मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 3

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 3

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

आशा पटकन रूम मध्ये निघून गेली. उशीत तोंड खुपसून ती रडत होती. मी काय चुकीच केल? माझ्यावर का राग काढता आहेत समजत नाही. आता यांना माझ्यावरचा हक्क आठवला का? मी त्यांची बायको आहे ते आठवल का? इतर कर्तव्य करत नाही. रक्षित कडे बघत नाही. मी चांगल्या मनाने दुसर्‍यांशी बोलले तर काय झाल? या घरात विचित्र लोक भरले आहेत नुसते. बोलू का? काही उपयोग नाही. मला कायम अस दाबून मारतात.

प्रदीपचा फोन वाजत होता. त्याने इकडे तिकडे बघून फोन घेतला. त्याच्या चेहर्‍यावर हसू होत. हो येतो थोड्या वेळाने. तू तयार रहा. थोड हळू आवाजात बोलून फोन ठेवला.

"चहा नाश्ता काही आहे का आज?" त्याने मोठ्याने आवाज दिला.

आशाने डोळे पुसले ती बाहेर आली. रमाताई डायनिंग टेबल वर बसुन तिच्याकडे बघत होत्या. तिने दोन प्लेट पोहे घेतले. त्या दोघांना दिले.

"तुला घे." रमा ताई म्हणाल्या.

"मी नंतर खाईन." तिने चहा गाळून आणला. ती आत आवरायला निघून गेली.

रत्ना, प्रकाश ही येवून बसले. रमा ताईंनी त्यांना पोहे दिले. सगळे तिच्या बद्दल बोलत होते.

प्रदीप नऊ वाजता ऑफिसला जात होता. मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्ट वर होता. भरपूर पगार. तीन बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट. कार. बँक बॅलन्स. आणखी एक दोन फ्लॅट. जमीन घेतलेली. सोन नाण भरपूर. सगळं काही होत. फक्त तो आशा साठी पाच रुपये जास्तीचे खर्चायला तयार नव्हता. कोती मनोवृत्ती. संकुचित स्वभाव, बायको किती हि हुशार असली कमवत असली दिवस रात्र घर कामात बिझी असली पाहिजे. तरी अजिबात किम्मत न देण असे गुण अंगी होते. बायकोला अत्यंत कमी समजत होता मला तुझ्या नोकरीची गरज नाही असं कित्येक वेळा बोलुन दाखवलं होतं. आशा ही नोकरी स्वतःसाठी करत होती. हीच नोकरी नसती तर तिला स्वतःसाठी पाच रुपये सुद्धा मिळाले नसते.

प्रदीप तिथे बसुन पेपर वाचत होता. घरात खूप शांतता होती. रमा ताई देवपूजा करत होत्या. आशा तयार होती. तिचे डोळे रडून सुजलेले होते.

" आई स्वयंपाक तयार आहे. बाई येईल तिला आज बाल्कनी धुवायला सांगा." आशा ऑफिस साठी निघत होती.

"आशा काय झालं ग? सकाळी जरा तरी प्रसन्न रहात जा ना. नेहमी तुझा उतरलेला चेहरा बघायला मिळतो." रमा ताई म्हणाल्या.

"असंच आहे आई आता काय बोलणार? माझ्याशी बोलायची वेळ आली की हिचा चेहरा पडलेला असतो. बाहेरच्या लोकांशी हसून बोलत असते. फक्त गळ्यात पडायच बाकी होत. " प्रदीपने टोमणा मारला.

ती काही म्हणाली नाही. या सासुबाईंना दिसल नाही का आत्ता यांनी मला मारल. तरी मी काही हसत सगळीकडे मिरवायचं का. मुद्दाम करतात.

रमा ताई बडबड करत होत्या. " तुमचे भांडण तुमच्या जवळ ठेवत जा. आमच्याशी नीट वागत जा. एक तर दिवसभर तुम्ही लोक घरी नसतात. मला खूप काम पडतं. मुलांना सांभाळायचं असतं. सकाळचं थोड आवरून जाता जा. घरात नणंद आहे. जावई माणूस आहे. थोड तरी भान ठेवा."

