पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१४८

कृष्ण सखी
कृष्ण सखी-१४८

तो त्याच्याच दुःखात होता की खांद्यावर स्पर्श झाला आणि त्याने शेजारी पाहिलं. त्या दुःखाच्या प्रसंगी सखीला पाहून.. ’त्याच्या सखीला’ पाहून तिला घट्ट मिठी मारून तिच्या कुशीत रडावं असं वाटत असतानाच… क्षणातच मघासचे तिचे कडवे बोल डोक्यात घुमले आणि त्याने रागातच आपल्या खांद्यावरचा तिचा हात झिडकारला.


त्याच्या अशा वागण्याने क्षणभर सखीच दचकली. पुन्हा स्वतःला सावरत ती हळू आवाजात दुःखाने बोलली,
“क्रिष्ण् ऽ, रागावला माझ्यावर?”


कृष्णा डोळ्यांत पाणी घेऊनच सगळ्या भावनांसोबत नजर रोखून बोलला,
“मालकीण आहात ना घरच्या? मालकीणीवर कोण रागावतं काय?”


त्याच्या अश्रूंची झळ तिच्या डोळ्यांना ही लागली आणि त्याच्या तिखट बोलण्याने तिचे डोळे टचकन भरले.

सखी हळू आवाजात बोलली,
“तुम्हाला दुखवायचं नव्हतं हो .. खरंच!”


कृष्णाने तिच्याकडे रागाने पाहिलं. त्याच्या आत मध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या भावनांच्या वाफांचा जसा भडका उडालेला. तिच्याकडे पाहतानाही रागाने, दुःखाने त्याचे डोळे पुन्हा भरले आणि तिला बोट दाखवत तो संतापात बोलला,
“गप्पच बसा काय!”


किती रागावलेला तो!


त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या डोळ्यांतील अश्रू खूप काही बोलून गेले.

त्याचा राग, त्याचं दुःख, त्याच्या वेदना सगळं जसं की तिच्याकडे झेपावत होतं. त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याच्या मानेसोबत त्याची नजर ही गर्रकन वळली आणि मघासच्या सारखाच तो शून्यात बघू लागला.

“क्रिष्ण् ऽ….” ती ओठांत पुटपुटली.

एरवी तिने असा आवाज देताच पुढच्या क्षणी त्याच्या तोंडातून ‘काय’ निघावं पण आज जणू तो बधिर झालेला. वेदनेने वेडापिसा झालेला.

त्याच्या खांद्यावर पुन्हा हात ठेवत सखी हळू आवाजात बोलली,
“क्रिष्ण् … खरंच साॅरी.”


तिचा आपल्या खांद्यावरचा हात पुन्हा झिडकारत तो तिच्याकडे पाहून रागावला,
“साॅरी बिरीची आपल्याकडं तसली भानगड नसते.”

त्याचं असं तिला झिडकारणं हे त्याच्या शब्दांपेक्षा जास्त तिला लागणारं होतं. डोळे भरून आल्याने ती ओठांत पुटपुटली,
“कृष्णा ऽ ऽ… “


तिचं कृष्णा ऐकून तो तिच्याकडे पाहून काहीसा रागातच बोलला,
“तोच तुमचा खरा सखा आहे, मी कोणी नाही.”


किती परक्यासारखं त्याचं बोलणं!

सखी रडवेली होत बोलली,
“असं काय बोलताय क्रिष्ण्.. तुम्हीच तर माझे एकमेव सखा आहात.”


तिच्या मघासच्या बोलण्याने दुखावलेला कृष्णा भांडल्यासारखा बोलला,
“हो काय? म्हणून मघाशी माझा उद्धार केला काय? म्हणून मला समजून घेतलं काय?”


आपल्यामुळे तो किती दुखावला याचं सखीला खूप खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यांतील पाणी ही गालावर धावलं. सखी कान पकडून रडवेली होत बोलली,
“खरंच साॅरी.. त्या कृष्णाला माहितीये मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं.”


