,

केतकी मला सांगायची सगळं पण मी तीचंच तोंड बंद करत आलो,

वहिनीला फक्त तिचं वर्चस्व गाजवायचं होतं आणि माझ्यासाठी ती कशी प्रथम आहे हेच दाखवायचं होतं...

चुकलो मी,

साफ चुकलो..

पण यापुढे नाही,

आत्ता मला समजलंय,

नाती कोणतीही असली आणि कितीही घट्ट असली तरी नवरा बायकोच एकमेकांना पुरतात...इतर कुणीही नाही.. आपल्या जीवनात प्रथम स्थान हे बायकोचं हवं,आईचं हवं आणि मग इतरांचं...

केतकी पूर्णपणे बरी होऊन घरी आली. आल्यावर सर्वांसमोर जाउबाईंनी तिला म्हटले,

"फार जीव तुटत होता गं माझा, पण काय करू, माझाही नाईलाज होता.."

यावेळी केदारला वहिनीच्या डोळ्यातला खोटेपणा स्पष्ट दिसून आला. केदारच्या वागण्यातील बदल वहिनीला जाणवू लागलेला. वहिनी अजूनच आगाउपणे वागू लागली...

रुटीन चेकप साठी केदार केतकीला घेऊन निघाला,

नेहमीप्रमाणे जाउबाईंनी खडा टाकला,

"अरे तुम्ही तिकडे जाताय का?"

"हो..."

नेहमी "का? तुला काही काम आहे का?"

असं विचारणारा केदार आज नुसता हो म्हणाला,

"मला मेडिकलमधून अर्जंट एक डोकेदुखीची गोळी हवी होती, पण जाऊद्या आता.."

"हो जाऊद्या...नाहीतर एक काम करा, दादाला फोन करून सांगून द्या..."

जाउबाई एकदम शॉक झाल्या,

राग, आश्चर्य, संताप, द्वेष सगळ्या भावना एकाचवेळी उचंबळून आल्या, शेजारी असलेल्या सासरेबुवांना हसू आलं पण वेळीच त्यांनी ते दाबलं...

केतकीलाही हा सुखद धक्काच होता..

"तसं नाही केदार, म्हणजे तू जायच्या आधी मला पटकन आणून देऊ शकतोस ना मेडिकलमधून??"

"सॉरी वहिनी, आम्हाला खूप उशीर होतोय, चल केतकी..."

दिराचं असं वागणं बघुन जाउबाई चवताळून उठल्या. इतके दिवस आपल्या इशाऱ्यावर नाचणारा दिर आज क्षणात बायकोचा झाला...

तिने आकांडतांडव केलं, समोर सासू, सासरे, तिचा नवरा बसले।होते...जाउबाई फरशीवर बसल्या आणि रडू लागल्या,

"पाहिलं? माझ्या मुलासारखं सांभाळलं मी याला आणि आज बायको आली तर हे दिवस दाखवले याने? काय काय नाही केलं मी याच्यासाठी.."

"रडू नको, शांत हो.."

सर्वजण सांत्वन म्हणून बोलायचं म्हणून बोलत होते..ती तिच्या खोलीत रडतच गेली,

खोलीत तिची आई होती, आईने जिन्यात उभं राहून सगळं ऐकलं होतं... आई आज निघणार होती...आईने खाडकन मुलीच्या कानाखाली ओढली..

"आई???"

"काय तोफांड चाललंय तुझं? इतके दिवस केलं, इतके दिवस केलं...काय केलं गं तू? उलट तुझंच करत आलाय तुझा दिर..आणि त्याचं लग्न झाल्यावर त्याचं आणि त्याच्या बायकोचे संबंध चांगले राहावे यासाठी प्रयत्न करायचे सोडून तुझा भलताच खेळ चाललाय... इतक्या दिवसापासून पाहतेय मी...लग्न झाल्यावर कोणत्या नात्यात किती अंतर ठेवायचं कळत नाही का तुला???"

जाउबाई एकदम गार पडल्या, त्यांनी बसून घेतलं..

"येते मी...आणि पुन्हा असं काही वागताना दिसलीस तर याद राख.."

जाउबाईंच्या आई हॉल मध्ये बॅग घेऊन आल्या, सर्वांकडे एक नजर फिरवली..

"जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही केलं यासाठी नजरेतूनच सर्वजण त्यांचे आभार मानत होते.."

समाप्त

🎭 Series Post

View all