जिद्द. भाग 2

About Ambitions

"आजी, मला आशीर्वाद दे." गौरी आजीच्या पाया पडत म्हणाली.

"यशस्वी हो बेटा,काळजी घे स्वतः ची आणि सांभाळून रहा."

आजी गौरीला आशीर्वाद देत म्हणाल्या.

गौरीची आईही गौरीला अनेक सूचना देत होती आणि रडतही होती.

"आई,मी काय सासरी चालली आहे का? तू रडशील तर मगं मलाही रडू येईल आणि माझी जाण्याची इच्छा होणार नाही."

गौरी आपल्या डोळ्यातील अश्रूंना आवरत म्हणाली.

"अगं,तू पहिल्यांदा अशी घर सोडून दुसरीकडे राहणार आहे परक्या ठिकाणी आणि आईला काळजी वाटतेच ना आपल्या मुलांची.म्हणून रडू येते आहे.काळजी घे,तब्येतीला जप ,फोन करत जा."

गौरीची आई तिला मिठीत घेत म्हणाली.

आजीचा,आईचा व आपल्या लहान भावाचा निरोप घेत गौरी बाबांबरोबर घरातून बाहेर पडली. आपले ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने..

गौरीला होस्टेलला सोडून बाबा घरी आले. येतांना त्यांचेही डोळे आणि मन भरून आले होते.
गौरीशिवाय घरात कोणालाच करमत नव्हते.

गौरीला बाहेरगावी पाठवण्याची आजीची मुळीच इच्छा नव्हती ; पण गौरीचे आईबाबा आपल्या मतावर ठाम होते.आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करायची.असे त्यांनी ठरवलेच होते आणि त्याप्रमाणे वागतही होते.सुरूवातीला आजीची बडबड सुरू असायची;पण नंतर थोडी शांत होत गेली.तरी अधूनमधून गावातील किंवा इकडच्या तिकडच्या काही गोष्टी ऐकल्या की,बोलायची..
"याच्या मुलीने असे केले,त्याच्या मुलीने तसेच केले.मुली तर तशाच पण आईवडीलही लक्ष ठेवत नाही आपल्या मुलींवर?"

अशा गोष्टी गौरीच्या आईबाबांनाही कळत होत्या.ऐकून वाईटही वाटत होते.

'आपल्या मुलांवर आईवडिलांचा विश्वास असतो. त्यांना अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य ही दिलेले असते.तेव्हा मुलांनीही त्याचा गैरफायदा घेऊ नये. अशा काही चुका करू नये ; ज्यामुळे त्यांना स्वतःलाही त्रास होईल व आईवडिलानांही त्रास होईल.'

असा विचार मनात येऊन त्यांना गौरीची जास्तच काळजी वाटू लागायची.
गौरी अगोदरच तब्येतीने नाजूक आणि होस्टेलचे जेवण यामुळे ती सारखी आजारी पडायची.तिच्या तब्येतीची काळजी करत तिचे आईवडील तिला
बऱ्याचदा भेटायला जायचे आणि एकदोन दिवसाची जरी सुट्टी मिळाली तरी घरी बोलवायचे.
'ड्रायफ्रुट्स खात जा, फळे खात जा.चांगले जेवण करत जा,तब्येतीची काळजी घेत जा.'

अशा सूचना फोनवरही असायच्या आणि भेटल्यावरही दिल्या जायच्या.

गौरी तब्येतीने नाजूक होती;पण मनाने खंबीर होती.'मला इंजीनिअर व्हायचे'ही जिद्द तिच्या मनात होती.त्यामुळे ती कॉलेज,अभ्यास हे सर्व मन लावून करत होती. आणि तिला यशही मिळत होते.
तब्येतीच्या तक्रारी सहन करत पण मनाने खंबीर राहून गौरीने आपली इंजिनिअर होण्याची जिद्द पूर्ण केली.गौरी इंजिनिअर झाली. याचा गौरीइतकाच किंवा त्याहून जास्त आनंद तिच्या आईबाबांना झाला होता.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all