कृष्णाने पुन्हा तिच्याकडे रागाने पाहिलं,
“तुम्ही इतक्या सुद्धा लहान नाहीत काय.. की शब्दांचे अर्थ कळू नयेत.”


सखी तशीच कान पकडून रडवेली होत बोलली,
“दहा वर्षांनी एका मुलीला तिच्या माहेरी बोलवलं यात चुकलं काय क्रिष्ण्? दहा वर्षांनी एका आईची आणि मुलीची भेट घडवली यात चुकलं काय?
एकाच्या रागासाठी सगळ्यांना वेठीस धरायचं.. हे बरोबर आहे का क्रिष्ण्?”


कृष्णा तिच्याकडे पाहत दुःखाने बोलला,
“तो एक कोणाचा कोणीच लागत नाही काय? त्याला असे सगळे वाळीत टाकणार काय?”


“क्रिष्ण्… का असं बोलताय? मघापासून किती तोडून बोलताय तुम्ही?” सखी तशीच रडवेली होत बोलली.


तिच्या शब्दांच्या व्रणांनी दुखावलेला कृष्णा तिच्यावर हक्काने रागावला,
“मी तोडून बोलतो काय मग बाहेर तुम्ही बोलला ते काय होतं? तुम्ही मला जसं तोडून बोलला तसं तुमच्या सख्याला बोलला काय कधी? नाही ना? कारण तोच तुमचा लाडका सखा आहे.”


तो रागात स्वतःची तुलना कृष्णाशी करत होता पण सखीसाठी हा कृष्णा आणि तो कृष्णा आता दोघेही सारखेच तर झालेले.


सखी रडवेली होत बोलली,
“साॅरी…. माझे शब्द चुकले. मी इतकं कठोर बोलायला नको पाहिजे होतं. मी बोलले ना माझं चुकलं.. अजून दहा वेळा बोलू का?”


तो पुन्हा रागातच डोळ्यांतील पाणी पुसण्याचे कष्ट न घेता खिडकीच्या बाहेर पाहू लागला. आरतीच्या विरहाचं दुःख त्याने एकट्याने पचवलं याची तिला कल्पना होती. ना तो सोनाई जवळ व्यक्त झाला.. ना नाना जवळ! इतकं मोठं दुःख त्याने मनात कसं साठवलं! एरवी तिच्यासोबतही मनमोकळेपणाने बोलणारा कृष्णा त्या क्षणांबद्दल तिच्याजवळ ही अवाक्षर बोलला नव्हता.‌


दुःखाने भरलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिला एका गोष्टीवर विश्वास बसला,
‘पुरुषांचे मन म्हणजे चावी नसलेलं कुलूप' हे अगदीच खरं!

त्याला बोलता करण्यासाठी, कुठून तरी निचऱ्याला सुरुवात करण्यासाठी सखी मुद्दामून बोलली,
“तुम्ही मला बोलताय पण तुम्ही तरी मला तुमची सखी कुठं मानता?”


एकदा आपलं मानलं की मानलं बस्स!
हा त्याचा स्वभावच.

तिने त्याच्या मैत्रीवर बोट ठेवलेलं पाहून तो लगेच रागात बोलला,
“तुम्ही माझ्या एकमेव सखी आहात… कळलं काय?”


सखी त्याच्याकडे बघत दुःखाने बोलली,
“सखी असते तर तुम्ही तुमच्या दुःखाची सल मला बोलून दाखवली असती.”


आधीच भावनांची सरमिसळ झाल्याने त्याला ते सगळं सहन होत नव्हतं त्यात सखीचे हे लागणारे आरोप पाहून तो जास्तच भडकला आणि दुःख ओठांतून बाहेर आलं.

तो घोगऱ्या आवाजात वेदनेने बोलला,
“कोणी नाही समजून घेत.. ती गेली म्हणजे तिला विसर आणि आयुष्यात पुढे जा.. एवढंच पालुपद माझ्या मागे लावलं पण….. पण….”