" आई सगळं झालेलंच आहे ना. नसेल होत तर स्वयंपाका साठी बाई लावून घेवू. " आशा म्हणाली.

" तु काय करते मग . " त्यांनी विचारल.

" सकाळच तर मी करते ना. तुमच्या साठी, दुपार साठी मी म्हणते आहे. आता तुम्ही तरी सुरू करू नका आई . मला थोडी तरी शांती मिळू द्या. " आशा चिडली.

या घरचे सगळे तसेच आहेत. यांच्याशी बोलून काही उपयोग नाही . सासुबाईंनी काही सांगितल की प्रदीप दर वेळी आशाला बोलत होता. तिच्यावर राग काढत होता . हे माहिती असून ही रमा ताई शांत रहात नव्हत्या.

माझ नशीब खराब आहे. काय करू मी विरोध करून बघितल. चिडून बघितल. बोलून बघितल. हे सगळे लोक एका बाजूला होतात. कसेही वागतात. त्यांना माझ्याशी नीट बोलता येत नाही. यांना ही केव्हाही राग येतो. हव तेव्हा बायकोला मारायच. तिने डबा घेतला ती निघाली.

"रक्षितला अभ्यासाला बसवा पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे." आशा म्हणाली.

"तेच करते मी. नुसत्या ऑर्डर सोडा." रमा ताई म्हणाल्या.

ती निघाली.

प्रदीपने तिच्या कडे बघितल नाही. तिने त्याच्या कडे.

ती ऑफिस मधे आली. अंजलीला बघून तिला भरून आल "काय झाल? गालावर वळ कसले?"

ती सगळ सांगत होती.

" तुझा नवरा एकदम मूर्ख मनुष्य आहे. तू सहन करणारी सात मूर्ख. पोलीस कंप्लेंट कर." अंजली म्हणाली.

"कस पण? मी राहू कुठे? करू काय? रक्षितच शिक्षण बाकी आहे." आशा म्हणाली ते बरोबर होत. तिच्या एकटीच्या पगारावर त्यांच भागणार नव्हत. कित्येक वर्ष तिने हाच विचार करुन तडजोड केली होती. पुढे कस होईल. माझ झाल आता रक्षितच शिक्षण नीट व्हायला हव.

"तुझा पगार आहे ना. तस ही तू डिवोर्स घेतला तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या बापाला करायला सांगायचा." अंजली म्हणाली.

"हे इतक सोप आहे का? असा किती पगार येतो. महागाई किती शाळेची फी किती. कस होईल." आशाने तिचे मुद्दे मांडले.

" रहा तिकडेच मग. तो मान देत नाही. प्रेम नाही. मार खात जग . मला काही सांगू नकोस . " अंजली चिडली होती. तीच बरोबर होत. आशा स्टँड घेत नाही. आता ही चुकी नसतांना तिला मारल तरी मुळमुळ रडत राहिली. चांगल उत्तर द्यायच होत ना.

"अंजली तू चिडू नकोस ना. तुला माहिती नाही प्रदीप समोर मी बोलू शकत नाही. " आशा म्हणाली.

" बोल. हिम्मत कर. माणूस आहे ना तो. "

" अग तो केव्हाही मारतो. माझे हात पाय गळून जातात. समजूतदार पणा असा अंगात नाही. नेहमी राग आलेला असतो. अश्या परिस्थितीत मी काय करणार? तूच सांग. " आशा तिच्या कडे बघत होती.

"हेच घाबरण बंद कर. मला जमणार नाही मनातून काढून टाक. अजून काहीच वय नाही. सोड त्याला."

बघते.

" होईल ग बरोबर. या जगात देव आहे. हिम्मत तर कर. अस आयुष्य वाया घालवू नकोस. " अंजली म्हणाली.

आशाच काही खर नाही. अजिबात कॉन्फीडन्स नाही. रक्षित साठी ती मागे फिरते. बहुतेक तिच्या कडे पैसे नसतील.

" आशा मी मदत करेल. तुला काहीही लागल तर सांग. पण या त्रासातून बाहेर पड ग. " अंजली म्हणाली.

" हो. विचार करते. " आशा सवयी प्रमाणे कामाला लागली.

🎭 Series Post

View all