मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 4

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 4

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

दुपारचे बारा वाजले. ऑफिस मधे कामाची गडबड सुरू होती.

"चल आशा केक कापायला." अंजली बोलवत होती.

आशा बघत होती. कोणाचा वाढदिवस आहे?

"आपल्या सुरेखा मॅडमचा वाढदिवस आहे." त्या ऑफिसच्या बॉस होत्या.

आशाला अजिबात जायची इच्छा नव्हती. तिने चेहरा आरशात बघितला. गालावरचे वळ कमी झाले होते. त्यावर थोडे केस घेतले. ती काॅन्फरन्स हॉल मधे गेली. केक कापून झाला. त्या मॅडम पार्टी देत होत्या. ऑफिस मधले सगळे लंच साठी जाणार होते.

"मला इच्छा नाही." आशा म्हणाली.

"असं करून चालणार नाही. ऑफिस काही मध्ये काही एटीकेटस असतात ते पाळावे लागतात. तू जरा तुझ्या दुःखी जिवनातुन बाहेर ये. " अंजली म्हणाली.

सगळ्या टॅक्सी करून हॉटेलमध्ये निघाल्या.

"एवढ्या लांबच हॉटेल बुक करायची काय गरज होती? जायलाच अर्धा तास लागेल." आशाने नापसंती दाखवली.

"ते मॅडमचा फेवरेट हॉटेल आहे असं ऐकलं आहे." अंजली म्हणाली.

" ते सर किती छान वागतात ना त्या मॅडमशी. स्वतः सरकारी अधिकारी आहेत तरी एवढं सरप्राईज अॅरेंज केल. कुठे ही त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता. त्यांची जोडी मस्त आहे. " आशा म्हणाली.

"तेच म्हणते मी. या जगात बरेच चांगले लोक आहेत. सोड त्या प्रदीपला हे आयुष्य एकदाच मिळत. जेवढ बाकी आहे तेवढ नीट जग. " अंजली म्हणाली.

" आता काय बदल होईल? रक्षित कडे बघायच आणि जगायच. " आशा बाहेर बघत म्हणाली.

"रक्षितच लग्न झाल्यावर काय करशील? तो नंतर तुला विचारेल का? मुलांच जग लगेच बदलत. लग्न तर लांब राहील. कॉलेज मधे गेल्यावर त्याच वागण बदलेल बघ. "

" अंजली अस घाबरवू नको ना. " आशा म्हणाली.

" सत्य सांगते आहे. एकटी आहेस, अजून एकटी पडशील डोळे उघड. तुझा मुलगा दहा वर्षाचा आहे ना म्हणजे तू पस्तीसची असशील."

हो.

" विचार कर. " अंजली बरोबर म्हणत होती. कोणाच आयुष्य पस्तिशी नंतर सुरू होत. आशा अगदी सगळं संपल्या सारख करत होती.

ते हॉटेल मध्ये पोहचले. मोठे फाईव्ह स्टार हॉटेल होतं. त्यांच्यासाठी छोटा हॉल बुक केला होता. सगळे हॉल मधे बसले होते. साहेब मॅडम छान सोबत फिरत होते. गिफ्ट वर गिफ्ट मिळत होते. आशा बघत होती किती लकी आहेत ह्या मॅडम. उगीच माझीच नजर व्हायची. तिने मनातले विचार बाजूला सारले. ती अंजली काय म्हणाली तो विचार करत होती.

काय करू यांची कंप्लेंट करू का? यांनी डिवोर्स दिला तर? मी कुठे जावू? आई कडे? एवढ मोठ आयुष्य कस होईल? पुढे जावून कश्या वरून चांगले लोक मिळतील? आगीत निघून फोफोट्यात पडल्या सारख होईल. दुसरा नवरा नको...... मला जमणार नाही. मला नाही आवडत कोणी माझ्याकडे बघितल तरी.