कृष्णा आवंढा गिळत वेदनेने बोलला,
“तिला विसरणं मला खरंच शक्य आहे का सखी? तिच्यासोबत आयुष्यभराची स्वप्ने पाहिलेली मी.. माझ्याही काही भावना असतील.. हे कोणी समजूनच घेतलं नाही. आईने नाही, नानाने नाही.. त्यांचं फक्त एकच- ‘तिला विसर.. तिला विसर’….
अरे कस विसरू? पुरुष इतके पाषाण हृदयी नसतात सखी… जितके तुम्हाला वाटतात.”


किती दुःख होतं त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये!

सखीचे डोळे त्याच्या प्रत्येक शब्दासोबत नव्याने भरत होते. त्याच्या प्रत्येक शब्दातील वेदना तिच्या काळजाला स्पर्श करत होती. प्रेमभावना उमजू लागलेल्या तिच्या मनाला त्याच्या प्रेमभंगी हृदयाच्या वेदना पुरेपूर समजत होत्या.


सखी त्याचा वेदनेने भरलेला आणि दुःखाने होरपळलेला चेहरा आपल्या नाजूक ओंजळीत घेऊन ओल्या आवाजात प्रेमाने बोलली,
“कोणी नसेल समजून घेतलं पण मी माझ्या क्रिष्ण् ना नेहमी समजून घेते आणि इथून पुढेही समजून घेईल, खरंच सॉरी! मघाशी भावनेच्या भरात तुम्हाला दुखावलं, त्यासाठी मला खूप वाईट वाटतंय. प्लीज, तुमच्या सखीला एकदा माफ करा. तुमची ही सखी, तुमच्या सुखाचीच नाही तरं तुमच्या दुःखाची सुद्धा तितकीच वाटेकरी आहे क्रिष्ण्.”


तिच्या शब्दांनी त्या वेदनेने होरपळलेल्या मनाला किती दिलासा मिळाला. तो एकटा नाहीये.. त्याची सखी त्याच्यासोबत आहे, ही आस त्याला त्या वेदनेत तडफडताना किती अल्हाददायक वाटली. किती वर्ष हा एकटेपणा, हे विरहाचे दुःख पचवल्यानंतर हे दिलासादायक शब्द त्याच्या कानांवर पडलेले.


आपल्या चेहऱ्यावरच्या तिच्या हातावर हात ठेवून तो भावनेच्या भरात घोगऱ्या आवाजात बोलला,
“इतकी वर्ष कुठे होता तुम्ही सखी? मला तुमची किती गरज होती.”


सखीचे डोळे पुन्हा भरून आले पण बोलण्यासाठी शब्द फुटले नाहीत. ती त्याच्याकडे पाहून वेदनेने हसली.‌


तिच्या स्पर्शात, तिच्या शब्दांत, तिच्या सहवासात तिच्या खरेपणाची, तिच्या आपलेपणाची, तिच्या प्रेमाची जादूच होती की आजवर कोणाच्याही पुढे आपल्या मनाचा तो दुखरा कप्पा उघडा न केलेल्या कृष्णाचे ओठ तिच्यापुढे आता ते ओझ सहन न झाल्याने थरथरले.‌


आपल्या चेहऱ्यावरचे तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडून कृष्णा भिंतीवरच्या आरतीच्या फोटोकडे पाहत पुन्हा सखीच्या सोबतीने त्या दहा वर्षांपूर्वीच्या वेतनादायी प्रसंगात पोहोचला–


तो घोगऱ्या आवाजात बोलला,
“तुम्हाला माहितीये, तेव्हा मला अचानक मुंबईला जावं लागलेलं. पतपेढीचं अर्जंट काम होतं आणि माझ्याशिवाय जाण्यासारखं दुसरं कोणीच नव्हतं. माझी इच्छा नव्हती पण जावं लागणार होतं. मी सकाळी जाणार म्हणून त्या रात्री आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. एरवी गप्पा मारताना नेहमी हसणारी आरू त्या रात्री मात्र शांत होती. मला वाटलं मी जाणार म्हणून ती शांत आहे.. तिला अशा अवस्थेत सोडून जाणार म्हटल्यावर माझा ही जीव अस्वस्थ होता.. तसंच तिचं काही असेल असं माझं मीच मला समजावलेलं.

