मोदक

मोदक रेसिपीज इन मराठी
मोदक

सध्या सर्वत्र अक्षरब्रम्ह १४ विद्या, ६४ कलांचे अधिपती असलेले गणपती, गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा आवडता खाऊ म्हणजे मोदक.

पंचखाद्य
गणपती बाप्पांचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे पंचखाद्य व मोदक. या पंचखाद्यात पाच 'ख' आद्याक्षराने सुरू होणारे पदार्थ असतात. यात खारीक, खोबरे, खवा, खडीसाखर व खसखस.
साहित्य
खारीक पूड, भाजलेला खोबरा कीस, बारीक करून घेतलेली खडीसाखर, खवा, भाजलेली खसखस पूड, वेलची पूड. हे सर्व पदार्थ जेवढे लागेल त्या प्रमाणात घ्या.
कृती
हे पाचही पदार्थ एकत्र करून त्याचा नैवेद्यही ठेवता येईल आणि त्याचेच मोदकही करता येतील.

पंचखाद्य मोदक
साहित्य
एक वाटी मैदा किंवा कणिक, अर्धी वाटी रवा, चिमूटभर मीठ, दूध, तळण्यासाठी तूप, वर दिलेले पंचखाद्य सारण. या सारणात तुम्ही आवडीप्रमाणे काजू पूड, बदाम पिस्ता पूड तसेच थोडी पिठीसाखरही घालू शकता.
कृती
परातीत मैदा किंवा कणिक व रवा घेऊन त्यात किंचित मीठ घाला. थोडे तुपाचे मोहन घालून ते पीठ दुधाने घट्ट भिजवा. व अर्धा तास झाकून ठेवा.नंतर चांगले मळून घ्या. त्याचे छोटे छोटे बॉल करून पाती लाटून घ्या व त्यात पंचखाद्याचे सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या व तुपातून तळून घ्या. चला तर मग गणपती बाप्पा साठी मोदक तयार.

सौ. रेखा देशमुख