कळण्याची भाकरी Recipe In Marathi

कळण्याची पौष्टिक भाकरी
कळण्याची पौष्टिक भाकरी

    


माझ आजोळ जळगाव, म्हणजे खांदेश. तिकडे आम्ही मे महिन्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो. उन्हाळा खुप असायचा तिकडे पण मामींच्या हातचे छान छान पदार्थ खायला खुप आवडायच.
          
भाजीला काही नसले की त्या नेहेमी कळण्याची गरमागरम भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी करायच्या. अप्रतिम चव लागायची त्याची. त्या भाकरीच्या पिठात सगळ्या डाळी मिक्स असायच्या त्यामुळे खायला चविष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे पोट भरायचे छान. आज मी तुमच्या सोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे. साधी सोप्पी आहे अगदी.

साहित्य : एक किलो ज्वारी, अर्धा किलो आख्खे काळे उडिद, एक छोटी वाटी हरबरा डाळ, एक छोटी वाटी मुगाची डाळ, एक ओंजळभर खडा मिठ, एक छोटी वाटी गहू, दोन छोटे चमचे आख्खी मेथी दाणे. हे सर्व साहित्य एकत्र करुन गिरणीतुन दळून आणने.

कृती : १) ह्या पिठात उडीद असल्यामुळे पिठ थोडे चिकट असते.

२) पिठ चांगले मळून घेणे जसे आपण नेहेमी मळतो तसेच.

३) मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.

४) ह्या भाकरी थापून नाही तर लाटून करतात. तुम्हाला हव्या तशा करू शकता.

५) पिठाचा गोळा घेऊन भाकरी लाटून घेणे.

६) जास्त पातळ नाही आणि जास्त जाड ही नाही मध्यम लाटून घेतली की तव्यावर नेहेमीप्रमाणे आपण पाणी लाऊन भाकरी भाजतो आणि एक साईड डायरेक्ट गॅसवर उलटी करुन भाजतो तशीच ही भाकरी भाजायची. छान टम्म फुगते हि भाकरी. आपली गरमागरम भाकरी तयार आहे.

७) आता आपण चटणीची तयारी करुया.


साहित्य : एक वाटी शेंगदाणे, दोन तीन हिरव्या मिरच्या, लसून सात आठ पाकळ्या, मीठ चवीनुसार आणि दोन पळी तेल.


कृती : १) शेंगदाणे तव्यावर खरपुस भाजून घेणे.

२) मिरच्या सुद्धा छान भाजून घ्यायच्या.

३) आता मिक्सरमध्ये शेंगदाणे मिरच्या लसूण आणि मीठ घालून त्यात थोडे पाणी घालून छान बारीक करुन घेणे.

४) आता तुम्हांला हवे असल्यास आणखी पाणी घालू शकता पण ही चटणी जरा घट्टसरच छान लागते.

५) आता एका वाटीत ही चटणी काढून त्यावर गरमागरम कढत तेल घालणे.

६) छान चर्रर्रर्र असा आवाज येतो तेल ओतताना. आता ही चटणी तयार आहे.
    

कळण्याच्या भाकरीच्या मधोमध चटणी घालून त्यासोबतच पातीचा कांदा आणि तळलेली मिरची. वाह! मस्त जेवण होत एकदम पोटभर. तुम्ही सुध्दा करुन बघा ही पौष्टिक कळण्याची भाकरी.


किचन तुमचे आणि रेसिपी माझी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा आणि कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.


🎭 Series Post

View all