जाउबाई-2

काय हे जाउबाई

मोठ्या जावेला माहेरचीही जास्त ओढ नव्हती, कशी वाटणार? इथे तिच्या इशाऱ्यावर सगळं घर चालत होतं. माहेरी तसं नव्हतं, घरात मोठा भाऊ आणि त्याची बायको. तिची आई वाहिनीचं काही चालू देत नसे. फक्त वहिनीच नाही तर स्वतःची मुलगी आली तरी घरात शिस्त असायची. दोघींनाही सारखीच शिस्त. असं आईच्या म्हणण्यानुसार सगळं करावं लागायचं.

पण सासरी मात्र मोठया जावेचा आदेश अंतिम असायचा. एखाद्या दिवशी कंटाळा आला तर सरळ पार्सल घेऊन या असा हुकूम असायचा.

केतकी या घरात आली, मोठ्या जाउबाई म्हणजे घरातील अनुभवी व्यक्ती असं समजून त्यांचं अनुकरण केतकी करत असायची. जाउबाई घरात कसे कपडे घालतात, पाहुणे आल्यावर त्यांच्याशी कसे बोलतात, स्वयंपाक कसा करतात, घराची आवरनिवर कशी करतात या गोष्टी केतकी शिकत होती.

थोरल्या जाउबाईंना तेही खटकायला लागलं, ही आपली जागा घेते की काय अशी भीती त्यांना वाटू लागली...

नवीन नवीन लग्न झालेलं, साहजिकच दिर आपल्या बायकोच्या मागेपुढे करणार, तिला काय हवं नको बघणार. जाउबाई मात्र ही गोष्ट समजून घ्यायला तयारच नव्हत्या, त्यांना कित्येक वर्षाची सवय होती की सगळं घर आणि दिर आपल्या मागेपुढे करण्याची. केतकी आली आणि सगळं बदलून गेलं. सासूबाई बऱ्याचदा केतकीला हाक देत, तिच्याशी गप्पा मारत, सासरे आता तिलाही विचारू लागले की बाहेरून काही आणायचं आहे का, नवराही तिला बऱ्याच ठिकाणी मदत करे. हा बदल जाउबाईंना सहन होत नव्हता.

त्यांच्या ठायी हेच पक्कं झालेलं की मीच या घरची मालकीण आहे आणि माझ्या तालावर सर्वांनी नाचावं. मग त्या केतकीला सांगत असत,

"तुझा नवरा... माझा एकही शब्द खाली पडू देत नाही..एकदा मी आजारी होते, माझी सर्वात जास्त काळजी त्यानेच घेतलेली. एकवेळ माझा नवरा माझं ऐकणार नाही पण तुझा नवरा...विचारूच नको.."

सुरवातीला केतकीला या गोष्टीचं काही वाटायचं नाही. पण हळूहळू तिच्याही लक्षात आलं, तिचा नवरा तिला दुय्यम स्थान देत होता. वहिनी जे करेल तेच बरोबर असा सूर असायचा. वहिनीबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायला तो तयार नसे.

लग्नानंतर बायको ही नवऱ्याची आणि नवरा हा बायकोचा पहिला अधिकार असतो. त्यानंतर बाकीचे. पण केतकीला कायम दुय्यम स्थान मिळत होतं.

एखादी गोष्ट केतकीने सांगितली तर तिचा नवरा तिला उडवून लावे, पण तीच गोष्ट वहिनीने सांगितली तर मात्र डोळे झाकून विश्वास ठेवायचा. मोठ्या जाउबाई याच गोष्टीचा फायदा घेत.

केतकीसमोर मुद्दाम तिच्या नवऱ्याला कामं सांगे,

"केदार हे बघ साड्यांचं प्रदर्शन लागलंय, किती सुंदर साड्या आहेत.."

"वहिनी जायचं का? चल तुला सोडतो लगेच.."

"अरे नको, आज तुम्हाला जेवायला बाहेर जायचं आहे ना.."

"नंतर जाऊ आम्ही, त्यात काय एवढं.."

हा निर्णय दिराने केतकीला न विचारताच घेतला, केतकीला फार वाईट वाटलं...

🎭 Series Post

View all