तिच्या गोल गरगरीत पोटावरून हात फिरवताना मी गमतीने तिला म्हणालो देखील,
‘आरु ऽ, बाळाला लय घाई झालीय वाटतं बाहेर यायची.’

एरवी पटकन काहीतरी बोलणारी आरु त्या दिवशी मात्र आपल्या पोटावरून हात फिरवत माझ्या कुशीत आली. तिचा निरोप घेताना माझा पाय निघत नव्हता. मन प्रचंड अस्वस्थ होतं. तिच्यापासून खूप दूर जातोय या भावनेने मला रडू येत होतं. काळजावर दगड ठेवून मी कसातरी तिला निरोप दिला आणि मुंबईला निघून गेलो.


तिकडे गेल्यावर सुद्धा माझा जीव घरीच घुटमळत होता. घरी तिच्याजवळ तिची काळजी घ्यायला, आई आहे, काशी आहे मला माहिती होतं तरीही मला चैन पडत नव्हतं. दोन दिवसाचं पतपेढीचं काम एका दिवसातच आटोपून दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो.


एका दिवसाच्या विरहाने मला इतका त्रास दिलेला मी तेव्हाच प्रवासात ठरवलेलं, इथून पुढे तिला एक दिवस सुद्धा स्वतःपासून दूर करणार नाही आणि स्वतःही दूर जाणार नाही.


दुपार झालेले घरी पोहोचायला-
मला अचानक समोर पाहून जाताना रडलेला तिचा चेहरा आता आनंदाने हसेल आणि ती अजूनच सुंदर दिसेल.. माझ्या नेहमीच्या विचारांत मी आनंदाने नेहमीसारखा हाका मारतच अंगणातून धावत आलो आणि आनंदाने दरवाजा ढकलला-”


कृष्णा जसं की ते सगळं स्वतः नजरेसमोर पाहत होता. त्या क्षणांमध्ये तो आताही जगत होता. तो सखीचा हात घट्ट आवळून रडता रडता किंचित हसत बोलला,
“दरवाजा उघडल्यावर काशीच्या हातात दुपट्यात गुंडाळलेलं ते बाळ पाहताना मला किती आनंद झाला असेल सखी! मला शब्दात नाही सांगता येणार.

माझं बाळ माझ्या समोर होतं. त्या आनंदाने भारावलेल्या क्षणांमध्ये हातातील बॅग तिथेच पडली. सॅंडेल कसे उतरवले मला ही कळलं नाही. मी आनंदाने हसतच माझ्या बाळा जवळ आलो. बाळुत्यात गुंडळलेलं ते इवलूसं बाळ पाहताना डोळे आनंदाने भरून आलेले.


‘बायकोच्या पहिल्या मिठीने पुरुष शहरातो; तितकाच आपल्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर तो शहारतो सखी.’


माझा अंश माझ्या हातात होता. ‘बापाची छातीही भरून येते’ हा किती विलक्षण अनुभव होता.
काय झालं, मुलगा की मुलगी हे कळेपर्यंतचे ते क्षण म्हणजे अतिशय रोमांचकारी होते. माझा तो अंश.. माझं बाळ हातात घेतल्यावर त्या क्षणांमध्ये स्वर्गसुख म्हणजे हेच असंच मला वाटलं.

