जिद्द. भाग 1 ( उडण्याचे बळ )

About Ambitions

"आजी, हा घे पेढा. मी 12 वी पास झाले. आता मी दुसऱ्या गावाला शिकायला जाणार."

गौरी आनंदाने आजीला पेढा देत म्हणाली.

"सुखी रहा .." पाया पडत असलेल्या गौरीला जवळ घेत आजीने आशीर्वाद दिला व प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत कौतुक केले.

गौरी पास झाल्याचा आजीलाही आनंद झाला होता; पण पुढच्या शिक्षणासाठी गौरी दुसऱ्या गावी जायचे म्हणते आहे,हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजीही उमटली.

गौरीचे आईबाबा तर खूप खूश होते आणि पुढील शिक्षणासाठी तिला दुसऱ्या गावी पाठवण्यासाठी तयारही होते.

"गौरी म्हणाली ते खरे आहे का? ती शिकायला दुसऱ्या गावात जाणार आहे.आणि तुम्ही पाठवणार आहेत का तिला?"

गौरीच्या आजीने गौरीच्या बाबांना थोड्या रागातच विचारले.

"हो आई, तू जे ऐकले ते खरे आहे." गौरीच्या बाबांनी शांतपणे उत्तर दिले.

"मी काय म्हणते...आपल्याच गावात राहून पुढचे शिक्षण नाही घेता येणार का? आपल्या गावात पण शाळा आहे,कॉलेज आहे. मग दुसरीकडे कशाला पाठवायचे ?"

आजींनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवली.

"आई,तुझे म्हणणे बरोबर आहे;पण गौरीला इंजिनिअर व्हायचे आहे.आणि आपल्या गावात इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. तिला त्यासाठी दुसऱ्या गावीच जावे लागणार आहे."

बाबा स्पष्टीकरण देत म्हणाले.

"मगं जे आपल्या गावात आहे तेचं शिक म्हणावं..गावातच शिकली म्हणजे इथे घरीच आपल्या सोबत राहील.शिक्षणाबरोबर घरची कामेही शिकेल ती. आता बाहेरगावी गेली म्हणजे आपले लक्ष राहील का मुलीवर?"

आजी काहीश्या नाराजीच्या स्वरातच म्हणाली.

"आई तिची इच्छा आहे ना इंजीनिअर व्हायची..मगं आपण करू ना तिची इच्छा पूर्ण. बाहेरगावी म्हणजे खूप दूर नाही जाणार आहे ती. आपल्या गावापासून थोड्याच अंतरावर तर आहे तिचे कॉलेज आणि तिच्या बाकीच्या मैत्रीणीही आहेत तिला सोबत.

आई, आपल्या मुलीवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे ना? गौरी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. याची मला खात्री आहे."

बाबा आजीला समजावत म्हणाले.

"बघा बाबा तुम्ही.. मी आपली काळजीपोटी म्हणाली.उद्या काही बरंवाईट ऐकायला मिळालं नको...म्हणजे बसं! मगं तेव्हा म्हणू नका..'आई, तू म्हणतं होती तेचं बरोबर होतं..आमचचं चुकलं' असं."

आजी आपल्या म्हणण्यावर ठाम राहत म्हणाल्या.

"नाही गं आई, तू जास्त काळजी नको करूस,तसे काही होणार नाही."

बाबांनी एवढे बोलून विषय थांबवला.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all