जिद्द अंतिम भाग

About Ambitions

" गौरीच्या लग्नाच बघा जरा. तिच्या मनासारखं शिक्षण वगैरे झालं ना आता?"
आजींनी गौरीच्या आईबाबांना कडक शब्दांत सुनावले.

"हो आई, बघतो बरं." बाबांनी शांत स्वरात आजीला सांगितले.

शिक्षण पूर्ण होताच गौरीला चांगली नोकरी मिळाली होती.अजून तरी काही वर्षे लग्नाचा विचार त्यांनी केला नव्हता. गौरी आपल्या नोकरीचा आनंद घेत होती.मन लावून काम करत होती.आपल्या पहिल्या पगारातून घरातल्या सर्वांसाठी काही ना काही आणले होते.आजीलाही छान नऊवारी साडी आणली होती.आजीलाही ती आवडली होती,हे आजीच्या चेहऱ्यावरून समजत होते.
आपली मुलगी कमावती झाली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. याचा आनंद गौरीच्या आईवडिलांच्या डोळ्यात दिसत होता.

"बाबा,माझी इंजिनिअर होण्याची व नोकरी करण्याची इच्छा तुम्ही पूर्ण केली.आता अजून एक इच्छा पूर्ण करा ना.. मला M.S. करायचे आणि तेही अमेरिकेत जाऊन."

गौरीचे हे बोलणे ऐकताच तिचे बाबा लगेच काही बोलले नाही.

काय बोलावे? हे न सूचल्याने ते शांतच राहिले.

अमेरीकेत जाऊन शिक्षण घेण्याचा गौरीचा विचार,तिची इच्छा ऐकून आजीने विरोध केलाच ;पण तिच्या आईचीही इच्छा दिसली नाही.

'गौरी तब्येतीने नाजूक आणि एवढ्या दूर पाठवायचे.'
या विचाराने तिची आई तयार नव्हती.

वडिलांची द्विधा मनस्थिती होती.

गौरीच्या काळजीपोटी एवढ्या दूर पाठवू नये. असा एक विचार मनात होता.
तर दुसरीकडे आपली गौरी हुशार आहे,मेहनती आहे,जिद्दी आहे. आतापर्यंत तिने सर्व चांगले केलेच आहे..यापुढेही चांगलेच करेल.
हाही एक विचार मनात सुरू होता.

खूप विचार केल्यानंतर त्यांनी गौरीला अमेरिकेत जाण्याची परवानगी दिली.

गौरीने अगोदरच सर्व माहिती काढली होती. आणि त्यानुसार सर्व तिने तयारीही केली होती.
घरात आजीबरोबर आता आईचीही कुरकुर सुरु असायची.पण बाबा व लेक तिकडे दुर्लक्ष करत आपआपले काम करत होते.

दोन दिवसांनी गौरीची फ्लाईट होती आणि ती घरात चक्कर येऊन पडली.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. सर्व तपासण्या केल्या.
डॉक्टरांनी 4,5दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहण्यास सांगितले.
गंभीर असे काही नव्हते. पण तिची नाजूक तब्येत बघता आणि अचानक आलेली चक्कर यामुळे डॉक्टरांनी थोडी काळजी घेण्यास सांगितले.

"आता देवाचीही इच्छा दिसत नाही की, गौरी अमेरिकेला जावी.म्हणून तर असे झाले"

आजी आपल्या स्वभावानुसार बोलून गेली.

गौरीच्या आईलाही असेच वाटू लागले.

पण गौरी जिद्दी होती. आपण ठरलेल्या दिवशी गेलो नाही. याचे तिला वाईट वाटले. पण हॉस्पिटलमधून घरी येताच एक दोन दिवस आराम करून तिने इमर्जन्सी मध्ये फ्लाईट चे तिकडे काढले.डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि त्यांनी सांगितलेले सर्व लक्षात घेऊन काळजी घेण्याचे ठरवले.

'आपले ऍडमिशन वगैरे सर्व झाले आहे आणि आपण नाही गेलो तर पुन्हा संधी कधी मिळेल? आपले हे स्वप्न कधी पूर्ण होईल?'

या विचाराने जिद्दी गौरीने जाण्याचे ठरवलेच व ती अमेरिकेला गेलीही.

दोन वर्षांत तिने आपले M.S. पूर्ण केलेही आणि तिथेच नोकरी करू लागली.

गौरीत जिद्द होती आणि तिच्यात उंच उडण्याचे बळही होते म्हणून ती तिचे स्वप्न पूर्ण करू शकली.
तिच्या आईवडिलानींही तिला तिची इच्छा, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मदत केली.तिच्या पंखांना उडण्याची ताकत दिली,बळ दिले आणि म्हणून गौरी तिच्या यशाच्या उत्तुंग आकाशात गरूड भरारी घेऊ शकली.

"आता गौरी घरी आली की,पहिले तिचे लग्न करा.."

आजीच्या या बोलण्यावर गौरीचे आईबाबा आता गांभीर्याने विचार करू लागले.

आणि
गौरीला नवरीच्या रूपात पाहून आजी समाधान झाली.

समाप्त

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all