"चला जेवायला सुरुवात करा." मॅडम बोलवत होत्या. आशा प्लेट घेऊन रांगेत उभी होती. समोर भली मोठी काच होती. बाजूला गार्डन होतं आणि पार्किंग होती. तिला समोर उभी असलेली कार ओळखीची वाटली. तिने नीट बघितलं. ती त्यांचीच कार होती. ती इकडे तिकडे बघत होती. प्रदीप इथे आहेत का? त्या साईडला डायनिंग हॉलमध्ये तो कोणाशी तरी बोलत जेवत होता. अतिशय हसरा चेहरा. प्रेमाने जेवण सुरू होत. यांचा असा चेहरा मी कधीच बघितला नाही. कोण आहे बरं. एक सुंदर तरुण मुलगी सोबत होती. कोण आहे ही? आशाला राग आला. पण मुलगी खरच खुपच छान आहे. केस सेट केलेले. गोरी पान. जीन्स घातलेली होती.

तिने स्वतः कडे बघितल. अतिशय साधा ड्रेस घातलेला. मेक अप नाही. वेणी घातलेली.

असं आहे तर. स्वतः इकडे तिकडे फिरायचं आणि मी नुसती बोलली तर मला मारायचं.

"अंजली मी एका मिनिटात आली." तिने या बाजूने कोणाला समजणार नाही असे दोघांचे फोटो मोबाईल मध्ये काढून घेतले. तिचं जेवणावर लक्ष उडाल होतं. ती सारखी त्या दोघांनाच बघत होती.

मी चुकीचा विचार करते आहे. बहुतेक ही मुलगी त्यांच्या ऑफिस मधली असेल. संशय नको घ्यायला. मी आज कशी इकडे जेवायला आली. ते ही तसेच आले असतिल.

थोड्या वेळाने बघते तर प्रदीप आता त्या मुली जवळ बसलेला होता. दोघांचा हातात हात होता. ती काहीतरी सिरियस सांगत होती. प्रदीप तिला समजावत होता. काय सुरू आहे हे? हे वेगळं प्रकरण दिसत आहे.

बाकीच्या मैत्रिणी खूप हसून खेळून बोलत होत्या. "भाजी छान आहे."

"तू नूडल्स घेतल्या का? ट्राय कर."

आशा अलिप्त होती. तीच जेवणावरच लक्ष उडालं होत. तिने मुश्कीलीने अर्धी पोळी खाल्ली.

अंजलीला वाटलं की सकाळी जे झालं त्यामुळेच आशा अपसेट आहे.

खर तर प्रदीपला एका मुली बरोबर बघितल्यावर आशाच्या पायाखालची जमीन सरकली होती. संसार मोडतांना दिसत होता. यांच एक्सट्रा मेरीटल अफेअर सुरू आहे. म्हणून यांना मी नको आहे. आणि मला शहाणपणा शिकवतात. काय करू? बोलून बघू का? या बाबतीत मला कोण सल्ला देईल. प्रदीप खूपच स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या कडे भरपूर पैसा आहे. पोझिशन आहे. ते माझ ऐकणार नाही. मला दाबून मारतील. घराबाहेर काढतील.

ती मुलगी आता नीट दिसत होती. तिचे सुद्धा फोटो घेतले. दोघ हातात घेऊन बाहेर पडले ते सुद्धा आशाने टिपून घेतलं. माझा संसार मोडला तिला समजल होत. आता यांच्या सोबत रहाण्यात काही अर्थ नाही. ती वॉश रूम मधे निघून गेली. बर ऑफिस मधे कोणीही प्रदीपला ओळखत नव्हत. नाहीतर आज काय झाल असत. हे अस कस वागू शकतात ती चिडली होती.

सगळे परत निघाले. टॅक्सीत आशा या दोघांबद्दलच विचार करत होती. तिला खूप वाईट वाटत होतं. ऑफिसला आल्यानंतर ती फोन घेऊन बाथरूम मध्ये निघून गेली. आईला फोन लावला.

आईकडची परिस्थिती ही जेमतेमच होती. आई बाबा आणि बहिण. बहिणीचं लग्न झालेलं होतं. आई-बाबा दोघेच राहत होते बाबा रिटायर होते. पेंशन वर घर चालत होत.

🎭 Series Post

View all