आमची कितीतरी स्वप्न माझ्या अशी नजरेसमोरून गेली. काही क्षणांमध्येच मी खूप वर्ष जगलो आणि बाळाला हातात घेऊनच मी अत्यानंदाने खोलीत आलो आणि-”


एवढा वेळ त्याच्या चेहऱ्यावर असणार ते हसू आता मावळलं. त्या हसण्याची जागा पुन्हा दुःखाने घेतली. त्याच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू दाटले. कंठ भरून आला आणि तो सखीकडे पाहून दुःखाने बोलला,
“पलंगावर एखाद्या रोग्यासारख्या पडलेल्या आरुला पाहून मला धक्का बसला. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या हातात बाळ आहे याचही मला भान नव्हतं. तिची अवस्था इतकी वाईट होती सखी.. तिला पाहून असं वाटलं… “


कृष्णा डोळे बंद करत वेदनेने बोलला,
“तिला पाहून असं वाटलं ही माझी आरु नाहीच. तिच्या चेहरा पूर्ण बदललेला. तब्येत खूप खालवलेली. नेहमी बडबड करणारी आरु…. त्यादिवशी एक एक शब्द किती कष्टाने बोलत होती.


आई म्हटली, तिला बाळंतपण जड गेलं, नेमक्याच गोखलेबाई आलेल्या, त्यांनी सांगितलं डिलिव्हरी घरी झाली म्हणून तिच्या जीवावर बेतलं. माझ्यावर जसा की दुःखाचा डोंगरच कोसळलेला. आरु माझ्यासमोर एक एक श्वास मोजून घेत होती तसे माझेही श्वास जड होत होते. माझं नाव ओठांवर असतानाच तिने मान टाकली सखी…..”


कृष्णा आत्ता याक्षणी सुद्धा सखीकडे पाहून रडू लागला. सखी सुद्धा मुसमुसत होती. कृष्णा ते क्षण जगत असताना रडत दुःखाने बोलला,
“एका रात्रीत माझं आयुष्य बदललं आणि आरू आपल्याला सोडून गेली सखी. काय वाटलं असेल मला.. चोवीस वर्षांचा होतो तेव्हा.. जीवापाड प्रेम केलेले तिच्यावर.. तिच्यासोबत हसणं, बोलणं, तिच्यावरच रागावणं.. सगळं सगळं तिच्यासोबत! तिच केंद्रबिंदू होती माझ्या आयुष्याचा आणि तिच सोडून गेलेली.. अशी अचानक….”


कृष्णा दुःखाने हळवा होत बोलला,
“कधी कधी मला माझ्याच प्रेमावर संशय येतो सखी, माझं इतकं प्रेम होतं तिच्यावर तर तिच्यासोबत माझेही श्वास का नाही थांबले?”

“क्रिष्ण्… प्लीज असं नका बोलू.”
सखी रडत पुटपुटली.

“तसंच आहे सखी..”
कृष्णा आजवर मनात ठेवलेला दुःखाचा समुद्र बाहेर काढत रडत बोलला,
“काशीच्या एका चुकीच्या निर्णयाने आरू सोडून गेलेली मला… मी रागाने वेडापिसा झालेलो. तिला मी घराबाहेर काढलं आणि पुन्हा आरुकडे धावत आलो.‌

पलंगावर तिला अशी शांत झोपलेली पाहून मी कोसळलेलो‌. मला विश्वास बसत नव्हता ती अशी कशी मला सोडून जाईल? ती सोडून गेल्यावर मी काय करायचं? मी कसं जगायचं.. ? पण…
पण ती मला सोडून गेली नव्हती सखी—”

कृष्णा वेदनेने हसला,
“ती माझा घेण्यासाठी थांबलेली‌!”


कृष्णाच्या नजरेसमोर तोच प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला-

पलंगावर निपचित पडलेल्या आरतीला पाहून कृष्णा आक्रोश करत होता. रडत होता. बाहेर ओटीवर सोनाई रडत होती.‌ अंगणामध्ये गावातल्या भावकीतल्या बायका जमा झालेल्या. सगळीकडे सुतकी वातावरण होतं. ओली बाळंतीण गेल्याचं दुःख सगळ्यांच्या डोळ्यांतून पाझरत होतं.

जिला तो श्वासाला सुद्धा विसरत नव्हता अशी आरती त्याला सोडून गेल्यामुळे कृष्णा वेड्यासारखा रडत होता. तिचा चेहरा हातात घेऊन तिला हाका मारत होता,
“आरु ऽ… आरु डोळे उघड… तू नाही मला अशी सोडून जाऊ शकत.. आरु..‌.”


सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना अचानक कोसळलेल्या त्या दुःखाच्या डोंगराने आपण सुद्धा इथेच तिच्या शेजारीच कोसळतो की काय असं वाटत असतानाच आरतीने डोळे उघडले तसा कृष्ण रडता रडता हसला,
“आरु……. “

आरती त्याच्याकडे पाहून कशीबशी तोंडाने श्वास घेत होती. तिला पाहताना रडता रडता हसतच कृष्णाने सोनाईला आवाज दिला,
“आई ऽ ऽ ऽ ऽ ऽ …ए ऽ आई ऽ ऽ ऽ.. आरु…
आरु परत आलीये.”


त्याच्याकडे पाहताना आरतीचे डोळे पुन्हा भरून आले. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन कृष्णा तिचे डोळे पुसत हसत बोलला,
“मला माहित होतं.. तू मला अशीच सोडून जाणार नाहीस.. तू थांब मी गोखलेबाईंना घेऊन येतो.” कृष्णा आनंदाने हसत बोलला आणि वेगाने बाहेर जाणार एवढ्यात-

“किस्सू ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ..”
अस्फुट स्वर खोलीत घुमला.


उभ्या आयुष्यात ही हाक आता कधी ऐकायलाच येणार नाही, हा दुखरा विचार काही क्षणांपूर्वीच त्याच्या मनात घर करून बसलेला, पण ती हाक ऐकू येताच तो पुन्हा वेगाने तिच्याजवळ आला आणि तिचे डोळे पुसत रडवेला होत बोलला,
“जाऊ दे ना मला… मी लगेच गोखलेबाईंना घेऊन येतो.”


आरतीने मोठे श्वास घेत त्याच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. तिचं तोंडाने श्वास घेणं पाहून कृष्णाच्या डोळ्यांत पुन्हा वेदना दाटली. तिचे ते पांढरे कोरडे ओठ, सुकलेला चेहरा, खालावलेले डोळे.. एका रात्रीत तिच्या चेहऱ्याची झालेली दशा पाहून आधीच ढासळलेला तो.. पुन्हा रडू लागला.

तिचे ओठ हलले तसं तिच्या ओठांजवळ त्याने कान नेला आणि हवे सोबत एक एक शब्द त्याच्या कानावर पडला,
“किस्सू ऽ ऽ ऽ ऽ….. मला…. मला मिठीत…. मिठीत घे.”


कृष्णाने आपले डोळे पुसले आणि सावकाश..
अगदी सावकाश तिला आपल्या मिठीत घेतलं. तिच्या शरीरात काही राहीलच नव्हतं. सगळा भार त्याच्या खांद्यावर टाकून ती जणू काही त्याच्या अंगावर पडलेली. तिला दोन्ही हातांनी सावरून कृष्णा डोळे वाहत दुःखाने तिला विनंती करत बोलला,
“आरु…. तुला दवाखान्यात नेऊ शकत नाही काय.. पण कमीत कमी डॉक्टरांना तरी घेऊन येऊ दे मला.”


तिच्या तोंडातून हवे सोबत एकच शब्द आला,
“नको ऽ ऽ ऽ ऽ…”

आवंढा गिळत तिच्या रुमाल बांधलेल्या डोक्यावरून हात फिरवत तो घोगऱ्या आवाजात बोलला,
“अशी बोलू नकोस आरु ऽ… “


बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ती हलू लागली जसा की तिला हुंदका आलेला. कृष्णाने तिला घट्ट मिठीत कवटाळलं. तिच्या वेदनेने, प्रचंड थकव्याने, एक एक शब्द ती खूप कष्टाने बोलली,
“किस्सू ऽ ऽ ऽ बाळ…..”

तिच्या केसांवरून हात फिरवत कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
“मी घेईन काळजी…”

काही क्षण श्वास घेतल्यावर ती पुन्हा बोलली,
“बाळाला… दुसरी… दुसरी आई…. आण…”


त्याच्या डोळ्यांतून वेदनेच्या अश्रूंचा मारा होत होता. काळजामध्ये दुःखाने कालवा कालव होत होती. जिच्यावर स्वतःला विसरून प्रेम केलं, तिची जागा दुसऱ्या कोणाला देण्याच्या कल्पनेने तो बधिर झाला. वेडावला. तिला अजूनच घट्ट मिठीत घेत त्या ही परिस्थितीत हलकासा तिच्यावर रागावला,
“गप बसते काय… हे शक्य नाही.”


जणू त्याच्याकडून हे वदवून घेण्यासाठीच तिने तिचे श्वास राखून ठेवले होते.


'तुला काहीही होणार नाही! मी तुला काही होऊ देणार नाही.' हे त्याला बोलायचं होतं पण डोळ्यांतील पाणी आणि गळ्यातील आवंढा त्याला काही बोलूच देत नव्हते.


त्याच्याकडे नजर वर करून प्रेमाने बघत खूप कष्टाने ती एक एक शब्द बोलत होती,
"किस्सू ऽ ऽ ऽ ऽ , मला आईचं प्रेम …..नाही मिळालं….. माझ्या बाळाला… बाळाला तरी मिळू दे! आई ऽ ऽ ऽ ‌.. आई पाहिजे असते रे……”


तिचं बोलणं ऐकून कृष्णाच्या डोळ्यांतून वेदनेचे अश्रू आक्रोश करत गालावरून ओघळले.


ती पुन्हा दीर्घ श्वास घेऊन खूप कष्टाने बोलली,
"बोल-"


‘बोल’, या शब्दाचा अर्थ ती वचन मागत होती आणि तो डोळ्यांतील धार तशीच वाहू देत तिच्या डोळ्यांतील पाणी पुसत तिच्या डोक्याला बांधलेल्या रुमालातून जे काही कपाळावर केस होते त्यांना सारखा मागे घेत तसाच तिच्याकडे बघत होता.


"किस्सू ऽ ऽ ऽ ऽ, बोल!"
पुन्हा खूप कष्टाने बोलली ती!


ती किती हट्टी आहे हे त्याला चांगलच माहीत होतं. जोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत ती हेचं बडबडत राहणार. तिचा त्रास कमी करण्यासाठी मनात नसतानाही त्याने थोडीशी खालीवर मान हलवली आणि ती गालाच्या कोपऱ्यात हसली.


तसं त्याने पुन्हा तिला आपल्या छातीशी कवटाळलं. त्याच्या हृदयाची धडधड ऐकत ती अस्पष्ट बोलली,
“निघू ऽ ऽ ऽ?”


तो शब्द त्याच्या काळजात खंजर खूपसल्यासारखा खोलवर गेला. तो दुःखाने व्याकुळ होत बोलला,
“नाही. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.”


पुन्हा मोठे श्वास घेत ती एका कोपऱ्याकडे बघत वेदनेने बोलली,
“तो वाट बघतोय कधीपासून… आता जाऊ दे.”


कृष्णाने तिला घट्ट मिठीत कवटाळून खोलीतून नजर फिरवली आणि इकडे तिकडे बघतच रडत रागावला,
“ए ऽ.. मी तुला आरुला नेऊ देणार नाही.. ऐकलंस काय.. ? तू जा इथून.”


पुन्हा मोठ्या श्वासांसोबत तोंडातून हवा सोडत वेदनेचा उद्गार बाहेर पडला,
“किस्सू ऽ ऽ ऽ ऽ निघू ऽ ऽ ऽ ऽ ऽ?”


“नाही… नाही तुला मी कुठेच जाऊ देणार नाही.” तिला आपल्या मिठीत घट्ट कटाळून कृष्णा त्या खोलीतून नजर फिरवत इकडे तिकडे बघत रडत ओरडत होता,
“दूर हो… दूर हो काय… मी तुला आरुला नेऊ देणार नाही. लांब राहायचं तिच्यापासून.. नाही तर मी जीव घेईन तुझा..”


त्याच्या प्रेमाने नाहून निघत असतानाच आरतीने शेवटचा श्वास घेतला.

“किस्सू ऽ ऽ ऽ ऽ ऽ..”
एक अस्फुट उद्गार आणि तिचं अंग सैल पडलं. तसा रडता रडताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला.


तिला मिठीत कवटाळून तो खोलीतून इकडे तिकडे बघत रडत ओरडत होता.. आक्रोश करत होता,
“ए ऽ, माझी मला आरु परत दे… सोड तिला..
कसा जगू मी तिच्याशिवाय .. लहान लेकरू आहे रे आमचं… तिला सोड आणि मला घेऊन जा.. पण सोड तिला.. सोड…” आरतीला कवटाळून तो आक्रोश करत राहिला. दरवाज्यात तोंडाला पदर लावून सोनाईने हंबरडा फोडलेला.


आताही त्या ज्वलंत वेदनादायी आठवणींचा उद्रेक आत मध्ये झाल्याने कृष्णा सखीचा हात अतिशय घट्ट पकडून रडत बोलला,
“आपली आरू… आपल्याला सोडून गेली सखी.. कायमची सोडून गेली.”


‘ज्याच्यावर आपण वेड्यासारखं प्रेम करतो त्याला अचानक निरोप देणं म्हणजे जिवंतपणे मरणच!’

त्याच्यातील दुःखाचा सागर त्याच्याकडून सखीकडे वाहत होता. ती सुद्धा रडत होती.

दुःखाच्या, वेदनेच्या, आरतीच्या विरहाच्या सगळ्या भावनांचा त्याच्या आत मध्ये नुसता आगडोंब उसळलेला. तो कोलमडून गेलेला.. कोसळलेला. तिचा हात सोडून त्याने सखीला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. सखी सुद्धा मुसमुसत त्याच्या पाठीवर हात फिरवत होती.


कृष्णा रडत बोलला,
“आरुला खूप त्रास झाला सखी…. माझ्या मिठीत तिने शेवटचा श्वास घेतला. माझ्या मिठीतून तो तिला घेऊन गेला आणि मी काहीच करू शकलो नाही.”


“हम्म…”
सखी रडतच हुंकारली. तिला कल्पना होती. त्याची ही वेदनादायी जखम तिला आयुष्यभर सांभाळावी लागणार होती. तिला आयुष्यभर त्याच्या त्या नाजूक जखमेवर फुंकर घालावी लागणार होती.


तिचे ते शेवटचे क्षण सहन न होऊन वेदनेचा पूर तिच्या मिठीत मोकळा करताना त्याची मिठी अगदी घट्ट झालेली.


आजवर हजार वेळा ते वेदनादायी दुखरे क्षण एकांतात जगलेला आणि हजार वेळा त्याच क्षणांमध्ये कुढलेला कृष्णा तिच्या मिठीत रडत बडबडला,
“खूप त्रास होतो सखी.. खूप खूप त्रास होतो. आरुच्या सगळ्या आठवणींवर तिची ती एकच दुखरी आठवण जालीम ठरते आणि हेलावून टाकते.
नाही सहन होत आता… आता नाही सहन होत.”


आजवर एकट्याने जगलेल्या क्षणांमध्ये तिलाही भागीदार करून त्याच्या सखीला घट्ट मिठी मारून तो खूप खूप रडला. सखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत मूक अश्रू गाळत राहिली आणि तो त्याच्या हक्काचा कुशीत शिरून भावनेचा समुद्र खाली करत राहिला.

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
२८/०४/२०२४

………

(किती वेळा डोळे ओले झाले असतील त्याचं गणित नाही. मागच्या भागाच्या मोकळ्या समीक्षांसाठी मनापासून धन्यवाद!

लगेच उद्याच भाग येण्याची शक्यता अगदीच कमी आहे. दोन-तीन दिवसांनी भेटू तोपर्यंत वाट पाहू नका.. आता फक्त माझ्या या नोट वर बोलण्यापेक्षा भागावर ही बोलला तर ते जास्त आवडेल.

भेटू लवकर..)

🎭 Series Post

View all